शिरीषायन – मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी : 15

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

मी माझ्या मधुमेहतज्ञाकडे नंबर लावून बसलो होतो. (ज्याच्या रक्तात इतकी साखर आहे त्याच्या लेखणीत व जिभेवर चिमूटभर साखरही असू नये?) थोडय़ा अंतरावर समोर एक बाई माझ्यासारख्याच आत बोलावण्याची वाट पाहत बसल्या होत्या. एकाएकी माझी टय़ूब पेटली. या शोभा गुर्टू तर नाहीत? त्याच दिसतायत. अगदी त्यांच्यासारख्या दिसणाऱया दुसऱया कोण असणार? त्या उठून उभ्या राहिल्या. नंबर लागला वाटतं.

त्या सरळ माझ्याकडे चालत आल्या. मी खुर्चीतल्या खुर्चीत पिंजऱयातल्या उंदरासारखा चुळबुळत होतो. त्या थेट माझ्यासमोरच येऊन उभ्या राहिल्या. बावचळलेल्या अवस्थेत मला उठून उभं राहायचंदेखील सुचलं नाही. (‘प्रेस कॉन्फरन्स’ला समोरचं सगळं खायचं कसं सुचतं?)

‘तुम्ही शिरीष कणेकर ना हो?’ त्यांनी हसत हसत विचारलं. ‘मी मगाचपासून बघत्येय. माझी नक्की खात्री होत नव्हती. बरोबर ओळखलं ना?’

माझी जीभ टाळय़ाला चिकटून बसली होती. मी बोलायची वाक्यं त्या बोलत होत्या. मुळात मला ओळखण्याची व नंतर ओळख दाखविण्याची काय गरज होती? त्यांच्यासमोर मी कोण होतो? पण त्यांनी असा विचार केला नाही. त्या त्यांचं मोठेपण अंगाखांद्यावर बाळगत नाहीत. आम्ही मात्र आमच्या आढय़तेमुळे मोठे समजले जाऊ अशा भ्रमात असतो. इतक्या वेळा भ्रम तुटलाय तरी तो कायमच आहे. मी एखादी ठुमरी गुणगुणल्याचा अभिनय केला असता तरी शोभाताईंनी गाण जन्माचं सोडून दिलं असतं. म्हटलं जाऊ दे, गाऊ दे बिचारीला म्हणून मी गाण्यासाठी तोंड उघडलं नाही.

तेवढय़ात शोभाताईंना आतून बोलावणं आलं. बोलणं झालंच नाही. त्या आत असताना मी शब्दांची जुळवाजुळव करीत राहिलो. त्या बाहेर आल्या आणि मी आत गेलो. पुन्हा बोलणं राहूनच गेले. नाहीतरी काय बोलणार होतो मी?

मी नाशिकला कार्यक्रम करायला गेलो होतो. त्या काळी माझ्याबरोबर अनंत भावे असत. ‘गप्पा क्रिकेटच्या व सिनेमाच्या’ असा आमचा जोड कार्यक्रम होता. संयोजकांनी सुचवलं की आम्ही वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचं दर्शन घ्यावं. मी संकोचत होतो. काय बोलणार मी एवढय़ा मोठय़ा कवीशी? पण दिल्लीला गेल्यावर राजघाटावर महात्मा गाधींच्या स्मारकाला भेट देणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच या महाकवीच्या घराला भेट देणं हे महत्त्वाचं होतं. त्यांची एकही कविता मला तोंडपाठ नव्हती. मग काय बोलणार त्यांच्याशी? तुमचं नाव फार ऐकून आहे, असं? ‘हे एवढं सांगायला आलात?’ असं त्यांनी विचारलं असतं तर? मी माझं काळं तोंड कुठे लपवणार होतो? त्यांचं घर मी पाहिलं नव्हतं, मग तोंड लपविण्याची जागा मला कुठून माहीत असणार?
हो-ना करता करता आम्ही गेलो. भावे निभावून नेतील असं मी सोयिस्करपणे गृहीत धरून चाललो होतो. प्रत्यक्षात तेही गॅसवरच होते. मराठीच्या प्राध्यापकाची ही अवस्था तर मै किस खेतकी मूली!

शिरवाडकरांनी आम्हाला प्रेमानं घरात घेतलं. त्यांच्या चेहऱयावर क्वचित आढळणारे असे सौम्य, शांत, कृतार्थ भाव होते. शिवाय ते मंद स्मितही करीत होते.
‘तुमचा कार्यक्रम काय आहे सांगा.’ ते म्हणाले.

तत्काळ माझं टेन्शन दूर झालं. मी कार्यक्रमाविषयी पोपटासारखा बोलायला लागतो. मी दबावाखाली आहे हे त्यांनी अचूक हेरलं होतं. मला मोकळं करण्यासाठी त्यांनी जाणूनबुजून माझा विषय काढला होता. (हे सगळं माझ्या मुंबईला परतल्यावर लक्षात आलं.) पु. ल., जयवंत दळवी, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर त्यांच्या घरी आले असते तर शिरवाडकर काय क्रिकेटवर बोलले असते?

‘मी कॉलेजमध्ये असताना बरं का, क्रिकेट खेळायचो. मी कॉलेजच्या टीममध्ये होतो. आमच्या कर्णधाराला कायम दोन प्रश्न पडायचे. एक, शिरवाडकरला फलंदाजीला खाली म्हणजे किती खाली पाठवायचं आणि दोन, क्षेत्ररक्षण करताना शिरवाडकरला मैदानात कुठं लपवायचं!’

मी गदगदून हसलो. आयला, शिरवाडकर भारी भारी कविता करीत असतील; पण साला सॉलीड जोक करतात हं. आता कळलं सर, मघाशी आपल्या संघाच्या गलथान क्षेत्ररक्षणाबद्दल तुम्हाला सहानुभूती का आहे ते.

वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज गालातल्या गालात हसले.

z [email protected]