
>> ऋतुजा फडके
भास हा कलाकारांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन वर्णन करण्यात पटाईत असणारा नाटककार. महाभारतातील युद्धात कर्ण त्याच्यावर आलेल्या परिस्थितीमुळे हरला. या सगळय़ाचा त्याच्या मनावर झालेला परिणाम दर्शविणारं, कारुण्यरसाची छाया असणारं नाटक म्हणजे कर्णभारम्.
आज आपण ज्या नाटकाविषयी बोलणार आहोत ते नाटक जरा वेगळय़ा ढंगाचं नाटक आहे. या नाटकाच्या नाटककाराशी आपली आधीच्या लेखामध्ये भेट झालेली आहे; पण त्याने लिहिलेलं, आपण आज पाहणार असलेलं नाटक मात्र आपला दृष्टिकोन बदलून टाकणारं आहे. या नाटकाची कथावस्तू ‘महाभारता’वर आधारित आहे. नाटकातील पात्रंसुद्धा महाभारतातील पात्रं आहेत. नाटकात वर्णन केलेली घटना आपल्या परिचयाची आहे, आपल्या जवळची आहे. त्या घटनेचा आपण आपल्यातच बऱयाचदा ऊहापोह केलेला आहे. कोण चूक, कोण बरोबर यावरून आपल्यात बऱ्याच चर्चा रंगलेल्या आहेत आणि बरोबर याच चर्चा या नाटककाराने हेरून त्या घटनेकडे बघण्याचा आपला पूर्ण दृष्टिकोन बदलून टाकणारं ‘त्या एका घटनेचं’ एक अंकी नाटक केलं आणि ते म्हणजे ‘कर्णभारम्’ आणि या नाटकाचा नाटककार म्हणजे भास.
आपण मागच्या लेखात भास आणि भासाने लिहिलेल्या ‘मध्यमव्यायोग’ या नाटकाची माहिती घेतली होती. तेही नाटक एक अंकीच होतं आणि आज आपण ज्या नाटकाविषयी वाचणार आहोत तेसुद्धा एक अंकी नाटकच आहे. फरक फक्त इतकाच आहे की, हे एक अंकी जरी असलं तरीही या नाटय़ प्रकाराला ‘व्यायोग’ म्हणता येणार नाही. कारण या नाटकात कुठलंही युद्ध नाही किंवा नाटकाचा रससुद्धा वीररस नाही, नाटकाचा नायक योद्धासुद्धा नाही, तर भरताने नाटय़शास्त्र्ाात वर्णन केल्याप्रमाणे या नाटकाचा प्रकार ‘उत्सृष्टिकांक’ म्हणता येईल. नाटकाचा विषय वीररस आणि युद्धभूमी याच्यांशी संबंधित आहे; पण संपूर्ण नाटकावर करुण रसाची छाया आहे.
संपूर्ण नाटक कर्णाची हतबलता दाखवतं. कर्णावर असलेला, दैवयोगाने आलेला दुःखाचा भार नाटकात वर्णन केला आहे. परशुरामांनी दिलेल्या शापामुळे आणि इंद्राने मागून घेतलेल्या कवच-कुंडलांमुळे कर्ण अर्जुनाकडून मारला गेला, नाहीतर अशा राजाला आणि अशा योद्धय़ाला हरवणं भल्याभल्यांना शक्य नाही. पांडवांना जिंकवण्यासाठी हे खेळलेलं राजकारण आहे असं या नाटकात भासाने चित्रित केलं आहे. कर्ण त्याच्यावर आलेल्या परिस्थितीमुळे हरला असं या नाटकात भासवलेलं आहे. भास तसाही कलाकारांचा मानसशास्त्र्ााrय दृष्टिकोन वर्णन करण्यात पटाईत. याही नाटकात तो या सगळ्याचा कर्णाच्या मनावर कसा परिणाम झाला असेल याचं वर्णन करतो आणि म्हणूनच नाटकाचा रस ‘करुण रस’ आहे.
अत्युग्रदीप्तिविशदः समरेग्रगण्यः
शौर्ये च सम्प्रति सशोकमुपैति धीमान् ।
प्राप्ते निदाघसमये घनराशिरुद्धः
सूर्यः स्वभावरुचिमानिव भाति कर्णः ।
एक पराक्रमी योद्धा, युद्धभूमीवर अग्रणी असलेला योद्धा, बुद्धिमान, बलशाली हे सगळं असूनही या वेळेला असा भासत आहे, जसा ग्रीष्म ऋतूतसुद्धा सूर्याच्या किरणांनी मेघमाला आच्छादित केली आहे.
एखाद्या राजाची दुःखद अवस्था यापेक्षा चांगल्या शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही.
अयं स कालः क्रमलब्धशोभनो गुणप्रकर्षो दिवसोयमागतः।
निरर्थमस्त्रं च मया हि शिक्षित पुनश्च मातुर्वचनेन वारितः ।
कर्णाची विवश परिस्थिती या श्लोकात वर्णिलेली आहे. या अशा वर्णनातूनच नाटकातला करुण रस भासाने साधला आहे.
महाभारतातल्या बऱयाच घटनांमध्ये भासाने नाटकाचा करुण रस साध्य करण्यासाठी बदल केले आहेत. महाभारतात इंद्राने ब्राह्मण बटूच्या रूपात येणं आणि कर्णाने त्याला कवचकुंडले दान स्वरूपात देणं हा प्रसंग वनपर्वात दाखवलेला आहे; पण नाटकात हा प्रसंग बरोबर युद्धभूमीकडे प्रस्थान करताना वर्णन केलेला आहे. यातून भासाला काय सांगायचं आहे, तर कर्णाची दानशूर वृत्ती.
नाटकात ब्राह्मण वेषधारी इंद्राच्या तोंडी प्राकृत भाषा वापरणं हेसुद्धा आश्चर्यचकित करणारं आहे. वाचकांना खिळवून ठेवण्यासाठी केलेले हे सगळे बदल नाटकाला एका वेगळ्या दर्जावर पोहोचवतात. याचं सगळं श्रेयसुद्धा भासलाच जातं.





























































