बायको आणि उंदीर

>>शिरीष कणेकर

उंदीर मांजराला घाबरतो. मांजर कुत्र्याला घाबरतं. कुत्रा मालकाला घाबरतो. मालक बायकोला घाबरतो. बायको उंदराला घाबरते.

चला, वर्तुळ पूर्ण झाले. बायको उंदरासारख्या क्षूद्र प्राण्याला घाबरते या वस्तुस्थितीमुळे नवऱ्याला आतून उकळ्या फुटत असतात. (तो बायकोसमोर उंदीर आहे असे कोणी म्हणालं तरी त्याला त्यात आपला बहुमानच वाटतो.) त्याला राहून राहून वाटतं की, घरात चार-सहा उंदीर सोडावेत व बायकोला भयानं चित्कार काढत टणाटणा उड्या मारताना बघावं. बायको आपल्या तालावर नाचत्येय असाही स्वतःचा भ्रम तो करून घेऊ शकेल. बायकोला सरळ करायला घरात तिची सासू असावी असा सार्वत्रिक (अप)समज आहे. त्यापेक्षा उंदीर कितीतरी चांगले. बायको उंदराशी भांडू शकत नाही. त्यामुळे उंदराशी भांडून बायको माहेरी जाऊ शकत नाही. अन् समजा गेली तर घरात नवरा व उंदीर अबाधुबी, लपालपी, आट्यापाट्या, गाण्याच्या भेंड्या काय काय खेळतील. मुख्य शत्रूच घरातून गेल्यावर सगळा आनंदी आनंद गडे! उंदीर विचार करतील की, आता कशाला कपाटाच्या मागे लपायचं? मस्त कोचावर रेलून बसावं की. नवराही समोर बसून बिनदिक्कतपणे बाटली उघडेल. स्वतः ग्लासातून पिईल व उंदराला बुचातून देईल. बुचातली दारू प्यायल्यानंतर जोर येऊन उंदीर बाटली ओढून घ्यायला निघेल. या प्रकारात बाटली पडेल व आतली दारू टेबलावर सांडेल. उंदीर व नवरा दोघंही ओणवं होऊन टेबलावरची दारू चाटू लागतील. एक बायको घरी नसल्यावर घरात किती आनंदाचे व प्राणिमात्र सहभाव निर्माण करणारे वातावरण निर्माण होते बघा.

बायकोची ही नवीन व्याख्या पहा. ‘जी उंदराला घाबरते, नवऱ्याचा उंदीर करते व तरीही त्याला भीक घालत नाही व घुशीला आई म्हणते ती.’ तुम्ही नका उगीच घाबरू. ही मी केलेली बायकोची व्याख्या आहे. ती केवळ वाचल्याबद्दल तुम्हाला कोणी चपलेनं मारणार नाही. त्यातून तुम्ही या व्याख्येला व ती करणाऱ्याला लाखोली वाहिलीत तर काय सांगावं, तुमच्या ताटात काहीतरी गोडाधोडाचं पडेलही.

आमच्याकडे किनई एक गब्दुल उंदीर होता. तो उंदरासारखा कमी व डुकरासारखा जास्त दिसायचा. त्याची चालही तुरुतुरू नव्हती, तर लुटुलुटू होती. कोणाकडून त्यानं ती चाल उचलली होती की त्या व्यक्तीला चिडविण्यासाठी तो मुद्दाम तसा चालायचा कोण जाणे! मी दोनतीनदा त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मराठी येत नसावं. मी त्याला भाड्यानं द्यावं यासाठी आमचा सोसायटीतले अनेक शामळू नवरे माझ्या मागे लागले होते. आय रिफ्युजड्. अतिवापरानं आमच्या गब्दुल उंदराची भगिनींना सळो की पळो करण्याची क्षमता कमी झाली असती. मग मला त्याचा काय उपयोग राहिला असता? त्याच्या आकारामुळे तो पिंजऱ्यात जाऊच शकायचा नाही तर आत अडकणार कसा? शिवाय पिंजरे उंदरांसाठी असतात, डुकरासारख्या दिसणाऱया उंदरांसाठी नाही. अखेर वयोमानानं त्याचं दुःखद निधन झाले. त्याच्या आप्तेष्टांना कळवायलाही वेळ झाला नाही. त्याच्या शोकसभेला मात्र उंदरांची व माणसांची सारखीच गर्दी झाली होती. बायका सोबत उंदराच्या गोळय़ा घेऊन आल्या होत्या, पण त्या शोकमग्न उंदरांना घालाव्यात की उंदरासमान नवऱ्यांना घालाव्यात हे न ठरल्यामुळे गोळ्या त्यांच्या पर्समध्येच राहिल्या. आता उद्या आठवणीनं ऑफिसात साहेबाला चहातून घालाव्यात असा विचार त्यांच्या मनात डोकावला. बायका कुठलीही गोष्ट वाया जाऊ देत नाहीत – उंदराच्या गोळ्यादेखील!

मध्यंतरी एक विनोद वाचला. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एकजण सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याला प्रश्न विचारण्यात आला, ‘‘या जगात सर्वात खतरनाक गोष्ट कोणती?’’ प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही तो सात कोटींवर पाणी सोडून खेळ सोडून गेला. का? कारण त्याला शेवटी घरी जायचंच होतं. चांगला आहे विनोद, पण यातला विनोद मला कळला नाही. आहे ते केवळ वास्तव आहे. सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे, त्याची गृहलक्ष्मी हे अचूक उत्तर त्याला माहीत होतं. त्यासाठी ‘लाइफलाइन’ घेण्याचीही गरज नव्हती. उत्तर सरळ ‘लॉक’ करून टाकायचं. पण तोंड उचकटून बोलणार कसं? घरी बायको टी.व्ही.वर बघणार, ऐकणार. म्हणजे संपलंच सगळं. खतरनाक! टी.व्ही.सारख्या माध्यमातून नवऱयांना त्यांच्या बायकांवर बोलतं करायचं असेल तर शेजारच्या खुर्चीवर जागता उंदीर मिशा फेंदारून बसवावा. मात्र त्याला हलू-बोलू देऊ नये नाहीतर बायका म्हटल्या की, चेकाळून तो त्यांना घाबरवणारे चाळे सुरू करायचा. या उंदराच्या मिश्या कापल्या किंवा निदान विराट कोहली जाहिरात करतो त्या ‘ट्रिमर’नं ‘ट्रिम’ केल्या तर बायकांना त्यांच्याविषयी वाटणारी भीती कमी होईल का? पण हे तुमच्या बायकांपाशी बोलू नका. त्यांना वाटणारी एकमेव भीती कमी करून तुम्ही काय साधणार आहात? उलट आफ्रिकेतले काही रानटी उंदीर माणसांना खातात, अंटार्क्टिकामधले (बर्फ) उंदीर माणसांना दहा मैल ओढत नेतात, रेगिस्तानमधले उंदीर स्त्रीयांचे दागिने ओरबाडून काढतात अशा कहाण्या बायकोला सांगत चला. त्यामुळेच तिच्या जुल्मी राजवटीत तुम्ही टिकलात तर टिकाल. एरवी टिकलीपुरतेच व टिकलीइतकेच तुम्हाला स्थान. आठवा तुमच्या ‘माहेर’चा तुमचा बडेजाव, रुबाब, तोरा, अरेरावीपणा…

स्त्री आई असते, बहीण असते, मुलगी असते तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम कसला, सगळं फर्स्टक्लासच असतं. त्यांच्या कोडकौतुकाचे तुम्ही धनी असता. (आईनं लेकाचा छळ केलाय असं कधी होऊ तरी शकतं का?) पण एकदा का ती बायकोच्या रूपात आली की सत्यानाश. ती नवऱ्याला कणकेच्या गोळ्यासारखी तिंबते. तो दिसला की तिच्या जिभेची तलवार होते.

आपण ‘बायको’ या मनुष्यप्राण्याला जरा जास्तच झुकतं माप दिलंय हे नंतर देवाच्याही लक्षात आलं असावं, पण आता बाण कमानीतून सुटला होता. मग शापाला उःशाप द्यावा त्याप्रमाणे बायकोवर अंकुश राहावा म्हणून त्यानं उंदराची निर्मिती केली आणि आता माणूस नावाचा नवरा देवाकडे प्रार्थना करतो, ‘‘देवा, मला पुढच्या जन्मी उंदीर कर.’’

Email: [email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या