दिलीपकुमार

292

>> शिरीष कणेकर

स्वर्गाच्या दारात माझ्या प्रवेश-परीक्षेत चित्रगुप्ताने उलटतपासणीच्या दरम्यान मला विचारले, ‘स्वर्गात येण्यायोग्य कुठलं काम पृथ्वीवर तुझ्या हातून घडलंय?’

‘मी दिलीपकुमारच्या चित्रपटांची पारायणे केलीत.’ मी उन्नत मस्तकानं म्हणेन, ‘मी ‘नया दौर’ पुढून मागून पाठ म्हणून दाखवू शकतो. तो ‘पाहुणा कलाकार’ आहे म्हणून मी विश्वजीतचा टुकार ‘फिर कब मिलोगी’देखील पाहिला होता. दिलीपकुमारचे चित्रपट बघत असताना मला स्वर्गात असल्यासारखंच वाटत आलंय. त्याच्या ‘अंदाज’, ‘आन’, ‘गंगा जमना,’ ‘कोहीनूर,’ ‘नया दौर,’ ‘देवदास,’ ‘आदमी’, ‘राम और श्याम’, ‘विधाता’, ‘लीडर’, ‘पैगाम,’ ‘आझाद’, ‘तराना,’ ‘संगीता’, ‘इन्सानियत,’ ‘गोपी,’ ‘शक्ती’, ‘दुनिया’, ‘मशाल’, ‘यहूदी’ या चित्रपटांच्या प्रिन्टस् उपलब्ध करून देणार असाल तर मी आनंदानं नरकात जायला तयार आहे. स्वर्गात दिलीपकुमारचे सिनेमे नसतील तर मेरा वहाँ क्या काम है?…’

माझं स्वर्गसुख नेमकं कशात आहे हे मला कळतं हे पाहून चित्रगुप्त अवाक् होईल व मला सन्मानानं स्वर्गात दाखल करील व पाठोपाठ दिलीपकुमारच्या चित्रपटांची रिळे येतील…

दिलीपकुमारला भेटण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण न होताच मी हे जग सोडून जाणार याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका आता राहिलेली नाही. दिलीपकुमार को मिलना शायद मेरी किस्मत में ही नहीं लिखा था. ‘किस्मत बनाने वाले जरा सामने तो आ.’ मला त्याला ‘दाग’मधल्या शंकरप्रमाणे ओरडून सांगावंसं वाटतं- ‘सब कुछ उस जगतनारायण को देता है. हमको कुछ नहीं देता है…’

काय एवढं आभाळाएवढं मागितलं होतं मी? दिलीपकुमारची एक भेट. मी राज कपूरला त्याच्या लोणीच्या फार्म हाऊसवर भेटलो होतो. त्यानं माझ्या डिशमध्ये पापलेटची तळलेली भलीमोठी तुकडी वाढली होती. देव आनंदला असंख्य वेळा भेटलो. लता मंगेशकरला तर भेटलोच भेटलो. तिच्या घरी, माझ्या घरी, रेकार्ंडगला, पार्टीत… मग दिलीपकुमारशी एकही निवांत अशी भेट का होऊ नये? दिलीपकुमार क्या हुवा, मानो खुदा हुवा. त्याला भेटण्यासाठी मी काय काय अशोभनीय थेरं केलीत म्हणून सांगू? टिळक ब्रिजवर मला तो त्याच्या ‘इंपाला’ गाडीत दिसला. मी जिवाच्या आकांतात सायकलवरून त्याचा पाठलाग केला. मी त्याला गाठू शकलो नाहीच, पण मोटार सायकलपेक्षा जोरात जाते हा शोध मला लागला. मी नुसताच कुत्र्यासारखा धापा टाकीत बसलो. चर्नी रोडवर एका बिल्डिंगमध्ये अनेक डॉक्टर्स होते. मी खाली दिलीपची गाडी पाहिली. (मला नंबर पाठ होता.) नक्कीच तो वर कोणा डॉक्टरकडे गेला असणार. मी वाट बघत थांबलो. तो कधी खाली आला आणि गाडीत बसून भुर्रकन निघून गेला मला कळलंच नाही. ‘ऍगनी एक्स्टसी’ या इंग्रजी चित्रपटाच्या खास ‘शो’ला दिलीपकुमार व सायराबानू (सायरा काय आणि ड्रायव्हर काय, आम्हाला सारखंच!) येणार असल्याचं पेपरात वाचून मी ‘रीगल’ सिनेमाच्या बाहेरील ‘सर्कल’मध्ये सायकल ‘पार्क’ करून वाट बघत उभा राहिलो. ते आले आणि ‘रीगल’च्या पायऱया चढून आत दिसेनासे झाले. सिनेमा संपल्यावर ते बाहेर येतील म्हणून दोन-तीन तास बाहेर थांबावं का? मी मोठय़ा मुश्किलीनं स्वतःला आवरलं. बस्स झालं, शिरीष. आणखी वेडय़ासारखं करायला लागलास तर तुला थेट वेडय़ाच्या हॉस्पिटलात भरती करतील. पुरुषासारखा पुरुष मी दिलीपकुमारवर एवढा भाळलो होतो तर मधुबालाचं काय झालं असेल? ‘आदमी’च्या प्रीमियरला मी माझी वर्णी लावली होती. दिलीपकुमार येऊन बसला. त्याला भेटण्याची माझी हिंमत होत नव्हती. अखेर ही सुवर्णसंधी सोडायची नाही असा विचार करून, सर्व बळ एकवटून मी दिलीपकुमारच्या जवळ गेलो. मी काही बोलणार एवढय़ात तोच मला म्हणाला, ‘चलो, बैठो-बैठो, पिक्चर शुरू हो गयी.’ त्यानंतर चित्रपटभर मला तेच शब्द ऐकू येत होते- ‘चलो, बैठो-बैठो, पिक्चर शुरू हो गयी…’ नेमक्या या क्षणाचा फोटो ‘स्क्रिन’च्या कुमटाकरनं टिपला होता. कितीतरी वर्षांनी मी तो पाहिला आणि माझे पितर स्वर्गी गेले. ‘इंडियन मर्चंटस् चेंबर’मधील एका कार्यक्रमानंतर मी दिलीपकुमारच्या शब्दशः पुढे पुढे करीत होतो. माझ्याकडे लक्ष न जाणं शक्य नव्हतं. दिलीपकुमारनं माझ्याकडे पाहिले व तो म्हणाला, ‘आय हॅव सीन यू समव्हेअर’ मी सदेह स्वर्गी गेलो. तिथून दिलीपकुमार व त्याचे चित्रपट दिसणार नाहीत म्हणून पुन्हा पृथ्वीवर आलो.

आजच्या तरुण पिढीतील बाजीगर कोणावरून एवढा जीव ओवाळून टाकत असतील? मला नाही वाटत. आईबापावरून ते जीव ओवाळून टाकत नाहीत तर आणखी कोणावर टाकणार? स्वतःवर प्रेम करून ते शिल्लक राहिलं तर ना दुसऱया कोणावर करणार?…

आज दिलीपकुमारला भेटण्याची इच्छा मेल्येय. शहॅण्णव्या वर्षी त्याची अवस्था दयनीय आहे. तो माणसं ओळखत नाही, बोलू शकत नाही. बिछान्यावर पडून असतो. हा आमचा दिलीपकुमार नाही. हृदयात व कानात त्याचा आवाज ठसलाय, तो पडद्यावर गरजलाय- ‘थूक देना मुह पे जो बात पे पलट जाये’ (‘नया दौर’), ‘मिस अगर मेरे अंधेपनका फायदा उठाना हो तो कल से खुशबू कम लगाके आइयेगा’ (‘बैराग’), ‘शंकर भी इन्सान है माँ, कोई कुत्ता नही है’ (‘दाग’), ‘और वो थी भी क्या? जमीन के बराबर और इन्सान अगर जमीन पे पाँव न रख्खे तो कहाँ रख्खे शेटजी?’ (‘फुटपाथ’), ‘दिल ने बहोत धोके दिये है सतीशबाबू, आजकल मै दिमाग से काम लेता हूँ’ (‘दिल दिया दर्द लिया’), ‘नेक स्त्र्ायों के पती जादातर आँखो से कमही देखते है’ (‘कोहीनर’), ‘अब यही अच्छा लगता है चूनीबाबू के कुछ भी अच्छा न लगे’ (‘देवदास’), ‘उसके पास गलत सही पर पूजने के लिये देवता तो है, आजकल इतका भी किसके पास होता है?’ (‘मशाल’), ‘ये दो-चार रुपयेवाला साहुकार कौन है बे?’ (‘इन्सानियत’)…

काळ कोणालाही सोडत नाही. त्यानं दिलीपकुमारलाही सोडलं नाही. ते बघायला आम्हाला जिवंत ठेवलं.

तो ‘मशाल’मध्ये म्हणाला होता- ‘चलो भाई, इतने दिनों के बाद मिले है तो गम की बाते ही क्यों करे?…’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या