शिरीषायन – वाढदिवस

>> शिरीष कणेकर

रविवार, 6 जून रोजी मी अठ्ठय़ाहत्तर वर्षांचा झालो. (वय आकडय़ात लिहिण्यापेक्षा अक्षरात लिहिल्यानं कमी वाटतं का?) अण्णा गेले तेव्हा होते त्यापेक्षा अठ्ठावीस वर्षांनी मोठा आणि आई गेली तेव्हा होती त्यापेक्षा बावन्न वर्षांनी मोठा. चुलीत घाला हे मोठं असणं. पोरकेपणाला कुठल्याही शब्दांत किंवा कुठल्याही आकडय़ात मांडलंत तरी ते पोरकेपणच असतं. मी माझ्या आईवडिलांच्या फोटोला मनोभावे नमस्कार करतो तेव्हा ते माझ्यापेक्षा इतके लहान आहेत हा विचारही माझ्या मनाला शिवत नाही. आजही अण्णांच्या समोर मी बसू शकणार नाही. पोरगेल्या आईच्या पायांवर मी भक्तिभावानं डोकं ठेवीन. कसं मजेदार नातं असतं नाही? आई म्हणे रागावली की मला धोपटून काढायची. अण्णा कळवळायचे, – ‘अहो, त्याचं वय बघा. तो केवढासा आहे बघा. येताजाता काय हात टाकता त्याच्यावर?’ आई, तू मारकुटी होतीस? अडीच-तीन वर्षांच्या पोटच्या गोळय़ाला मारायचीस? आज असतीस तर पंचाहत्तरी ओलांडलेल्या मुलालाही मारलं असतंस? त्याच्या मुलांच्या व नातवंडांच्या समोर? अण्णा रागावले की माझे दोन्ही हात पकडून ठेवत. घट्ट. ही त्यांच्या रागावण्याची परिसीमा होती. त्यांनी कधीही मला साधं बोट लावलं नाही. आई कदाचित दोघांच्या वाटय़ाचा मार एकटीनंच पुरा करीत होती. एकदा मी माझ्या थोरल्या मावसबहिणीची अभ्यास केलेली पाटी पार पुसून टाकली. तिनं भोकाड पसरलं. ‘रडू नकोस. तोंड बंद कर. मी देते तुझा अभ्यास जसाच्या तसा पाटीवर लिहून’. आई म्हणाली. आणि तिनं खरंच लिहून दिला. ‘माणके, आता तरी थांबशील का रडायची?’ माझी आई ओरडली.

ती गेली त्याच्या आदल्या रात्री ठणठणीत होती असं ऐकायला मिळालं. झोपायची वेळ झाली तरी उडय़ा मारीत असलेल्या मला ती म्हणाली, ‘शिरा, माझी दांडीवर साडी वाळत्येय. तेवढी आणून देतोस का रे सोन्या?’

मी धावलो व तिची साडी आणून दिली. मला जवळ घेत ती म्हणाली, ‘शहाणं माझं बाळ ते.’

सकाळी ती या जगात नव्हती. शहाण्या बाळाला जगात एकटं सोडून ती निघून गेली. काय झालं एकाएकी? अन् तेही वयाच्या सव्विसाव्या वर्षी? तिला म्हणे संधिवात होता. त्यापायी तिची एकाएकी दातखीळ बसली. माझा शाळकरी आतेभाऊ तिच्या दातात चमचा धरून बसला. का? घरातली सगळी मोठी माणसं कुठं गेली होती? तिचं औषध सापडलं नाही म्हणे. म्हणजे? डॉक्टर नवरा काय करत होता? तिला ससून हॉस्पिटलला का हलवलं नाही? जाऊ दे, किती वर्षे लोटली या गोष्टीला. मी आज काय विचारतोय? अन् कोणाला विचारतोय? आहे कोण त्यावेळचं आता? मी मामीला – आईच्या आईला – विचारायचो. ती ओठ आवळून गप्प बसायची. तिच्या कंट्रोल गेलेल्या भुवया उडत राहायच्या.

‘तुम्हाला काही पडलेलीच नव्हती का?’ मी तिला हिंस्रपणे विचारायचो.

ती ओठ जास्तच आवळायची. तिच्या भुवया जास्तच उडायच्या. अलीकडेच मला कुणीसं सांगत होतं की, आई जाण्याचं दुःख मामीला सहन झालं नव्हतं. त्यातून ती अखेरपर्यंत बाहेर पडू शकली नव्हती. त्यातून वरून डागण्या द्यायला मी होतोच.

परवा माझा अमेरिकेत असलेला डॉक्टर मुलगा मला फोनवरून सहज विचारत होता, ‘पपा, तुम्ही माणसाचा मृत्यू पाहिलाय?’

‘नाही.’ मी शहारत म्हणालो, ‘आता माझा मृत्यू बघीन तोच पहिला असेल.’

आईचा अंत मी बघितला नाही. अण्णांचाही बघितला नाही. मी शेजारच्या खोलीत होतो. जे.जे.चे डॉक्टर्स त्यांचा जीव वाचवण्याचा भगिरथ प्रयत्न करीत होते. एकाएकी एका डॉक्टरचे तरंगते शब्द माझ्या कानावर आले – ‘ही इज डेड!’

मी धावलो. अण्णा शांत झोपल्यासारखे दिसत होते. ‘अण्णा, चहा’ म्हटलं तर उठून बसतील असंच मला वाटत राहिलं.

संपलं. आता जगात माझं कोणीच नव्हतं. अण्णांनी जायला नको होतं. देवानं अण्णांना न्यायला नको होतं. एका आईला नेऊन त्याचा जीव भरला नव्हता का? माझ्यावर त्याचा जास्तच दात दिसत होता. मी शक्यतो देवळात जात नाही. गेलो तर त्या देवापाशी काही मागत नाही. मागून तो देतो यावर माझा विश्वास नाही. मला हात पसरायला आवडत नाही. अगदी देव झाला म्हणून काय झालं?’ देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया…’

अण्णा गेल्यापासून मी कोणासाठी जीव पाखडू शकतो यावरचा माझाच विश्वास उडालाय. त्यांच्याएवढा चांगला माणूस मी पाहिलेला नाही. ते पेशंटमध्ये देव पाहायचे. माझ्यामध्ये आई पाहायचे का? माहीत नाही. अण्णांच्या दुसऱया संसारात एकदाही मी आईचा उल्लेख ऐकला नाही. तुमच्यापुरती ती गेली असेल, पण माझं काय? मी आहे तोवर ती असणार होती. तिची पताका मी फडकवत ठेवणार होतो. तिच्यातील कलागुण मी जोपासणार होतो. रंगमंचावर उभा राहणार होतो. लेखणी परजणार होतो.

आताच्या 6 जूनला सकाळी मी आई-अण्णांच्या फोटोसमोर हात जोडून उभा राहिलो. पुन्हा एकदा डोळय़ांच्या कडा भिजल्या. मी कानात प्राण आणून ते बोलण्याची वाट पाहू लागलो.
वाटल,ं अण्णा म्हणतील, ‘मिस्टर शिरीष, काय चाललंय?’

वाटलं, आई म्हणेल, ‘क्षणभर ओळखलंच नाही रे तुला.’
z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या