पत्नी, सौभाग्यवती, कलत्र, बायको!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

‘स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळची माता आहे’ – इति आचार्य अत्रे.
‘क्षणाची पत्नी अनंत काळची श्वान शिक्षक व नवरा उद्धारक आहे.’ – इति मी.
‘पुरुषाला माणूस करणारी व त्याचबरोबर त्याच्यातला राक्षस जागा करणारी स्त्री आदिशक्ती आहे.’ – इति पुन्हा मी.
‘दिल्या घरी तू सुखी रहा, असं लग्नात मुलीकडचे मुलीला सांगतात, पण ‘तिकडच्यांचा सत्यानाश कर’ असं शब्दातून सांगत नाहीत’ – इति पुनः पुन्हा मी.
‘स्त्रिया पुरुषांना (हे ‘बायका नवऱ्यांना’ असे वाचावे.) जगू देत नाहीत व वटसावित्रीसारखी क्रते करून मरूही देत नाहीत’ – एक जगवलेला दुःखी जीव.
‘माझे व बायकोचे छत्तीस गुण जुळतात. तिचे पस्तीस व माझा एक – गप्प बसणे’ – पु. ल. देशपांडे.
‘मी बायकोचा वाढदिवस आठवणीनं विसरतो’ – एक जीवावर उदार झालेला निधडय़ा छातीचा पुरुष.
‘मी बायकोच्या स्वयंपाकाला चुकूनही नाव ठेवत नाही व काही चांगलं खावंसं वाटलं तर आईकडे जातो’ – मेंगळट, घाबरट, भेदरट पुरुष.
‘बायको घरात असताना मी शेजारणीकडे हावरटासारखा बघत नाही’ – एक चापलूस पुरुष.
‘बायकोबरोबर वाद घालण्यापेक्षा भिंतीवर डोकं आपटणं सुरक्षित व श्रेयस्कर’ – एक अनुभवी पुरुष.
‘बायकोच्या मेंदूचा अंदाज पुरुषाला कधीच येत नाही व पुरुषाचा मेंदू शिणवण्यापेक्षा काही वेगळी कामेही असू शकतात हे बायकांना कधीच कळत नाही’ – ‘पुरुष सुक्त’ या आता चिंध्या झालेल्या ग्रंथातून.
बायकांची देवाकडे याचना – ‘हे देवा, माझ्या नवऱ्याला पैसा, धनदौलत, यश सारं दे. माझ्यासाठी काही नको. त्याच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघते.’
‘ज्या बायकांना मोलकरणी छळतात त्या मग नवऱ्याला छळतात’ – व्हॉटस् ऍपवरील निरीक्षण.
‘तुम्ही घरात मला मोलकरणीसारखे वागवता’ असे स्त्रिया वारंवार म्हणतात तेव्हा मोलकरणीला बायकोसारखं वागवावं असा कुविचार नवऱयांच्या मनात येतो – एक त्रस्त नवरा.
‘पेशंट बघायला जातो’ असं सांगून डॉक्टर नवरा रात्री बाहेर पडतो तेव्हा भोळी पत्नी त्याच्यावर विश्वास ठेवते’ – एक स्वतः पेशंट झालेली भोळी बायको.
बायको घरात असो वा नसो, दिवसातून तीनदा तिला कान पकडून ‘माझं चुकलं-माझं चुकलं’ असं म्हणावं लागतं – अमिताभ बच्चन.
‘सासरची माणसं पाहुणी आली की, चेहऱयावर आनंद डवरून आल्याचा बेमालूम अभिनय जो नवरा करतो त्याचा समावेश देशातील श्रेष्ठ अभिनेत्यांत व्हावा’ – एक अयशस्वी नवरा.
‘माझी आई सुंदर, सुगृहिणी, सुशील, सुगरण, सुमाता’ अशी ‘सु’ची भेंडोळी बायकोनं सुरू केली की, ‘म्हणजे तुझ्यासारखीच की’ असे म्हणून संभाव्य बॉम्बची वात काढून टाकणाऱया नवऱयाला चलाख म्हणावे’ – एक चलाख नवरा.
‘लग्नापूर्वी आपल्यात इतके दोष होते हे ठाऊकच नसते तो नवरा’ – एक सदोष ‘पीस’.
‘बायकोच्या कुशाग्र बुद्धीपुढे आपण दिपून गेलोय असे सातत्यानं दाखवू शकणारा चतुर नवरा’ – एक दिपून न दिपलेला नवरा.
एक बायको नवऱयाशी भांडून कायमची म्हणून माहेरी निघून जाते. महिन्या दोन महिन्यांनी नवरा तिच्या माहेरी फोन करीत असतो. शेवटी वैतागून त्याचा सासरा म्हणतो, ‘सांगितलं ना एकदा की, ती परत येणार नाही म्हणून.’
‘ते कळलं’ नवरा म्हणाला, ‘पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे हे कन्फर्म करण्यासाठी मी फोन करीत असतो’ – एक ‘सुटलेला’ नवरा.
एका हतभागी, हतबल नवऱ्याची ही कैफियत डोळय़ात पाणी न आणता व त्वेषानं मुठी न आवळता जमल्यास वाचा. तेवढाच त्याच्या काटेरी जीवनात ओलावा.
‘बहुसंख्य बायकांना (‘माझ्या बायकोला’ पेक्षा हे ‘जनरलायझेशन’ सौम्य व सुसहय़ वाटतं. त्यानंतर स्वयंपाकघरात भांडी आपटण्याचं प्रमाण कमी असतं. कळलं तर राग येईल ना?…) मनापासून वाटत असतं की, एक वनमाणसाचा उद्धार करण्यासाठी, त्याला समाजात राहण्यायोग्य बनवण्यासाठी, सुसंस्कृत घडविण्यासाठी आपला जन्म झालाय. त्याला शिकवून शहाणा करण्यासाठी आपल्याला अवघं आयुष्य वेचायचंय. मग त्या कंबर कसून कामाला लागतात (घरकाम काय कोणीही करेल!). घारीच्या नजरेनं त्याच्या वागण्याबोलण्यावर लक्ष ठेवतात. पावलापावलावर त्याला हटकतात व दुरुस्त करतात. त्याशिवाय तो तिच्यायोग्य कसा होणार? तिला कसा शोभणार? लग्नापूर्वीचं आयुष्य त्यानं आफ्रिकेतील निबीड अरण्यात काढलेलं असतं. ‘एप’ माकडांच्या टोळीत तो लहानाचा मोठा झालेला असतो. कंदमुळं, किडा-मुंगी, फळं खाऊन गुजराण करायची सवय त्याच्या अंगात बाणलेली असते. मग ती त्या रानटी नवऱयाला सांगते – ‘तो पापड भाताला लावून खा.’ तिनं नसतं सांगितलं तर त्याला कसं कळलं असतं? त्यानं पापड चपातीशी खाल्ला असता किंवा आमटीत बुडवून खाल्ला असता किंवा बिस्किटासारखा चहात बुडवला असता किंवा खाकऱयासारखा ‘डाएटिंग’ म्हणून खाल्ला असता. तिच्या सूचनेचा आदर करण्याऐवजी तो चिडतो. जंगलाचे संस्कार लवकर थोडेच जातात? तिथं पापड कुठे मिळणार? अन् भात तरी कोण देणार?…
एकदा मी आंघोळीला गेलो होतो. बाहेरून स्त्रीकंठातून भसाडय़ा आवाजात प्रश्न आला – ‘बाहेर येताय की चहा घेताय?’
‘दुसऱया महायुद्धाकाळची ही घटना असू शकेल. आजही मला तो प्रश्न कळलेला नाही. बाहेर येताय की चहा घेताय? त्यांच्या कुटुंबात आंघोळ करता करता चहा घेण्याची पद्धत असेल. एकेका फॅमिलीत एकेक रिवाज असतो. आमच्याकडे नाही का, आम्ही जेवताना टिचकीत कॅरममध्ये स्ट्रायकर मारावा तद्वत एकमेकांच्या अंगावर शितं उडवितो. जंगल-कल्चर!
एका ठिकाणी मला सन्मानानं चहा देण्यात आला. मी कप-बशी शेजारच्या टेबलावर ठेवली. त्यातला कप उचलून मी मजेत घुटके घेत होतो. माझ्यावरील रानटी संस्कार स्मरून माझी सुविद्य पत्नी मला म्हणाली, ‘चहा संपला की, तो कप त्या बशीत ठेवा.’
पाहिलंत? तिने सांगितलं नसतं, योग्य मार्ग दाखवला नसता, कप बशीत ठेवतात हे मूलतत्त्व माझ्यापर्यंत कमीत कमी व प्रभावी शब्दांत पोहोचवलं नसतं तर तो कप मी खिडकीतून फेकून देऊ शकलो असतो, यजमानाच्या डोक्यात फोडला असता किंवा कुडुम कुडुम करून गुडदाणीसारखा खाल्ला असता, पण थॅक्स टु हर! मी आता खूपच माणसाळलोय. दारावरची बेल वाजवण्यापूर्वी मी दारावर लाथा मारत नाही, चड्डी घालण्यापूर्वी कमरेचा टॉवेल सोडण्याची घाई करत नाही, दात घासण्यापूर्वी मी ब्रशला टूथपेस्ट लावतो, देवळातून बाहेर येताना माझीच चप्पल घालतो, सिनेमाला झोपत नाही व झोपलो तर घोरत नाही, ‘जंगलात जाऊया’ असं टोमणं लावत नाही, सासूला म्हैस न म्हणता मारकुटी गाय म्हणतो…’

[email protected]