
>> साधना गोरे, [email protected]
महाराष्ट्रीय लग्नाचं एक आगळं वैशिष्टय़ म्हणजे, लग्नात मुलीला दिला जाणारा रुखवत. या रुखवतात विविध खाद्यपदार्थांपासून ते शोभेच्या, गृहोपयोगी विविध वस्तू असतात. प्रत्यक्ष लग्नाइतकाच, तर कधी त्याहून अधिक लक्षात राहतो तो मांडवातला रुखवत. रुखवतातील वस्तूंचं आगळेपण हे तर त्याचं कारण असतंच, पण त्यांची मांडणीही चित्तवेधक खुबीनं केलेली असते. जगण्याच्या आधुनिक साधनांबरोबर आपल्या परंपरा बदलल्या तशी रुखवतातही कालांतराने नवनव्या वस्तूंची भर पडत गेलेली दिसते. आता आपल्याला हा ‘रुखवत’ अस्सल मराठी वाटत असला तरी त्याचं मूळ मात्र फार्सी-अरबी शब्दांत असल्याचं दिसतं.
पंधराव्या-सोळाव्या शतकात महाराष्ट्रात इस्लामी सत्तेच्या काळात इथल्या समाज जीवनात अनेक फार्सी-अरबी शब्द रुजले. अस्सल देशी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कित्येकदा फार्सा असतं ते यामुळेच. ‘रुखवत’ हा फार्सा शब्द असाच आपल्या संस्पृतीत रुजला. इतपंच नव्हे, तर विवाहासारख्या मानाच्या समारंभाचा एक वेगळा आशयही त्याला प्राप्त झाला. ‘रुखवत’ शब्द फार्सातून आला असला तरी त्या संस्पृतीत तो आपण वापरतो त्या अर्थाने वापरला जात नाही. त्यामुळे तो फार्सातील मूळ कोणत्या शब्दापासून आला असावा याबद्दल शब्दकोशकारांमध्ये मतभिन्नता दिसते. पृ. पां. पुलकर्णी या शब्दाचं मूळ फार्सातील ‘देणगी’ या अर्थाच्या ‘रुषमत्’ शब्दात असल्याचं म्हणतात, तर ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त ‘देणगी’ अर्थाच्या ‘रुश्वत’ आणि ‘लाच’ अर्थाच्या ‘रिश्वत’ शब्दात ‘रुखवत’चं मूळ असल्याचं म्हटलं आहे. माधव पटवर्धन यांच्या ‘फार्सी – मराठी कोशा’त पुलकर्णींनी उल्लेख केलेला ‘रुषमत्’ शब्दच नाही. ‘रुश्वत’ – ‘रिश्वत’ हे शब्द आहेत. मात्र त्यांचा अर्थ ‘लाच’ असाच आहे. मुलीच्या पाठवणीवेळी, तिच्या निरोपाप्रसंगी द्यायच्या या रुखवत-भेटीसंदर्भात पटवर्धनांच्या या कोशात आणखी एक शब्द आढळतो, तो म्हणजे ‘रुख्सत’ – ‘रुस्कत’. मूळ अरबीतील ‘रुख्सत’ शब्दावरून त्याच अर्थाचा ‘रुस्कत’ हा फार्सा उच्चार झाला. या शब्दांचे अर्थ आहेत – जाण्यास परवानगी, निरोप, रजा, सुट्टी, बिदा. याच कोशात या शब्दांपुढे काही वाक्येही दिलेली आहेत – ‘आम्हास पातशहाकडे रुक्सत करावे (भेटवावे)’. ‘आमची तबियतेसी बे – आरामी राहती; याजकरिता आम्ही तीन महिन्यांची रुख्सत घेऊन हवा खायासी समुद्राचे वाटेने मद्राजेस जातो.’ असा मूळचा व्यापक संदर्भातील निरोप, रजा या अर्थाच्या ‘रुख्सत’ शब्दाचे मराठीत मनस्वी अर्थांतर होऊन तो केवळ मुलीच्या पाठवणीसंदर्भात मर्यादित झाला असावा. शिवाय त्या पाठवणीला उपहार-भेट यांचीही जोड आहे.
महाराष्ट्रात रुखवताची ही परंपरा सर्व प्रांतांत आणि बहुतांश जातींमध्ये आढळून येते. मूळ परंपरा नसलेल्या जमातीमध्येही अलीकडील बाजारी अर्थव्यवस्थेमुळे मोठय़ा प्रमाणात या परंपरेचे सार्वत्रिकीकरण होताना दिसते. ही परंपरा ‘रुखवत’ या नामकरणाआधी अस्तित्वात होती का आणि ती कोणत्या नावाने प्रचलित होती? याचे खात्रीशीर पुरावे मिळत नाहीत. मात्र बाळपृष्ण सदाशिव यांच्या ‘मराठी -संस्पृत शब्दकोशा’त ‘रुखवत’ शब्दाला ‘वरमिष्टान्नभोजनम्’ असा संस्पृत प्रतिशब्द दिला आहे. ते नंतरचं भाषांतर असण्याची शक्यता असली तरी यावरून अशी काही प्रथा ‘रुखवत’ नामकरणाआधीही आपल्या विवाहांमध्ये असावी असे म्हणता येते. हल्ली रुखवतात मोठय़ा प्रमाणात शोभेच्या वस्तूच ठेवल्या जात असल्या तरी आजही गावोगावी रुखवतामध्ये विविध अन्न पदार्थांची रेलचेल दिसते, इतकेच नव्हे तर या पदार्थांनी सजवलेल्या मानाच्या टोपल्या म्हणजे रुखवत वाजत गाजत मांडवदारी आणला जातो. सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या संत एकनाथांच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ काव्यात वर्णन केलेल्या रुखवतातही खाद्य पदार्थांची खमंग यादी समोर येते.
वधुपक्षाकडून दिल्या जाणाऱ्या या रुखवताच्या टोपल्या उघडण्याचा मान वराची आई, आत्या, चुलती अशा मानाच्या स्त्रियांना असतो. त्या वेळी या स्त्रियांनी लांबलचक उखाणे घेऊन या टोपल्या उघडायच्या असतात. या वेळी वरपक्षातील स्त्रिया गमतीशीर उखाण्यांमधून रुखवतातील पदार्थांची गुणवत्ता, उपयोगिता सांगत. उदाः ‘आलं आलं रुखवत दणाणली आळी, उघडून पाहती दीडच पोळी’ किंवा ‘आलं आलं रुखवत दणाणलं जोतं, उघडून बघते साखरंचं पोतं.’ आजही गावाकडे उखाण्यातल्या या अशा यमकांच्या साखळीचा खेळ बराच दीर्घ आणि मजेदार असतो. रुखवतातील या उखाण्यावरूनच एक म्हणही आहे. फार अपेक्षा असण्याच्या ठिकाणी काहीच न मिळून अपेक्षाभंग होतो. अशा वेळी जी म्हण वापरले जाते ती म्हणजे – ‘आलं आलं रुखवत, कडाडला हंडा, उघडून पाहतात तो अर्धाच मांडा.’ अर्थात प्रांताप्रांतानुसार यमकांची ही जुळणी अगदी भिन्न असू शकते.
























































