पेटंट स्पेशालिस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे

नॅनो तंत्रज्ञान क्षेत्रात खूपच नवनवीन कल्पना शोधण्यासाठी अथक प्रयत्न करणारे प्रा. सूद हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षकही असून तरुणांसाठी एक अखंड ऊर्जेचा झरा असलेले आयकॉन आहेत….

प्रा.अजयकुमार अर्थात ए. के. सूद हे दोन अमेरिकन आणि पाच हिंदुस्थानी पेटंट अर्थात एकस्वाचे धनी असलेले हिंदुस्थानी भौतिकशास्त्र्ाज्ञ असून नॅनो तंत्रज्ञान आणि ग्रॅफीन विषयातील नामवंत संशोधक आहेत. बंगळुरू इथल्या हिंदुस्थानी विज्ञान संस्थेत सन्माननीय मानद प्राध्यापक असून हिंदुस्थान सरकारने 2013 साली त्यांना पद्मश्री या चौथ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पारितोषिकाने त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित केले होते.

प्रा. ए. के. सूद यांच्याशी गप्पा मारण्याची संधी लाभली. ग्वालियर (म.प्र.) इथे जन्मलेले प्रा. सूद यांनी आपल्या सुरुवातीच्या शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘मी पंजाब विद्यापीठामधून (चंदिगड) भौतिकशास्त्र्ाात बी.एस्सी (ऑनर्स) झालो ते 1971 साली. त्यानंतर मी पुढच्याच वर्षी एम.एस्सी (ऑनर्स) देखील तिथूनच पूर्ण केले. 1973 मध्ये मी इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटॉमिक रिसर्च, कल्पक्कमे इथे वैज्ञानिक म्हणून रुजू झालो. तिथे मी 1988 पर्यंत कार्यरत होतो. त्याच वेळी मी आय.आय.एस्सी.मध्ये संशोधनात सहभागी होतो. मी 1982मध्ये तिथून पी.एच.डी.देखील मिळविली. 1983 ते 1985 या काळात मी मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट (स्टुटगार्ट जर्मनी) इथे पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून काम केले. 1988 साली मला भारतीय विज्ञान संस्थेत सहयोगी प्राध्यापक म्हणून ऑफर देण्यात आली. ती मी स्वीकारली. 1994 साली मला प्राध्यापकपदी बढती देण्यात आली. त्यानंतर 1998 मध्ये मी संस्थेच्या फिजिकल आणि मॅथेमॅटिकल सायन्सेस डिव्हिजनच्या अध्यक्षपदी रुजू झालो. त्या पदावर मी 2008 पर्यंत होतो.

प्रा. सूद 1993 पासून बंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्चमध्ये मानद प्राध्यापकदेखील आहेत. ते सध्या बंगळुरूलाच स्थायिक असून इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे (एफएएस्सी) 1991 पासून तर इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमीचे 1996 पासून आणि वर्ल्ड ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे 2002 पासून फेलो आहेत. सध्या ते द वर्ल्ड ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस आहेत. प्रा. सूद यांचा संशोधनाचा आवाका खूपच मोठा असून त्यांनी आतापर्यंत 210 पेक्षा जास्त शोधनिबंध आणि पेपर्स विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पिअर रिह्यूड जर्नल्समध्ये प्रकाशित केले असून काही पुस्तकाच्या स्वरूपातदेखील प्रकाशित झाले आहेत. प्रा. ए. के. सूद यांना मात्र विविध शास्त्र्ातीच्या स्मरणार्थ दिलेली व्याख्याने खूपच भावतात. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘1998 साली मला सर्वप्रथम शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. 1998 मध्ये मला भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये प्लॅटिनम ज्युबिली व्याख्यान देण्याची संधी लाभली. 2000 साली प्रा. के. रंगधामा राव स्मृती व्याख्यान इंडियन नॅशनल सायन्स अकादमीत तर 2003 साली ब्रह्मप्रकाश स्मृती व्याख्यान भारतीय धातू संस्थेच्या कमाक्कम शाखेत मी दिले. 2004 साली एनसीएल पुणे इथे जेम्स विल्यम ऍक्वेन पुरस्कार व्याख्यान तर कोलकाता येथील इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन ऑफ सायन्समध्ये 2009 साली प्रा. मेघनाद साहा स्मृती व्याख्यान 2010-11 मध्ये अणुऊर्जा विभागाचे सी. व्ही. रामन व्याख्यानदेखील त्यांनी भारतीय भौतिकी संस्थेत दिले.

प्रा. ए. के. सूद यांनी (हार्ड) टणक कन्डेस्ड मॅटर आणि सॉफ्ट कन्डेन्स्ड मॅटर फिजिक्स या क्षेत्रात व्यापक संशोधन केले असून यात रामन स्कॅटरिंग आणि नॅनो तंत्रज्ञान यावर त्यांचा विशेष भर राहिलेला आहे. त्यांनी दैनंदिन वापराबरोबरच वैज्ञानिक उपयोगासाठी अनेक नवप्रवर्तनासहित महत्त्वाचे संशोधन केलेय. त्यांनी 2003 मधील अनेक प्रयोगांद्वारे विविध घन पदार्थांतून द्रव प्रवाहित करून किंवा नॅनोटय़ूबद्वारे प्रवाहित करून विद्युत संदेश निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण संशोधन केले. या उपपत्तीस संपूर्ण वैज्ञानिक विश्वात ‘सूद परिणाम’ म्हणून ओळखले जाते. प्रा. सूद यांनी त्यांच्या भारतीय विज्ञान संस्थेतील सहकारी शास्त्र्ाज्ञांबरोबर सेमीकंडक्टर सुपर लॅटिसेस, फुलरीन्स, सॉलिड सी 60, सी 70 आणि एकेरी भिंतीच्या (सिंगल वॉल्ड) नॅनोनळ्यांविषयी प्रयोग करून ऑप्टिकल फोनॉन्स सारख्या नवीन संकल्पना शोधून काढल्या आहेत. त्यांनी एकेरी भिंतीच्या नॅनोनळ्यात द्रव प्रवाहाद्वारे व्होल्टेज आणि करंट प्रवाहाला नळीच्या मिलीलगत प्रवाहित करण्यात यश मिळवलंय.

प्रा. सूद यांनी सॉफ्ट कन्डेस्ड मॅटर फिजिक्सविषयी संशोधन करून मायसेल या व्हिस्कोलस्टिक जेल्ससंदर्भात खूप मोठी कामगिरी बजावली आहे. संशोधनाविषयी अधिक बोलताना ते म्हणाले, ‘मी एक वैद्यकीय डायग्नोस्टिक किटदेखील शोधून काढला असून तो विविध रोगांविषयीचं रोगनिदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सध्या मी नॅनोनळय़ांचं वजन न वाढविता एखाद्या पदार्थाची व्हिस्कॉलिटी वाढविण्याच्या कामी कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला हलक्या वजनाची परंतु मजबूत चिलखतं (बुलेटप्रुफ वेस्ट्स) अधिक कार्यक्षमतेसाठी तयार करता येतील. प्रा. सी. एन. आर. राव यांच्यासोबत मी गॅफीनबाबत एका महत्त्वाच्या शास्त्रीय पुस्तकातील लिहिलेले एक प्रकरण 2013 साली प्रकाशित झालंय.

– [email protected]