रंगभूमी – अलविदा 2022, स्वागत नवं वर्षाचं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय कुळकर्णी

2022 वर्ष संपत आलं. हे वर्ष मराठी नाटय़सृष्टीसाठी सकारात्मक अनुभव देणारे, उत्साह वाढवणारे ठरले. कायम हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या मराठी नाटय़सृष्टीचा हा एक आढावा.

नाटय़सृष्टीत नाटकांची निर्मिती करणारे निर्माते पुष्कळ आहेत. त्याची गणती करण्यास गेलो तर गणतीच करीत बसेन. 2022 वर्ष नाटय़ निर्मात्यांना तेजीत जरी गेलं नसलं तरी नाटकांची निर्मिती मात्र होताना दिसली. दरवर्षी 60 ते 65 नाटकांची होणारी निर्मिती या वर्षी दिसली नाही. लॉकडाऊनच्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत निर्मिती झाली नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर निर्माते सावरले आणि या वर्षी पूर्वी निर्मिती झालेल्या नाटकांचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांचा प्रतिसाद नाटकांना मिळाला. कारण प्रेक्षकांना त्या कालावधीत नाटकं पाहण्यास मिळालेली नव्हती. प्रशांत दामले यांच्या नाटकांना हाऊस फुल्लचे बोर्ड लागले. प्रशांतच्या नावाला बुकिंग असल्यामुळे त्याला समाधान हे नेहमी मिळत गेले. वर्षा उसगावकरने 35 वर्षांनंतर पुन्हा ‘सारखं काही तरी होतंय’ या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केलं. प्रेक्षकांनी त्याचं धिम्या गतीने स्वागत केलं. प्रशांतनी त्याच्या कारकीर्दीतील 12500 वा प्रयोग सादर करून एका नव्या विक्रमचा पाया रोवला. तो ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग करीतच होता. त्यांनी निर्मिती केलेलं ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे प्रयोग सुरूच होते. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली आणि प्रशांत दळवी या नाटककाराची ‘संज्या छाया’ आणि ‘चारचौघी’ ही दोन नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर या वर्षी आली. ‘संजा छाया’ नाटकाने शतक महोत्सवसुद्धा साजरा केला. ‘चारचौघी’नी हाऊसफुल्लचा इतिहास घडवला. अजूनही हाऊसफुल्लचा बोर्ड उतरलेला नाही. विजय केंकरे आणि नीरज शिरवईकर या दोघांची दिग्दर्शक आणि नाटककार ही युती झालेली या वर्षीही दिसली. ती अनेक वर्षे टिकावी असं मनोमनी वाटतं. त्यांचं ‘यू मस्ट डाय’ हे थरार नाटक आलं. त्याचं स्वागत प्रेक्षकांनी केलं. त्याच्या ‘परफेक्ट मर्डर’ या नाटकाचे प्रयोग जोरात सुरू आहेत.

यंदाच्या वर्षी नाटकाचा ओघ यापूर्वीसारखा जरी नसला तरी पुढल्या वर्षी येणाऱ्या दर्जेदार नाटकाची चाहूल मात्र दिसून आली. वर्षाच्या प्रारंभी ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकाने यशस्वी वाटचाल करून तरुण लेखकांना एक आनंद दिला. नवीन लेखिका असूनही नाटकानं चांगलेच यश संपादन केले. ‘छुपे रुस्तम’ आणि ‘हसता हा सवता’ ही नाटकं कधी आली आणि गेली ते समजलंच नाही. वाकडी तिकडी, सुंदरा मनामध्ये भरली, हौस माझी पुरावा या नाटकांनी रसिकांचे मनोरंजन करता करता हसविले. संतोष पवार यांच्या सुंदरा आणि हौस नाटकात त्याचा तोच जरी फॉर्मुला असला तरी नाटक सुसह्य होतं. तो एका लोकनाटय़ात भूमिका करणार आहे असं ऐकिवात आहे. नव्या वर्षात त्याचा शुभारंभ होतोय. ‘मी, स्वरा आणि ती दोघं’ या नाटकानं बुकिंग चांगलं घेऊन प्रेक्षकांना नाटय़गृहाकडे वळविले. ‘हीच खरी प्रेमाची गंमत आहे’ या संतोष पवार लिखित नाटकाने एक वेगळीच धमाल आणली. ‘खरं खरं सांग’ नाटकाचे प्रयोग होताहेत तर ‘दादा गुड न्यूज आहे’ नाटकाने 300 प्रयोगांचा टप्पा पार केलाय. मुक्ता बर्वे हिच्या ‘प्रिय भाई एक कविता हवी आहे’ या अभिवाचनाने काव्यात्मक नाटय़ानुभव दिला. ‘चर्चा तर होणारच’ या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. ‘सफरचंद’ नाटकाच्या संदेश बेंद्रे यांच्या नेपथ्यामुळे नाटक पाहताना सुखद नाटय़ानुभव दिला. समांतर रंगभूमीवर चवीपुरतीच प्रायोगिक नाटपं सादर होताना दिसली. त्यांना हक्काचा असा रंगमंच नाही हे त्यांचं दुःख मात्र अजूनही कुणीही सोडवू शकलेलं नाही. एकंदरीत जी नाटकं या वर्षी वर्षाच्या सुरुवातीला आली त्यांचे प्रयोग सुरू आहेत. यावरून प्रेक्षक नाटय़गृहाकडे वळलेत हे सिद्ध होतंय. त्यांना दर्जेदार नाटकं दिली तर ते येतात हे निर्मात्यांनी समजणे इष्ट ठरेल.

विजय केंकरे यांनी दिग्दर्शनाच्या कारकीर्दीत आपल्या 100 वे नाटक दिग्दर्शन करण्याचा मानाचा शिरपेच रोवला. हा एक रेकॉर्डसुद्धा धरायला हरकत नाही. व्यावसायिक रंगभूमीवर अशा प्रकारची नाटकं सादर होत असल्यामुळे ती नाटपं पाहण्याची सवय प्रेक्षकांना झालीय. ‘38 कृष्ण व्हिला’ या आलेल्या नाटकाने आपलं वेगळंपण जपलं. डॉ. गिरीश ओक यांचं ते 60 वे नाटक. ‘काळी राणी’ हे त्यांचं नवीन नाटक जे याच महिन्यात आलं आणि त्यांनी 6666 प्रयोगापर्यंतची रंगभूमीवरची व्यावसायिक वाटचाल पूर्ण केली. कुमार सोहोनी यांनीसुद्धा त्यांच्या दिग्दर्शन कारकीर्दीची 50 वर्षे पूर्ण केली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाटय़-चित्रपट कारकीर्दीला याच वर्षी 50 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे हे ‘रेकॉर्डचं वर्ष’ बहुधा असावं. ‘तो मी नव्हेच’ या नाटकाला 60 वर्षे पूर्ण झाली. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकानं याच वर्षी 50 वर्षे पूर्ण करून 51 व्या वर्षात पदार्पण केलं. प्रशांत दामले आणि कुमार सोहोनी यांना संगीत अकादमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामुळे 2022 वर्षाला महत्त्व आलं. म्हणूनच वर्ष संपता संपता त्याला सॅल्यूट हे करावंच लागेल. बालनाटय़ाच्या विश्वात लहान मुलांना गुंगविण्यात राजू तुलालवार आणि बालनाटय़ करणारी मंडळी बिझी दिसली. ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ाचे प्रयोग जोरात सुरू आहेत.

अशोक हांडे त्यांच्या चौरंग संस्थेतर्फे गाण्यांच्या कार्यक्रमात वेगवेगळे प्रयोग करताना दिसला. स्नेहल भाटकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ‘स्वर स्नेहल’ हा कार्यक्रम सादर केला. हिंदुस्थानच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आझादी 75’ हा कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनास मानवंदना दिली. लता दीदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अमृत लता हा कार्यक्रम सादर करून त्यांना आदरांजली वाहिली. ‘मराठी बाणा’चे प्रयोग करीत असताना त्यांनी आता ‘आवाज की दुनिया’चे प्रयोग सुरू केलेत. त्याला मार्केटिंग मस्त जमत असल्यामुळे त्याची चौरंग संस्था कलाकारांना स्वस्थ बसू देत नाही.

नवीन वर्षाच्या स्वागताला निर्माते सज्ज झाले आहेत. नव्या वर्षात निर्मात्यांना नाटकांची निर्मिती जोशात करायची आहे. त्यांना प्रेक्षकांच्या ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसादाची गरज आहे. सकाळ-दुपार-रात्र नाटकांचे प्रयोग नाटय़गृहात होत असतं. ते पुन्हा सुरू होवोत अशी प्रार्थना रंगभूमी देवतेस निर्माते करताहेत. नव्या वर्षी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्यांच्यातील वाद मिटावा आणि त्यांचे हक्काचे यशवंत नाटय़मंदिर जोमाने सुरू व्हावं असं गाऱहाणंसुद्धा ते नव्या वर्षाच्या स्वागताला घालणार आहेत. 2023 हे नवं वर्ष नाटय़निर्मात्यांना आणि रंगकर्मींना सुखाचे, समाधानाचे आणि भरभराठीचे जावो हीच भावना प्रत्येकाची आहे.

 [email protected]