ठगांच्या दडपलेल्या इतिहासाचे तथ्य…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> समीर गायकवाड

ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटाच्या यशापयशावर आणि निर्मिती मूल्यांवर खूप काही लिहून झाले. मात्र ठग म्हणजे नेमके कोणते लोक आणि इतिहासात त्यांची दखल कशी घेतली गेलीय यावर पुरता प्रकाश अजूनही टाकला जात नाहीये. याआधी हॉलीवूडनेही ‘कन्फेशन ऑफ ठग’ या पुस्तकाचा आसरा घेत काही भूमिका चितारल्या होत्या. ब्रिटिश सैन्यातला अधिकारी विल्यम हेन्री स्लीमनने 1835 मध्ये चतुर्भुज केलेल्या ठग राजा सईद आमीर अली ऊर्फ ‘फिरंगिया’ याच्या कबुली जवाबावर हे पुस्तक आधारले होते. फिलिप मिडोज टेलरने लेखन केले होते.

ठगांबाबत बारकाईने अभ्यासल्यावर सिनेमातून दाखवण्यात आलेलं चित्रीकरण खोटं वाटू लागतं. कोणत्या ठगाने किती खून केले आणि किती निर्दयतेने केले यावर जी माहिती मिळते ती मेंदू सुन्न करणारी आहे. एकेका ठगाने शेकडय़ांत माणसं मारली होती हे आता खोटे वाटेल अशी परिस्थिती आहे, पण तेच वास्तव आहे. बेहराम ठग याने नऊशेहून अधिक माणसे खलास केल्याची नोंद गिनीजमध्ये आहे. ठग आणि पेंढाऱयांचा इतिहास सांगतो की, अठराव्या शतकाच्या प्रारंभापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सक्रिय होते. हिंदुस्थानी इतिहासात ज्यांच्याकर तपशीलवार काहीच लिहिलं गेलं नाही ते ठग गिनीज बुकपर्यंत पोहोचण्यास ब्रिटिशांनी राबवलेली ठगांच्या बंदोबस्ताची मोहीम कारणीभूत ठरली. ब्रिटिशांनी प्रभावीपणे राबवलेल्या ‘ठगी अॅन्ड डकैती सप्रेशन अॅक्ट’ या कायद्याद्वारे अनेक ठगांचे आणि कुख्यात डाकूंचे उच्चाटन केले गेले.

ठगांचा इतिहास धुंडाळण्यासाठी चित्रपटातून रेखाटल्या गेलेल्या त्यांच्या भडक व्यक्तिरेखा सहायक ठरल्या. माईक डॅश लिखित ‘ठग – द ट्रू स्टोरी ऑफ इंडियाज मर्डरर्स कल्ट’, स्लीमन – सर विल्यम्स लिखित ‘रॅम्बल्स अँड रिकलेक्शन ऑफ इंडियन ऑफिशियल’, किम कँगरलिखित ‘ठगी – बँडिट्री ऍन्ड द ब्रिटिश इन अर्ली नाइंटीन्थ सेन्चुरी इन इंडिया’, मॅक फार्लेन लिखित ‘द लाईव्हज् अँड एक्स्प्लॉईटस् ऑफ बँडिट अँड रॉबर्स’, मार्टिन व्हॅन वर्कन्स लिखित ‘द स्ट्रँगल्ड ट्रव्हलर – कॉलोनियल इमॅजिनिंग ऍन्ड द ठग्स ऑफ इंडिया’ या पुस्तकांतून ठगांवर प्रकाश पडतो.

हिंदुस्थानात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व काटमार करणाऱया संघटित टोळ्या होत्या. यातीलच पेंढाऱयांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱयांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना हिंसाचारी क गुप्त होती. मुघल साम्राज्याच्या पडत्या काळात व विशेषतः उत्तर पेशवाईत लुटालूट करून उदरनिर्वाह करणाऱया टोळ्यांस ही संज्ञा अठराव्या शतकात रूढ झाली. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल तज्ञांत मतभेद आहेत. हिंदुस्थानातील ठग, पेंढाऱयांप्रमाणेच लूटमार करणाऱया ब्रिगांड, प्रीबूटर, बँडिट, प्रीलान्स, डकॉइट इत्यादी संघटित टोळ्या पश्चिमी देशांच्या इतिहास काळातही उदयास आल्या. ठग, पेंढाऱयांच्या टोळ्या अस्तित्वात येण्यास काही मूलभूत कारणे होती.

कपटी किंवा धूर्त या अर्थाच्या संस्कृत ‘स्थग’ या शब्दापासून ‘ठग’ किंवा ‘ठक’ हे शब्द बनले आहेत. अचानकपणे व मनुष्य बेसावध असताना त्यास गळफास लावून ठार करण्याच्या कृत्याला ठगी म्हणतात. ठग व ठगीची उत्पत्ती कशी झाली याची एक दंतकथाही आहे. रक्तबीजासुराशी कालीने युद्ध सुरू केले; पण त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून असुर निर्माण होत व त्यांच्याही रक्तापासून असुर उत्पन्न होत. तेव्हा देकीने स्वतःच्या घामातून दोन पुरुष निर्माण केले. त्यांना स्वतःच्या पिवळ्या वस्त्राचा एक पट्टा दिला. त्या पट्टय़ाने त्या पुरुषांनी असुरांना गळफास लावून ठार मारले. देवी प्रसन्न झाली आणि तिने मनुष्यांना फास लावून ठार मारण्याची व त्यांची संपत्ती घेण्याची आज्ञा त्या दोन पुरुषांना दिली. ठग हे त्या दोन पुरुषांचे वारस होत. या दंतकथेचे मूळ सप्तशतीत सापडते, पण या कथेला कोणताही आधार नाही.

संघटित काटमारीची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मध्ययुगीन इतिहासकार झियाऊद्दीन बरनी याने जलालुद्दीन खिलजीच्या कारकीर्दीत (1290-96) एक हजार काटमाऱयांच्या टोळीचा निर्देश केला आहे. बंगालमध्ये या काटमाऱयांना हद्दपार करण्यापूर्वी त्यातील प्रत्येकाच्या पाठीवर ओळख पटावी म्हणून डाग देण्यात आले. औरंगजेबाच्या काळात आलेला एक युरोपीय प्रवासी जॉन प्रायर याने काटमारी करणाऱया टोळ्यांचा उल्लेख केला आहे. सतराक्या शतकातील झां बातिस्त ताव्हेर्न्ये या प्रेंच प्रकाशाला ठगीची पुसट माहिती असावी असे त्याच्या लेखनावरून वाटते. ठगांचा खरा उपद्रव अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मोठय़ा प्रमाणात वाढला. पेंढारी व इतर लुटारू जनतेची लूटमार करीत. तत्कालीन संस्थानिक व त्यांचे अधिकारी लुटारूंना वचकून असत. अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजी सत्ता स्थिर होऊ लागली होती. 1799च्या सुमारास इंग्रज-टिपू युद्धसमयी इंग्रजांना प्रथम ठगीचा सुगावा लागला. पेंढारी, ठग, डाकू यांचा उदय व इंग्रजी सत्तेचा विस्तार यांचा अन्योन्य संबंध दिसतो. वाढत्या इंग्रजी सत्तेमुळे देशातील विस्थापित राजांचे सैनिक बेरोजगार झाले. त्यांपैकी बरेच जण डाकूगिरीकडे कळले.

गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंगने 1829 च्या सुमारास ठगीच्या निर्मूलनाची मोहीम हाती घेतली. बंगाल सेनेचा एक अधिकारी कॅप्टन विल्यम स्लीमन याने प्रत्यक्ष कामगिरी बजाकली. त्याचा सहकारी विल्यम थॉर्नटन याच्या अहवालानुसार ठगांविषयी रंजक माहिती मिळते. त्यात म्हटलेय की, मध्य हिंदुस्थान, मैसूर व अर्काट या प्रदेशांत ठगीचा सुळसुळाट होता. 300 ठगांची एक टोळी असे; परंतु बळी घेण्याच्या कामगिरीसाठी ते छोटे गट करीत व सावज हेरल्यावर ते गट एकत्र येत. यात्रेकरूच्या मिषाने ते निःशस्त्र हिंडत. सावज हेरल्यावर त्याच्याशी मैत्री करत. पुढाऱयाचा इशारा मिळताच बेसावध असलेल्या सावजाकर हल्ला करून एका टोकाला गाठ असलेल्या पिवळ्या रुमालाने त्यांना फास देऊन, पायाला झटका देत व त्यांची मान मोडून रक्त न सांडता त्याचा बळी घेत. गळफासाला ‘नागपाश’ म्हणत. आधीच उकरलेल्या खड्डय़ात त्यास पुरत. जंगल व त्यातील वाटा, कोरडे ओढे-नाले, वाळवंटी जमीन अशा जागी ठगी केली जाई. स्लीमनला आधी उकरून ठेवलेले असे 254 खड्डे सापडले होते. प्रेते गाडण्याच्या जागेस ‘भीळ’ म्हणत. यात्रेकरूंच्या खबरी काढण्याचे काम करणाऱयास ‘सोदे’ म्हणत. जे वेषांतर करण्यात पटाईत असत. नाचगाणे करणारे लोकही ठगांच्या या टोळीसोबत असत. त्यांचा कार्यक्रम शिगेला गेला की भटोटे, शमसे नियोजित जागी जात आणि ठराकिक ध्वनी करत. ठगांच्या भाषेत याला ‘झिरणी’ म्हणत. बऱयाच वेळा रुमालाची पट्टी करून त्याच्या बरोबर मध्यात एक जड नाणं ठेवून गळा आवळताना ते नाणं बरोबर नरडय़ावर आणून श्वासनलिकेवर अतिरिक्त दाब दिला जायचा. त्यामुळे श्वास त्वरेने संपायचा. ठगीचा धंदा गुप्त ठेवला जाई व कित्येकदा घरातील बायकांनाही त्याची कल्पना नसे.

ठगांच्या बंदोबस्तासाठी स्लीमनने दोन उपाय योजले होते. ठगांच्या टोळ्यांत सामील होणाऱयास जन्मठेप देण्याचा कायदा आणि ज्या ठगाचा गुन्हा पूर्णपणे सिद्ध झाला होता, त्यास माफीचा साक्षीदार बनवून त्याच्याकडून इतर ठगांची माहिती मिळविणे. अशा उपायांनी 1831 ते 1837 या सात वर्षांत तीन हजार ठगांना शिक्षा करण्यात आली व अनेकांना फाशी देण्यात आले. 1840 मध्ये स्लीमनचा ‘रिपोर्ट ऑन द ठग गँग्ज’ हा अहवाल प्रसिद्ध झाला. 1840 सालापूर्वीच्या तीनशे वर्षांच्या काळात सुमारे 40 हजार माणसे ठगांच्या गळफासाला बळी पडली असावीत असा अंदाज केला जातो.

खरे तर ब्रिटिशांनी जेव्हा आपले साम्राज्य विस्ताराचे मनसुबे अमलात आणले तेव्हा त्यांना राजामहाराजांशी फारसे लढावे लागले नाही, पण त्यांच्या वाहतुकीपासून ते साधनसंपत्तीच्या लुटीपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांना कसून विरोध स्थानिक आदिवासींनी केला. ईशान्यपूर्व हिंदुस्थानात नागा, मिझो, लुशाई, मिशिपी, दफम्त इत्यादी जमातींनी, छोटा नागपूर येथे तमाड जमातीने, बिहारमध्ये मुंडा, कोल, खैरनार, संथाल इत्यादी जमातींनी तर राजस्थानात भिल्ल जमातीने इंग्रजांच्या कारकायांना कडाडून किरोध केला होता. त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना ठगीच्या कायद्यात अडकवत त्याला धार्मिक झिलई दिली.

अनेक जातींचे लोक ठगीचे काम करत असूनही ब्रिटिशांनी ठग नावाचा वर्ग निर्माण करत त्यात जातींना कोंबले आणि त्यांच्या माथ्यास कलंक लावला. ठगांच्या बंदोबस्तासाठीच्या कायद्यासारखाच आणखी एक कायदा ‘क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ 12 ऑक्टोबर 1871 रोजी ब्रिटिशांनी केला. या कायद्याद्वारे देशभरातील 161 जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरवले. त्यांच्यावर गुन्हेगारीचे शिक्के मारून त्यांचे आयुष्य नासवले आणि जनमानसात त्यांची प्रतिमा कायमची मलीन केली. या सर्व 161 जातीजमातींच्या लोकांचा अनन्वित छळ केला गेला. त्याला स्त्रिया, बालके आणि वृद्धदेखील अपवाद नव्हते. आधी काही राज्यांपुरता असणारा हा कायदा 1924 मध्ये संपूर्ण देशात ‘क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट,1924’ या नावाने लागू झाला. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा या कायद्यान्वये गुन्हेगार गणल्या गेलेल्या 127 जमातींचे 13 दशलक्ष लोक अटकेत का फरार होते. देशाच्या लोकसंख्येचे तत्कालीन प्रमाण काढले तर दर 33 व्यक्तीमागे एक व्यक्ती या कायद्याने पीडित होती. यावरून याची व्याप्ती लक्षात यावी. 1949 मध्ये हा कायदा हटवण्यात आला. 1952 मध्ये या कायद्यान्वये गुन्हेगार घोषित केलेल्या या सर्व जमातींना त्यातून मुक्त करण्यात आले, पण त्यातदेखील या जमातींची एक फसवणूक झाली आणि ‘हेबिच्युअल ऑफेंडर्स अॅ्क्ट,1952’ हा नका कायदा माथी मारण्यात आला. आधीच्या कायद्यातून कगळण्यात आलेल्या जाती-जमातीची यादी राज्य सरकारांना जाहीर करण्यासाठी 1961 साल उजाडावे लागले. हे सर्व होईपर्यंत जाती-पोटजाती आणि जमाती यांच्या विनाशक उतरंडी जीव लावून सांभाळणाऱया विविध धर्मांतील ‘सहिष्णू’ लोकांनी या गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या सर्व लोकांना स्कातंत्र्योत्तर छळवादाचे नवे चटके दिले. त्याचे घाव आजही या जातीजमातींच्या जुन्या पिढीच्या मनातून गेलेले नाहीत. आजही 313 भटक्या आणि 198 विमुक्त जाती आपल्या देशात यान्वये नमूद आहेत. ठग समूळ नष्ट झाले, पण या लोकांच्या माथी ब्रिटिशांनी मारलेले शिक्के आजही तितक्याच प्रबळतेने समाजात दिसून येतात. त्यावर कुणीच आवाज उठवत नाही आणि आजही हे समाज शोषितांच्या रांगेत आहेत.

– [email protected]