
>> शशिकांत सावंत
मराठी साहित्य संमेलन होण्याआधी आणि नंतरचा काळ हा वादविवाद, परस्पर विरोधी मतं, आरोप, प्रत्यारोप यांचा असतो. याचवेळी सुरू असणारी जयपूर फेस्टिवल, चैन्नईचा हिंदू फेस्टिवल, टाटा फेस्ट, अगदी भूतानमध्येही होणारा लिटररी फेस्टिवल, कोलकाता फेस्टिवल मात्र वेगळ्या कारणांनी चर्चेत राहतात. या संमेलनांमधील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेत मराठी साहित्य संमेलनात नेमका कोणता बदल व्हायला हवा याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
मराठी साहित्य संमेलन येण्याआधी वादविवाद सुरू होतात ते अगदी संमेलन संपल्यावरसुद्धा सुरूच राहतात. याच काळात जयपूर फेस्टिवल, चैन्नईचा हिंदू फेस्टिवल, टाटा फेस्ट, टाइम्स ऑफ इंडियाचा फेस्टिवल, भूतानमध्ये होणारा लिटररी फेस्टिवल, कोलकाता फेस्टिवल असे महत्त्वाच्या शहरांत फेस्टिवल होत असतात. याचं नेतृत्व जयपूर फेस्टिवलकडे जातं. वर्षानुवर्ष जयपूर फेस्टिवल एका शिस्तीत चालू आहे आणि अनेक क्षेत्रातील दिग्गज लेखक मग ते नोबेल पारितोषिक विजेते मायकेल ओडांतजी असो किंवा पाउलो कोहलो हे सारेच इथे हजेरी लावतात. शोभा डेंपासून ते भालचंद्र नेमाडेंपर्यंत अनेक लेखक इथे तुम्हाला मंचावर दिसतील.
पवन वर्मांपासून ते अगदी एकच पुस्तक लिहिलेल्या मीनल बघेलपर्यंत अनेक माणसं इथे येतात. विल्यम डार्लमपाइल, नमिता गोखले यांनी पुढाकार घेऊन हा फेस्टिवल सुरू केला. आज त्याला जागतिक दर्जाचं रूप प्राप्त झालेलं आहे. वक्ते असे कसलेले असतात की, वर्गात लेक्चर घ्यावं तसं ते बोलतात आणि प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही होतो. या शिस्तीमुळेच जयपूर फेस्टिवल आणि साहित्य संमेलन यांतला फरक दृगोचर होतो. पसरटपणा आणि ऐसपैसपणा हे आपलं वैशिष्ट्य साहित्य संमेलनात दिसतं. उलट आटोपशीरपणा आणि इंग्रजी भाषेत जशी एक औपचारिकता आणि जेवढय़ास तेवढं आहे,
भूतानसारख्या देशात आजही फेस्टिवल होतो आणि अनिंदिता घोषसारखी नव्या लेखिकेलाही ते बोलावतात. फेस्टिवलचे अनेक फायदे आहेत. साहित्य संमेलांनामध्ये कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होती, पण आपण पाहिलं तर विक्रम शेठ, रामचंद्र गुहा यांना मिळालेला आगामी मानधनच सवा कोटी किंवा ऐंशी नव्वद लाख इतपं होतं. म्हणजे एका लेखकाला मिळालेल्या मानधनाइतकी विक्री झाली. त्यातून नफा किती? येण्याजाण्याचा खर्च किती? हे ज्याने त्याने ठरवायचं. उलट पेंगविनपासून अनेक प्रकाशनाचे लिटफेस्टमध्ये स्टॉल्स असतात. फेस्टिवलमध्ये ज्या ज्या लेखकांची भाषणं होतात, त्याच्याबाहेर त्यांची पुस्तपं ठेवण्यात येतात आणि एक तासभर तरी तो आपल्या पुस्तकांवर सही करण्यासाठी बसलेला असतो. यामुळे त्या त्या लेखकांची पुस्तकं प्रचंड खपतात. असा कुठलाही उपक्रम मराठी साहित्य संमेलन करत नाही. म्हणजे संमेलनाला रंगनाथ पठारे गेले म्हणून त्यांची पुस्तपं खपली असं होत नाही.
संमेलनात खरेदी करणाऱ्या पुस्तकावर संमेलनात आलेल्या साहित्यिकाची सही हवी असेल तर पुस्तकं खरेदी करा. हा मंत्र रूपारेलच्या साहित्य संमेलनात पहिल्यांदा दिला गेला. 1983 सालचं हे नियोजित साहित्य संमेलन रायपूरला झालेल्या गंगाधर गाडगीळ यांच्या अध्यक्षेतेखालच्या संमेलनाला विरोध म्हणून ते बंडखोर संमेलन होतं, पण त्यात स्वतः गाडगीळ यांच्यासकट ते पु. ल. देशपांडेपर्यंत सगळे साहित्यिक हजर होते. मालतीबाई बेडेकर अध्यक्ष झाल्या. त्याही निवडणुकीतून नव्हे, तर नेमणुकीतून. विलक्षण परिसंवाद झाले. तर हा जो दर्जा होता तो जयपूर फेस्टिवलशी समांतर होता. त्यात ना फार खर्च होता, ना फार वादावादी अशा पद्धतीचं फेस्टिवल असं स्वरूप साहित्य संमेलनाला आलं असतं तर चांगलं झालं असतं.
साहित्य संमेलन संस्कृती मंडळ अनेक वर्षे संमेलनांना अनुदान देतं. विशेषतः छोटय़ा संमेलनांना. त्यात एक मुद्दा असा मांडला की, या संमेलनाच्या एका तरी प्रतिनिधीने जावं. कारण अनेक जण एखाद् दोन लाख रुपये घेतात आणि एक दिवसच संमेलन करतात, ज्यात दोन-तीनच कार्यक्रम असतात. एक कविता संमेलन, एक भाषण आणि जेवण एवढय़ावर संमेलन आटोपतं. जर मंडळाचे प्रतिनिधी हजर राहिले तर किमान काही शिस्त त्याला लागेल. मी स्वतः त्याप्रमाणे प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षेतेखालच्या संमेलनाला गेलो आणि ते खूपच आटोपशीर आणि सुंदर होतं. या प्रकारची संमेलनं आपल्याकडे अधिकाधिक व्हायला हवीत.
हिंदू फेस्टिवल असेल किंवा टाटा लिटफेस्ट या फेस्टिवलचं वैशिष्टय़ म्हणजे त्यात भरघोस रकमेचे पुरस्कारही असतात. नायपॉल यांना लिटफेस्टमध्येच जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. अनेक नव्या लेखकांना फेस्टिवलमध्ये लाखालाखांची बक्षिसं मिळाली. त्याचं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध कवी, इंग्रजी कवी, जीत थाईल ज्याच्या कादंबरीला कित्येक लाखांचा पुरस्कार मिळाला. मॅन बुकर पुरस्कार हा केवळ इंग्रजीतील साहित्याला दिला जातो. उलट अनेक पुरस्कार हे अशा फेस्टिवलमध्ये अनुवादित कादंबऱ्यांनाही मिळतात. त्यामुळे लेखकांना पुरस्कार मिळण्याची संधी मिळते. पुरस्काराची रक्कम कदाचित खूप मोठीही नसेल, पण पुरस्कारामुळे पुस्तकाचा गाजवजा होतो. समीक्षकांना आणि प्रतिनिधींना दखल घ्यावीशी वाटते. शिवाय वाचकांनाही पुरस्कार मिळालेली पुस्तपं अधिक महत्त्वाची वाटतात. बुकरला पारितोषिक मिळालं की, त्याचा खप वाढतो, यावरून हे सिद्ध होतं.
साहित्य संमेलनाने असा एखादा पुरस्कार ठेवायला काय हरकत आहे? मानधनाप्रमाणेच अशा पुरस्कारांमुळे लेखनात नवीन प्रयोग केले जातील. मराठी साहित्यक्षेत्रासात अशा उपक्रमाची आज गरज आहे. जयपूर फेस्टिवल वा इतर फेस्टिव्हल आणि मराठी साहित्य संमेलनातील असे फरक भरून काढण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत.
आता जयपूर फेस्टिवलची वैशिष्ट्ये सांगितल्यावर मराठी संमेलनाची वैशिष्ट्ये सांगायलाच हवी. एकतर आपल्या संमेलनाला दीर्घ परंपरा आहे. शिवाय आपल्याकडे साहित्यिकाला एक वेगळाच मान आहे. अगदी विजेत्या इंग्रजी साहित्यिकांनाही अनेकदा कोण ओळखत नाही, जयपूर फेस्टिवलमध्येही. उलट आपल्याकडे ग. दि. माडगूळकरांसारख्या कवीला पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.
यामुळेच खूपदा असं होतं की, आपल्याकडचं साहित्याकांचं स्थान अनन्यसाधारण आहे. जयवंत दळवींचा सत्कार झाला. त्याला पु. ल. देशपांडे हजर होते. सभागृहात ओसंडून गर्दी होती. लोक उभे राहिले होते. सर्वांना दळवींना बघायचं होतं. त्यानंतर अल्पकाळात दळवी गेले, पण कित्येक रसिक वाचकांची इच्छा पूर्ण झाली. एकेकाळी चॅनेल्स नव्हती, मीडिया नव्हता. आज मीडियामुळे साहित्य संमेलन सर्वत्र पोहचतं. लाखालाखांची गर्दी होते. हे खरं आहे की, जेवणावळींची चर्चा होते. काही जण उपाशी राहिल्याची चर्चा होते, पण इतक्या मोठय़ा संमेलनात सर्व व्यवस्था अचूक करणे हे कोणालाही अशक्य आहे. उलट जयपूरचे वगैरे फेस्टिवल आटोपशीर असतात. राहण्याची व्यवस्था हॉटेलात असते. जेवणाचे पैसे दिलेल्या प्रतिनिधींनाच जेवणाची सोय उपलब्ध होते. आपल्याकडे सगळ्या गोष्टी मोफत अशी प्रथा असल्यामुळे साहित्य संमेलनात मोफत घुसायचा मोठा पायंडा आहे. शिवाय सेलिब्रेटींना पाहायलाच लोक संमेलनात येतात. रामदास भटकळ यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला फारसे लोक नव्हते. पुढच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, ही गोष्ट काय दर्शवते? उलट फेस्टिवल्समध्ये प्रत्येक सत्र हे प्रेक्षकांनी भरलेलं असतं. शिवाय मायकेल सेंडलपासून ते सायमन आर्मीटाजपर्यंत अनेक लेखक तुम्हाला समोरासमोर भेटतात, त्यांच्याशी बोलता येतं, सही मिळते. खऱया वाचकाला आणखी काय हवं असतं?





























































