हरवलेलं संगीत (भाग 7) : लता गाती है, बाकी सब रोती है

>> शिरीष कणेकर

सज्जाद, अनिल विश्वास व सी. रामचंद्र हे चित्रपट-संगीतसूर्य ‘याचि देही याचि डोळा’ आपल्याला कधी भेटतील व आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलू शकू असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. पण तिघांनाही मी चक्क भेटलो. पुरुषस्य भाग्यम्, दुसरं काय? (पु.लं.ना एकदाही भेटू शकलो नाही, पुरुषस्य दुर्भाग्यम्; दुसरं काय?)
आम्ही सज्जादप्रेमी जमलो व त्याला आमच्या एका मित्राच्या ऐसपैस घरी बोलावलं. सज्जाद आला. मला काय नि किती बोलू असं झालं होतं. ‘ये हवा ये रात’, ‘जाते हो तो जाओ’, ‘भूल जा ऐ दिल’, ‘दिल में समा गये सजन’ या अजरामर रचनांचा निर्माता चक्क माझ्यासमोर बसला होता. माझ्या छातीत धडधडत होतं. ओठांना कोरड पडली होती. काहीच न सुचून मी विचारलं –
‘‘अनिल विश्वास के बारे में आपका क्या खयाल है?’’
‘‘अच्छे थे. मुझे बहुत मानते थे.’
‘‘और सी. रामचंद्र?’’
‘‘अच्छे थे. मुझे बहुत मानते थे.’
‘‘और रोशन?’’
‘‘अच्छे थे. मुझे बहुत मानते थे.’
मी खुर्चीत आक्रसलो. माझे शब्द गोठले. संभाषणातला माझा भाग संपला हे मी ओळखलं. ‘मुझे बहुत मानते थे’ हा त्याचा ‘तकिया कलाम’ होता. मी धडा शिकलो. त्याच्या संगीतावरून माणूस ओळखायचा नाही व माणसावरून त्याच्या संगीताचं मोजमाप करायचं नाही. संगीतकार मोठा म्हणजे त्याचं मत ग्राहय़ मानलंच पाहिजे असं नाही व संगीतकाराचं मत मान्य नाही म्हणून तो संगीतकार छोटा होत नाही. कीप द टू थिंग्ज सेपरेट.
काही थोर संगीतकारांची ही मते वाचा आणि पचवता आली तर पचवा.
सी. रामचंद्र – रफी हा एक रेम्याडोक्या गायक होता. ‘ए मेरे वतन के लोगो’ प्रमिला दातार लताइतकंच चांगलं गाते व मी स्वतःदेखील तेवढंच चांगलं गातो.
अनिल विश्वास – रफी हा भेंडीबाजारातला गायक होता. सध्या किशोर चांगला गातो.
सज्जाद – या फुटपाथवरून त्या फुटपाथवर कोणाला हाक मारायची असेल तर त्यासाठी किशोर कुमारचा आवाज चांगला आहे.
जयदेव – आज नवीन गायिका म्हणून लता मंगेशकर माझ्याकडे आली तर मी तिला गाणी देणार नाही. रुना लैला बघा, हजारो लोकांसमोर खुल्ला गाते.
नौशाद – शमशादचा आवाज खणखणीत आहे. तिला रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर उभं राहून गायला सांगा, काही फरक पडत नाही.
मदन मोहन – लहानपणी ज्योतिष्यानं माझी कुंडली पाहून माझं सर्व भविष्य सांगितलं होतं. लता मंगेशकर नावाचा दिव्य आवाज तुझ्यासाठी गाईल हे मात्र त्यानं मला सांगितलं नव्हतं.
परस्परांना छेद देणारी ही मते वाचा आणि डोक्याचा गोविंदा करून घ्या. अनिल विश्वास किशोरकुमारला एवढा मानतो व सज्जाद किशोरकुमारला गायकच मानायला तयार नाही. नौशाद शमशादला एवढा मानतो पण अवघी कारकीर्द लताच्या आवाजात करतो.
सज्जाद माझ्या समोर म्हणाला होता – ‘लता गाती है, बाकी सब रोती है.’ मला 400 व्हॉल्टसचा शॉक बसला होता. क्या बोल रहे हो, मियाँ? लता ही लता आहे, हे आम्हालाही मान्य आहे पण म्हणून बाकी सब रोती है? आशा भोसले, शमशाद बेगम, गीता दत्त, राजकुमारी, अमीरबाई कर्नाटकी, खुर्शीद, मीना कपूर, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अंबालावाली, सुधा मल्होत्रा, मुबारक बेगम, जगजीत कौर, पुष्पा हंस, बीनापानी मुखर्जी, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, वाणी जयराम, अलका याज्ञिक व साधना सरगम या सगळय़ा गाणाऱया कोकिळा केवळ रडगाणं गायल्या? शांतम् पापम्! शांतम् पापम्! आपल्या कानी सात खडे. आपण ऐकलंच नाही रे बाबा… चाळीस वर्षे होऊन गेली या गोष्टीला. आज मलाही असं थोडं थोडं वाटायला लागलंय की लता गाती है, बाकी सब रोती है… स्वर्गाची दारं दिसायला लागल्यामुळे असेल कदाचित, माझ्यात हे धाडस आलंय. आपल्याला आतून कुठेतरी सारखं वाटत होतं ते बोलून दाखवण्यासाठी ही वेळ यावी लागते. आता कोणाला घाबरायचं?
क्रिकेटपटू वासू परांजपे लताला म्हणाला होता – ‘‘लताताई (तो एकटाच ‘ताई’ म्हणतो, बाकी सगळे ‘दीदी’ म्हणतात.) तुमची शंभर गाणी मला उरलेल्या आयुष्याला पुरतील. खरं म्हणजे इतरांचीही उत्तमोत्तम गाणी आहेत. तुमची शंभरपेक्षा कितीतरी जास्त अशी मस्त गाणी आहेत, पण मला आता या स्टेजला शंभर पुरेत. ती ऐकत मी सुखात आयुष्य काढीन.’’
‘‘मी टू, वासू.’’ मी मनाशी म्हणालो.
चला, ऐकू या.
चित्रपट – ‘सैंया’, साल-1951. संगीतकार सज्जाद, गायिका लता मंगेशकर, कवी डी. एन. मधोक पडद्यावर मधुबाला.
काली काली रात रे
दिल बडा सताये, तेरी याद आये
अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात, लतानं आवर्जून हे दुर्मिळ अप्रतिम गाणं गायलं. खचाखच भरलेल्या स्टेडियमनं ते सौजन्य म्हणून ऐकून घेतलं. लताला तिची हौस पुरी करू दे. पुढलं गाणं चांगलं असेल…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या