शिरीषायन – मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी : 20

>> शिरीष कणेकर

नाटय़ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यानं त्याच्या मुलीच्या लग्नात पुण्यात माझा एकपात्री कार्यक्रम ठेवला होता. प्रेक्षकांत बुजुर्ग कलाकार चंद्रकांत गोखले व चित्तरंजन कोल्हटकर यांना बघून मी नर्व्हस झालो. यांच्यासमोर करायचा कार्यक्रम? बापरे! चंद्रकांत गोखलेंच्या करारीपणाचे किस्से मी ऐकून होतो. ते लेकाकडे (पक्षी विक्रम गोखले) राहायचे व जेवायचे पैसे मोजत. काय की बाबा, आजकाल बाप पोराला विकून खाईल आणि पोरगा बापाला विकून खाईल.

कार्यक्रमानंतर जेवण होतं. गोखले, कोल्हटकर आणि मी आमची तिघांची व्यवस्था एका टेबलावर करण्यात आली होती. जणू मी त्यांच्याच वयोगटात होतो. पाहुण्याचा (पक्षी मी) सन्मान करण्याची ही पद्धत असावी. पण मला वाघांच्या पिंजऱयात गाढवाला ठेवल्यासारखं वाटत होतं.

माझं सहज गोखल्यांच्या ताटाकडे लक्ष गेलं. नैवेद्याला ठेवतात तसे अगदी कमी मोजके पदार्थ त्यांनी ताटात घेतले होते. मी मनाशी म्हणालो, आता कळलं या वयात इतकी तंदुरुस्ती कशी ते. आहारावर नियंत्रण हेच त्यांच्या वृद्धापकाळातील फिटनेसचं रहस्य होतं.

थोडय़ा वेळानं गोखले उठले आणि जेवण मांडलं होतं त्या लांबलचक टेबलाकडे गेले. ते परतले तेव्हा त्यांचं ताट शिगोशीग भरलेलं होतं. चपात्यांची चळत होती. वाटी भरून बासुंदी होती. भाताचा ढिगारा होता. आता तंदुरुस्तीचं रहस्य काय म्हणायचं?

मी मान खाली घालून तुकडे मोडू लागलो. मला एकदाही जेवणाच्या टेबलाजवळ जावं लागलं नाही.
h h h
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी वावडय़ा अधून मधून उडत असतात. त्या उडविणाऱयांना त्यापासून काय मिळतं तेच जाणोत.

अलीकडेच लताचा फोन वाजला. तिच्याकडे तिची भाची रचना (मीना खडीकरची मुलगी) आलेली होती. तिनं फोन उचलला. पलीकडून कोणी अपरिचित माणूस बोलत होता – ‘मी तुमचं सांत्वन करायला फोन केला होता. मी तुमच्या दुःखात सहभागी आहे.’

‘कसलं सांत्वन? कसलं दुःख?’ रचनानं बावचळून विचारलं.

‘अहो, असं काय करता? कोण बोलताय तुम्ही? आपल्या दीदी बऱया आहेत ना?’ अपरिचित सलगीनं म्हणाला.

‘काय?’ रचना फोनमधून किंचाळली, ‘शुद्धीवर आहात का तुम्ही? कोण बोलतंय? आयडेंटिफाय युअरसेल्फ. दीदीला काहीही झालेलं नाही. इन फॅक्ट, आम्ही गप्पा मारतोय. हॅलो-हॅलो…’

तोतयानं फोन ठेवून दिला होता. तो जर खरोखर साधा, चांगला माणूस असता तर लताची खुशाली कळल्यावर त्यानं असा घाईघाईनं फोन ठेवला नसता. लता सुखरूप असल्याचे कळल्यावर त्यानं समाधान व्यक्त केलं असतं, देवाचे आभार मानले असते, तीनतीनदा सॉरी म्हटलं असतं. आपल्या अभद्र शब्दांबद्दल क्षमा मागितली असती. त्यानं यातलं काहीच केलं नाही. सरळ फोन तोडला.
म्हणून म्हणतात, ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण!’
h h h
मोबाईलवर सतत कसले न कसले व्हिडीयो येत असतात. त्यातले अनेक नसते आले तर बरं झालं असतं असं वाटण्याजोगे असतात. काल एका व्हिडीओनं मात्र मला हलवलं. माझी छाती भरून आली.

नजर जाईल तिथपर्यंत सगळा बर्फच बर्फ. या बर्फात पाय रोवून काही हिंदुस्थानी सैनिक उभे होते. गुरखा पलटणीतले असावेत. त्यांच्यातल्या एकाचा वाढदिवस होता. बर्फात वाढदिवस काय साजरा करणार? का नाही करणार? त्यांनी बर्फाचा गोळा घेऊन त्याला केकचा आकार दिला. ‘बर्थ डे बॉय’नं तो ‘केक’ हातानं कापला. मग त्याला पहिला घास भरविण्यात आला. त्यानं बाकीच्यांना ‘केक’ भरवला. त्यानंतर सगळय़ांनी मिळून ‘हॅपी बर्थ डे टू यू’ म्हटलं. एकानं छोटेखानी भाषणही केलं. झाला वाढदिवस साजरा.

यंव रे गब्रू! क्या बात है. दॅट इज द स्पिरीट. वी आर सो प्राऊड ऑफ यू, ब्रदर्स…!!
z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या