‘भयताड’ म्हणजे काय?

>> शिरीष कणेकर

‘भयताड’ म्हणजे नक्की काय हो? ऐ नागपूरवालो हमे भी तो बताओ. काऊन मले सांगत नाही बे? एक तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावं लागेल किंवा भारत गणेशपुरेंना किंवा उमेश यादवला. एक मला नक्की कळलंय. ‘भयताड’ म्हणजे देवमाणूस, दानशूर, सज्जन, निर्व्यसनी, सन्मार्गी, पापभिरू वगैरे वगैरे नक्कीच नाही. आता (एकदाच्या) संपलेल्या ‘माझ्या नवऱयाची बायको’ या लफडेबाज, बोधक व शैक्षणिक मालिकेत दुसरी बायको कशी ठेवायची आणि वर तोंड करून वचावचा कसं बोलायचं याचे शास्त्रशुद्ध धडे दिले गेलेत. ती असते स्वरूपसुंदर, आकर्षक फिगरवाली व नीयत बिघडवणारी. नीयत बिघडवून घ्यायला पुरुष मोअर दॅन उत्सुक असतोच. ही शनाया व गुरुनाथ यांची व्याभिचारी कहाणी आहे हे चाणाक्ष वाचकांनी (म्हणजे सगळय़ांनीच) ताडलं असेल. गुरूचा प्रेक्षकांनी खूप राग राग केला. पण ज्या शनायामुळे गुरू खलनायक ठरला ती शनाया मात्र (पुरुष) प्रेक्षकांना आवडली. गुरूनंतर ती आपल्याकडे येईल, अशीही त्यांना कुठेतरी अंधुक आशा असावी. शनायाशी कसलं वैर करायचं; शनायासाठी जगाशी वैर करायचं. गुरू तेच करतो, क्वार्टर पँटमधली शनाया काय मारू (पक्षीः क्यूट) दिसते! शेवटी इथे येऊन पुरुषांची अक्कल शेण खायला जाते. ये सदियोंसे चलता आया है. विश्वामित्रदेखील जिथं पाघळला तिथं गुरूची काय कथा! खरं सांगा-निदान मनाशी कबूल करा – तुम्हीदेखील राधिकाला सोडून शनायाच्या मागे गेला असतात की नाही?…

मालिकेतील (गुरू सोडून) अन्य पात्रे नियमितपणे शनायाचा उल्लेख तिरस्कारानं ‘भयताड’ असा करतात. म्हणून विचारलं ‘भयताड’ म्हणजे नेमकं काय? एखाद दिवशी क्रिकेट सामन्याला जाईन म्हणतो आणि सीमारेषेपलीकडून थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या उमेश यादवला (तान्याचा दादला!) मी ‘भयताड’ म्हणजे काय विचारीन. त्याच्या गोलंदाजीवर झेल सोडणाऱ्या क्षेत्ररक्षकाला तो ‘भयताड’ म्हणतो काय हेही तान्याभाबीला विचारीन. भारत गणेशपुरे डॉ. नीलेश साबळेला ‘भयताड’ म्हणत असेल? अन् नसेल म्हणत तर का म्हणत नसेल? मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तर टेलिफोन डिरेक्टरीसारखी ‘भयताडां’ची भलीमोठी, जाडजूड यादीच असेल. पण माझ्याप्रमाणेच ऐकणाऱ्याला ‘भयताड’चा अर्थ कळणार नसेल तर शिवी देऊन उपयोग काय? शनायाला तर मराठीतल्या साध्या साध्या म्हणी व वाकप्रचार कळत नाहीत, मग ‘भयताड’ काय कळणार? तुम्ही तिला ‘भयताड’ म्हणा नाही तर पायताण म्हणा (‘व्हॉट इज पायताण?’ ती विचारेल.) तिनं गुरूला पटवलं की नाही? झालं तर! शनाया मला का नाही पटवत? आय अॅम कीन टु बी पटावड. पण मी तिला क्रेडिट कार्ड कुठून देणार? माझ्याकडेच नाही. हॉटेल म्हणजे जास्तीत जास्त उडिपी… आपण श्रीमंत नाही याचं पहिल्यांदाच मला वैषम्य वाटतंय.

मुळात शनायावर सगळय़ांनी एवढा दात धरण्याचं, तिला पाण्यात पाहण्याचं, तिच्या नावानं बोट मोडण्याचं कारणच मला कळू शकले नाही. परस्त्रीगमन करणारा, बाहेरख्याली, व्यभिचारी गुरू आहे. उद्या शनाया गेली तर तो ‘टनाया’ घेऊन येईल. ‘टनाया’ गेली तर तिच्या जागी आणखी कोणी ‘मनाया’, आणेल. मग विरोधक एकट्या शनायाला विनाशाचे कारण का ठरवतात? अन् तो पठ्ठ्या गुरू सतत ‘माझी बाजूच कोणी समजून घेत नाही’ असं म्हणत असतो. काय तुझी बाजू आहे सांग, असं मालिकेतलं कोणीच त्याला विचारत नाही. मीच टी. व्ही.त घुसून त्याला खडसावून विचारणार होतो, पण तेवढय़ात मालिकाच संपली. गुरू बदफैली आहे हीच त्याची बाजू आणि ती कळली व पटली असल्यागत माणसं वागतात. सगळी झोड शनायावर. पुरुषप्रधान संस्कृतीचं हे आणखी एक ठळक व लाजिरवाणं उदाहरण. शनायाला आपल्या ऑफिसातील टेबल पुसायला लावणं हा राधिकेच्या लेखी न्याय व इतका प्रदीर्घ काळ झालेल्या आवहेलचा बदला होता. मग गुरूला अंगातील जॅकेटने दिवाणखान्यात ‘कटका’ करायला लावायचे तिच्या मनात का येत नाही? कारण काही झालं तरी शेवटी तो पतीपरमेश्वर. आदर्श हिंदू नारी त्याचा पाणउतारा कसा करील? मग झोडा शनायाला. हा सरळ सरळ अन्याय्य पक्षपात महिला संघटनांना कसा लक्षात आला नाही व त्याविरुद्ध त्यांनी आवाज कसा उठवला नाही, कळत नाही. लग्नसंस्था टिकवण्यासाठी आपण काय नाही केलं हे भर कोर्टात हंबरडा फोडून राधिका बोल बोल बोलते तेव्हा गुरुनाथ सुभेदार ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी’ चित्रपट बघत असल्यागत निर्विकार बसलेला असतो. पण माणूस मनानं वाईट नाही. ती मेली शनायाच वाईट.

शनाया ‘भयताड’ असेल पण तिनं एकेकाला ठेवलेली नावं मनोरंजक होती. राधिका ‘गुड ऑफ नथिंग’, ‘गुरूचे आईवडील ‘ऑरेंजेस’ आणि राधिकाच्या लाडेलाडे, बोबडं बोलणाऱया मुलाला ती ‘मॉन्स्टर’ म्हणते ते बरं वाटत नाही पण राधिकाइतका रागही येत नाही. ‘आँखो से प्यारी, आँखो से ओझल हो तो और भी प्यारी’ असा पत्रात मायना पं. जवाहरलाल नेहरूंनी इंदिराबेटीसाठी लिहिला होता. तोच आपण शनायासाठी लिहू या…

‘माझ्या नवऱयाची बायको’ हे मालिकेचं शीर्षक खूपच रंजक होतं. (मालिकेविषयी मात्र सरसकट असं बोलता येणार नाही.) ते उसनं घेऊन मालिका, चित्रपट, कथा, कादंबरी, नाटक करण्यासाठी अमृता सिंग (सैफ-करिना), सायरा बानू (दिलीपकुमार – आसमा), प्रकाश (धमेंद्र – हेमा मालिनी) पुढे येतील अशी आशा करू या.

तेवढा ‘भयताड’चा अर्थ कोणीतरी सांगावा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या