टिवल्या-बावल्या – इंग्लिश विंग्लिश

>> शिरीष कणेकर

माझ्या एका नट मित्राला वेळोवेळी भास होतात की, त्याचं इंग्लिश फर्डे आहे. घरातील धुणीभांडी करणाऱया कामवालीशी कथित इंग्लिशमध्ये बोलून त्यानं आपला अपसमज दृढ करून घेतला आहे. आपल्याला घरकामाचा नव्हे तर हे दिव्य इंग्लिश ऐकण्याचा पगार मिळतो हे मोलकरणीनं ओळखलं आहे. आपलं भारी इंग्लिश त्या चार बुकंही न शिकलेल्या कामवालीला कसं कळतं, हा प्रश्न त्यानं स्वतःला पाडून घेतलेला नाही. तिच्या (इंग्लिश ऐकण्यावर) खूश होऊन त्यानं तिला एकदा इंग्लिश दारूचा एक पेग दिला होता. तो पिऊन ती जे बोलली ते फ्रेंच होतं की कानडी हे मात्र त्याला कळलं नव्हतं. तो स्वतः मात्र प्यायल्यावर निर्मात्यांना शुद्ध मराठीतून शिव्या द्यायचा. त्यामुळे आपल्याला जास्त झालेली नाही असं जगाला वाटेल अशी त्याची समजूत होती. आपल्या अभिनयावर जग लट्टू आहे अशीही त्याची एक गोड गैरसमजूत होती. त्याला शुद्धीवर आणण्याचे आमचे सर्व मराठी प्रयत्न असफल ठरलेत. ‘आय ऍम फ्रॉम ऑक्सफर्ड’ तो दडपून सांगतो. कामाठीपुऱयात कुठे ‘ऑक्सफर्ड’ नावाची शाळा असू शकेल का? तो स्वतःला शेक्सपियरही समजत असेल. फक्त शेक्सपियर हे नाव त्याला माहीत असायला हवं. मी त्याला एकदा सांगितलं होतं की, शेक्सपियरची लंडनमध्ये लॉण्ड्री होती.

पुण्यात एका मराठी पेपरमधील वार्ताहर येता-जाता म्हणायचा ‘हाऊ टु पॉसिबल?’ म्हणजे कसं शक्य आहे? तो हे इतक्या सफाईनं व आत्मविश्वासानं म्हणायचा की, ऐकणाऱयाला वाटावं आपल्याच इंग्लिशची काहीतरी गडबड आहे. ऐकून ऐकून तो शब्दप्रयोग आमच्याही तोंडी बसला होता. आम्ही कुठंही बोलायचो- ‘हाऊ टु पॉसिबल?’ हे शब्द तोंडातून हद्दपार करणे मेरे बस की बात नही थी. राजेश खन्नानं मला हुतात्मा चौकातून खारला दहा मिनिटांत यायला सांगितलं तेव्हा मी अभावितपणे बोलून गेलो – ‘हाऊ टु पॉसिबल?’ त्यानंतर तो माझ्या नोकरीविषयी खोदून खोदून विचारत होता. त्या चौकशीचा उगम ‘हाऊ टु पॉसिबल’मध्ये होता. सवयी अशा सोडता येतात का? हाऊ टु पॉसिबल?…

माझ्या वर्गात ‘लॉ’ला एक मुलगा होता (पुढे तो चक्क सॉलिसिटर झाला). तो इंग्रजीवर निर्घृण अत्याचार करून तिला छिन्नविच्छिन्न करून टाकायचा. त्याच्या मुखातून आलेलं इंग्रजी ही स्वाहिली म्हणूनही खपून गेली असती. एकदा परीक्षेच्या आधी तो मला विमनस्कपणे म्हणाला, ‘शंभू आस्कड् मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. हौ टेल? यू टेल. इफ टेल ऍण्ड नॉट कम देन व्हॉट?’

संपूर्ण वक्तव्याचा रात्री जागून केलेला मराठी अनुवाद असा ः ‘शंभू मला महत्त्वाचे प्रश्न विचारत होता. कसं सांगणार? तू सांग. समजा सांगितले असते आणि ते परीक्षेत आले नसते तर?’ इफ नॉट कम देन व्हॉट या वाक्यरचनेवर तो स्वतःच फिदा होता. शंभूच्या डोक्यात काय प्रकाश पडला कोण जाणे. तो नापास झाला एवढं मला माहित्येय.

माझा पुरातन मित्र दिलू राजे याच्यासाठी मी (अर्थातच इंग्लिशमध्ये) चिठ्ठी लिहून ठेवली. ते अक्षर साहित्य असे होते –

‘इफ कम, गो. नॉट कम, नॉट गो. व्हेन कम, गो.’

ती चिठ्ठी त्याच्या निष्णात पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांच्या हाती पडली. ते चक्रावून गेले. त्यांना अर्थच लागेना. त्यांनी दिलूला विचारले.

‘सोपं आहे’ चिरंजीव वदले, ‘इफ कम, गो म्हणजे मी आलो तर आपण सिनेमाला जाऊ. नॉट कम, नॉट गो म्हणजे मी आलो नाही तर तू एकटा सिनेमाला जाऊ नकोस आणि व्हेन कम, गो म्हणजे जेव्हा केव्हा मी येईन तेव्हा आपण सिनेमाला जाऊ. सिंपल.’

दिलूचे पप्पा कपाळ बडवीत तिथून गेले.

इंग्रजांनी आपल्याला दीडशे वर्षे गुलाम केले. त्यांच्या भाषेची चिरफाड करून आपण त्यांच्यावर सूड उगवलाय. मूळ अन्यायापेक्षा सूड मोठा असं कधी कधी वाटतं. आज आपल्याकडे शशी थुरूर काय तो मऊ मुलायम इंग्लिशमध्ये बोलतो. तो सुनंदाशी कुठल्या भाषेत संभाषण करीत असेल? इंग्लिशमध्ये की प्रेमाच्या शब्दहीन भाषेत? रामदेव बाबा योगाच्या व आसारामबापू भोगाच्या भाषेत बोलत असणार. त्यांचं इंग्लिशवाचून काही अडत नाही. उलट कतरिना कैफ व सनी लिऑन यांचं सगळं काम इंग्लिशमध्ये. त्यांचं हिंदीवाचून अडत नाही. कारण त्यांच्या जवळ आहे ते फार थोडय़ा जणींजवळ आहे. आपण इंग्रजीचं म्हणतो, पण आपलं हिंदीही कामचलाऊ ‘ढकल विठ्ठल’ असतं. आमचा एक शेजारी डॉक्टरच्या कंपाऊंडरला म्हणाला होता – ‘हमारे को तुम्हारे का दवा देव’ (तुमच्याकडचं औषध तुम्ही मला द्या!). ‘गांधील माशीने चाव दिया’ हे तर आपल्याकडे अस्खलित हिंदी मानलं जातं. राष्ट्रभाषेचे लचके तोडतानाही आम्हाला काही वाटू नये? मग इंग्लिशचं काय बोलावं? ‘दे जेव इन बडा बडा थालाज’ हे वाक्य इंग्रजी म्हणून माझ्या एका मित्राचे वडील बोलले होते. ‘ए, तुझा बडा थाला कुठाय?’ आम्ही आमच्या त्या मित्रापाशी त्याच्या वडिलांची चौकशी करायचो.

अमेरिकेत असलेला माझा नातू एकदा मला फोनवर म्हणाला, ‘ग्रॅण्डपा, इप्रूव्ह युअर इंग्लिश फर्स्ट.’

मी काय बोलणार? माझ्या लेखी (व त्याच्या लेखीही) तो डोनाल्ड ट्रम्पच होता.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या