शिरीषायन – मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी : 9

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> शिरीष कणेकर

माझ्या ‘फटकेबाजी’ या क्रिकेटवरच्या एकपात्री कार्यक्रमाचा महोत्सवी प्रयोग होता. कोणाला बोलावावं प्रमुख पाहुणा म्हणून? सुनील गावसकर खरं म्हणजे ‘मॅन फॉर ऑल सीजन्स’ होता. आजही ते चलनी नाणे आहे. पण तेव्हा ज्याच्या त्याच्या तोंडी एकच नाव होतं – सचिन तेंडुलकर. बोलवू या की! आला तर आला… नाही तर नाही.

साल 1991 (अन्य तपशील आकडेशास्त्राRना विचारा. रवी शास्त्राrही चालेल.) मी साहित्य सहवासात रमेश तेंडुलकरच्या घरी गेलो. सचिन हाफ पँटीत बागडत होता. नुकताच तो पाकिस्तानचा दौरा करून आला होता. जाताना तो संघातील कोकरू होता. परत आला तो बलाढय़ आक्रमक व तेजस्वी फलंदाज म्हणून. जगातील तत्कालीन सर्वश्रेष्ठ लेग-स्पिनर अब्दुल कादिरवरही त्यानं अभूतपूर्व हल्ला चढविला. क्रिकेटविश्व खडबडून जागं झालं. हा कोण ब्रॅडमनचा अवतार?
सचिन माझ्या महोत्सवी प्रयोगाला आला. आत ‘ड्रेसिंग रूम’मध्ये आम्ही बोलत होतो.
‘माझे पाय आज लटपटतायत…’ मी सचिनजवळ कबुली दिली.
‘माझेही लटपटतायत्…’ सचिन म्हणाला.
‘अरे, तुझे माझ्या क्षेत्रात लटपटतायत आणि माझे माझ्याच क्षेत्रात लटपटतायत… फरक आहे.’ मी म्हणालो. सचिननं हसल्यासारखं केलं. विकेटवर त्याचे पाय गोपीकृष्णसारखे थिरकताना मी पाहिले होते.
आम्ही मंचावर गेलो. मी नर्व्हस होतो. सचिन शांत होता. ‘अब्दुल कादिर तुला काय म्हणाला, ज्याच्यानंतर तू त्याला झोडलंस?’ मी त्याला माईकवरून विचारले.
‘तो म्हणाला, हिंमत असेल तर मला मारून दाखव.’ सचिन सहज स्वरात म्हणाला.
‘मग?’
‘मग मारला…’ सचिनचा आवाज तेवढाच सहज व शांत होता. हा पोरगा भल्याभल्यांना ठोकून काढणार आहे, हा विचार माझ्या मनात तरळून गेला. (उगीच नाही मला द्रष्टा म्हणत!)
मुलाखतीनंतर सचिन खाली नाटय़गृहात बसायला गेला तर पहिल्या रांगेत त्याला जागाच नव्हती. त्याचं कौतुक बघायला जास्त संख्येनं आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी बहुतेक खुर्च्या व्यापल्या होत्या. सचिन बिचारा कुठेतरी कोपऱयात जाऊन बसला. त्यानंतर गेल्या तीस वर्षांत सचिन मला भेटलेला नाही.
z z z
‘टाइम्स’ मशीनरी विभागात दिलीपकुमार ‘मशाल’चं शूटिंग करतोय असं माझ्या कानावर आलं. कानात वारं शिरलेल्या वासरासारखा मी धावलो. हातात होतं ते काम बाजूला ठेवलं. दिलीपकुमारला जवळून बघण्यापेक्षा महत्त्वाचं काम मला तेव्हाही नव्हतं व कधीच नव्हतं. त्याच्या गाडीचा पाठलाग मी सायकलवरून केला होता व छातीचा भाता झाला तेव्हाच थांबलो. ‘ले जा मेरी दुवाए ले जा’ हे ‘दीदार’मधलं निम्मीच्या तोंडचं गाणं मी गायला हवं होतं. लता मंगेशकर व दिलीपकुमार या दोघांमुळे मला प्रेम करण्याच्या माझ्या ताकदीचा अंदाज आला.
चित्रीकरणाची तयारी चालू होती. दिलीपकुमार मध्ये खुर्ची टाकून स्टायलीत बसला होता. मी लांबून हपापल्यासारखा बघत होतो. जवळ जाऊन बोलण्याची जबर इच्छा होती, पण धाडस होत नव्हतं. आपल्याला काही झालं तर? त्याचे ‘ज्वारभाटा’ व ‘प्रतिमा’ हे दोन चित्रपट सोडले तर बाकी एकजात सगळे मी एकदा नाही तर अनेकदा बघितले होते. ‘नया दौर’तर मला तोंडपाठ होता. (‘ज्वारभाटा’ व ‘प्रतिमा’ मी बघितले नाहीत कारण माझ्या आठवणीत ते कुठे लागलेलेच नव्हते.) रंगीत ‘नया दौर’ मला लुभावू शकला नाही. आम्ही ‘ब्लॅक ऍण्ड व्हाइट’वाले. उद्या ‘अंदाज’ रंगीत कराल की काय? रंग चित्रपटात हवा; फिल्मवर नव्हे. ‘बादल’मध्ये प्रेमनाथच्या जागी दिलीपकुमार एवढा एकमात्र बदल करून तो पुन्हा काढता आला नसता का? संगीतकार शंकर-जयकिशन, दिग्दर्शक अमीया चक्रवर्ती, नायिका मधुबाला. अगर कमी थी तो सिर्फ हमारे दिलीपकुमार की! प्रेमनाथ बघायचा? हे म्हणजे लताऐवजी शारदा ऐकण्यासारखं होतं…
दिलीपकुमार नजरेच्या टप्प्यात राहील एवढय़ा अंतरावर मी कोणाशी तरी बोलत उभा होतो. एकाएकी माझ्या पाठीवर थाप पडली. मी दचकलो. तो चक्क दिलीपकुमार होता. मी भानावर यायच्या आत तो निघूनही गेला होता. का वाटलं असेल त्याला की ओळखदेख नसताना माझ्या पाठीवर थाप मारावंसं? लांबूनच त्यानं माझी भक्ती ओळखली असावी. त्यानं काय फॅन्स पाहिले नसतील? पण मी नुसता फॅन नाही तर ‘सीलिंग’ फॅन आहे हे अचूक ओळखलं होतं. परत तो माझ्या अंगावरून जायला लागला तेव्हा थापेचं स्मरण ठेवून मी त्याला म्हणालो – ‘काल मी ‘तराना’ पाहिला.’ तो थबकला. माझ्या खांद्यावर गुद्दा मारून हसून म्हणाला, ‘यू नो, मधुबाला वॉज विथ मी इन ‘तराना.’ माझा खांदा पुढे काही दिवस दुखत होता. त्यावरून मधुबालाची आठवण त्याच्या मनात किती ठणकत असावी याचा मला अंदाज आला.
z [email protected]