
>> सलीमा टेटे
मुलींसाठी भारतीय क्रीडा जगताचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे, असे म्हणावे लागेल. परंतु हे शिखर गाठण्यापर्यंतचा मुलींचा प्रवास प्रचंड संघर्षमय राहिला आहे. मनातील इच्छा, मेहनतीसाठीची तयारी आणि डोळ्यांत कधीही न मावळणारी उमेद हे फक्त तीन घटक खेळाडूला चॅम्पियन बनवतात. आज मी भारतीय संघाची कर्णधार आहे. हे फक्त पद नाही, तर गावागावांत बसून हॉकी खेळण्याची स्वप्ने पाहणाऱया मुलींप्रति माझी जबाबदारी आहे.
गेल्या काही दिवसांत क्रिकेटपासून लेटिक्सपर्यंत भारताच्या मुलींनी देशासाठी मिळवलेला गौरव प्रशंसनीय आहे. आयसीसी महिला विश्वचषकातील विजयाच्या उत्साहातच भारतीय मुलींनी पहिला ‘ब्लाइंड वुमेन्स ट्वेंटी-20 वर्ल्ड कप’ जिंकून नवे पान लिहिले, निकहत जरीनने जागतिक बॉक्सिंग चषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आणि महिला कबड्डी विश्वचषकावरही भारताने आपली मोहोर उमटवली. पदकांची आणि चषकांची ही मालिका प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे. यातून मुलींसाठी भारतीय क्रीडा जगताचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे, असे म्हणावे लागेल. परंतु हे शिखर गाठण्यापर्यंतचा मुलींचा प्रवास प्रचंड संघर्षमय राहिला आहे, हे मी माझ्या वाटचालीतून निश्चितपणाने सांगू शकते.
मांड आणि भात खाऊन घरातून बाहेर पडून मी सिमडेगा (झारखंड) च्या खडकाळ पायवाटांवर विनाकारण भटकत असे. हॉकी म्हणजे काय, ऑलिम्पिक म्हणजे काय, सुवर्ण व रौप्य पदकांचे महत्त्व काय, याची मला काहीच कल्पना नव्हती. आज मी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे म्हणून ओळखली जाते. लोक मला मैदानात खेळताना पाहतात तेव्हा कदाचित त्यांना माझे बॅकहँड शॉट्स, माझी गती आणि माझा आत्मविश्वास दिसत असेल, पण मी मागे वळून पाहते तेव्हा मला सर्वात आधी दिसतात बडकीछापर गावातील मातीच्या पायवाटा, ज्यावर मी अनवाणी पावलांनी धावत असे. याच गावात माझे वडील सुलक्षण टेटे आणि इतर गावकरी हॉकी खेळत असत. ते पाहून माझ्यात या खेळाची ओनिर्माण झाली. वडील स्थानिक स्तरावर हॉकी खेळत. त्यांच्या डोळ्यांत माझ्यासाठीचे एक स्वप्न पाहिले होते. या खेळात मी चमकदार कामगिरी करावी अशी त्यांची इच्छा होती, पण संसाधने नव्हती. हॉकीची स्टिक तर दूरच, चेंडूही नव्हता. वडिलांनी बांबूच्या खोडापासून माझ्यासाठी स्टिक बनवली आणि प्लास्टिक वितळवून चेंडू बनवला. तेच माझी पहिली हॉकी किट होते, पण हे किट माझे आयुष्य बदलतील याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.
2011-12 मध्ये मी वडिलांसोबत गावोगावी जाऊन हॉकीचे छोटे-छोटे सामने पाहत असे. खेळाडूंना मैदानात पाहताच मी जणू दुसऱया जगात जायचे. एके दिवशी वडिलांनीच मला खेळण्यास सांगितले. 2012 मध्ये लटाखमन गावात मी खेळत असताना सिमडेगामध्ये हॉकीचा प्रसार करणारे कोच मनोज कोनबेगी यांना माझ्यातील चमक पहिल्यांदा दिसून आली. सरांनी मला सिमडेगा सरकारी हॉकी प्रशिक्षण केंद्रात ट्रायल देण्याचा सल्ला दिला. तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. 2013 च्या ट्रायलमध्ये निवड झाल्यानंतर मी केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. तिथेच माझी भेट कोच प्रतिमा बरवा (स्व.) यांच्याशी झाली. त्यांनी मला हॉकीबरोबरच मुलींनी धाडसाने, न डगमगता पुकसे जायचे याचे प्रशिक्षणही दिले. त्यांच्या देखरेखीत माझे कौशल्य घडत गेले आणि माझ्यात राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचण्याचा आत्मविश्वास तयार झाला.
माझ्या राज्यानेही माझ्यावरचा विश्वास कधी तुटू दिला नाही. याच काळात मला प्रथमच राष्ट्रीय विद्यालयीन हॉकी स्पर्धेसाठी झारखंड संघात स्थान मिळाले. गावभर आनंद होता, पण आमच्या घरी टीव्ही नव्हता. माझे आई-वडील मला खेळताना पाहू शकत नव्हते. घरची परिस्थिती फारच बिकट होती. इतकी की, माझी स्वप्ने अपूर्ण राहतील की काय असेही क्षण आले, पण कुटुंबीयांनी कधीही मला या संघर्षाची जाणीव होऊ दिली नाही.
2016 मध्ये ज्युनिअर भारतीय महिला हॉकी संघात संधी मिळाली आणि मला नवे अवकाश लाभले. गावातून बाहेर पडून भारतीय संघाची जर्सी घालण्याचे स्वप्न मूर्त रूप घेऊ लागले. 2018 च्या यूथ ऑलिम्पिकमध्ये मी भारताची कर्णधार झाले आणि संघाने रौप्यपदक जिंकले. त्यानंतरचा माझा प्रवास अखंड सुरूच राहिला. टोकियो ऑलिम्पिक, हॉकी विश्वचषक, आशियाई खेळ आणि कॉमनवेल्थ स्पर्धांत मी भारताचे प्रतिनिधित्व केले. टोकियो ऑलिम्पिकदरम्यान भारतीय संघाने उपांत्यपूर्व स्पर्धेपर्यंत मजल मारली, पण तेव्हाही आमच्या घरी टीव्ही नव्हता. ते मनाला बोचणारे होते. याची माहिती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मिळाली तेव्हा त्यांनी तत्काळ आमच्या घरी स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टर पाठवले. माझ्यासाठी तो मोठा सन्मान होता.
आजही माझ्या गावात अनेक मूलभूत सुविधांची कमतरता आहे, पण काही वर्षांत झारखंडच नव्हे तर एकंदरीत भारतातील क्रीडा पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणात बदलल्या आहेत. मी सुरुवात केली तेव्हा ‘एस्ट्रोटर्फ’ हा शब्द ऐकूनही रोमांच येत असे. खरं सांगायचं तर मी सरकारी केंद्रात आले नसते, तर सलीमा टेटे या नावाला ओळखही मिळाली नसती. सरकारने उपकरणे, पायाभूत सुविधा, प्रशिक्षक, कॅम्प सर्व दिले. आज सिमडेगा आणि इतर जिह्यांत एस्ट्रोटर्फ मैदाने आहेत, स्पर्धा वाया आहेत, प्रशिक्षण शिबिरे सतत चालतात. केंद्र सरकारची ‘खेलो इंडिया’ मोहीम, साईची टॅलेंट स्काऊट योजना आणि वाया राष्ट्रीय स्पर्धांनी नव्या खेळाडूंसाठी वाट खूपच सोपी केली आहे. हॉकी इंडिया तर खेळाडूंना सर्व सुविधा पुरवत आहे.
अनेक राज्यांत महिला हॉकी लीग सुरू झाली आहे, पण माझ्या अनुभवातून एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते, सुविधा म्हणजे यशाची हमी नाही. मनात इच्छा, मेहनतीसाठीची तयारी आणि डोळ्यांत कधीही न मावळणारी उमेद हे फक्त तीन घटक खेळाडूला चॅम्पियन बनवतात. माझ्याकडे ना बूट होते, ना स्टिक, ना टर्फ, ना किट, पण आज मी भारतीय संघाची कर्णधार आहे. हे फक्त पद नाही तर गावागावांत हॉकी खेळण्याची स्वप्ने पाहणाऱया मुलींप्रति माझी जबाबदारी आहे. त्याही उद्या देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. पहिल्यांदा भारताची जर्सी घातली तेव्हा मला जाणवले की हे एक दायित्व आहे आणि ते अभिमानाने निभावायचे आहे. त्याबाबतची माझी निष्ठा हीच राष्ट्रभक्ती आहे.
(कर्णधार, भारतीय महिला हॉकी संघ)





























































