
>> शिरीष कणेकर
मी मरणाला भीत नाही, परंतु यातना, क्लेश, वेदना या मृत्यूच्या निकटच्या नातेवाईकांना खूप भितो.
मला ‘शोफर-ड्रिव्हन’ मोटार आवडते, परंतु त्यासाठी मोजावे लागणारे पैसे आवडत नाहीत.
मला रुपवान नटय़ा आवडतात, परंतु त्यांच्या चारित्र्याची फडफडणारी लक्तरे मला आवडत नाहीत.
मला बॉडी-बिल्डर्स आवडतात, परंतु त्यासाठी करावी लागणारी घोर मेहनत आवडत नाही.
मला हॉटेलात जायला आवडतं, परंतु जेवणाचं बिल द्यायला आवडत नाही.
मी बदनामीला घाबरतो, परंतु इतरांची बदनामी करायला घाबरत नाही.
मला मार खायला आवडत नाही, परंतु इतरांना मार खाताना बघायला आवडतं.
मी शत्रूंना भितो परंतु, त्यापेक्षा जास्त मित्राची वस्त्रे व मुखवटे धारण केलेल्या छुप्या शत्रूंना जास्त घाबरतो.
मी शक्यतो गोड खाणं टाळतो, परंतु गोड बोलून कार्यभाग साधू पाहणाऱया मतलबी माणसांना जास्त टाळतो.
मला लठ्ठ बायका आवडत नाहीत, परंतु तरुण सडपातळ स्त्रियांना मी आवडत नाही.
मला सुवाच्च अक्षर आवडतं, परंतु सुवाच्च अक्षरातील भंगार लेखन मला आवडत नाही.
मला सिने-संगीत खूप आवडतं, परंतु संगीताच्या नावाखाली डोक्यावर पालथा केलेला कचरा मुळीच आवडत नाही.
मला मीठ जास्त खायला परवानगी नाही, परंतु तरीही मी खाल्ल्या मिठाला जागतो.
माझ्या रक्तात साखर आहे, परंतु त्यातली चिमूटभरही जिभेवर येत नाही.
मला कुत्रे आवडतात, परंतु भुंकणारे व चावणारे दोन पायांचे मानवी कुत्रे मला आवडत नाहीत.
मी बायकोपासून नजर चुकवून मान खाली घालतो, परंतु राणीच्या बागेत पिंजऱयातील वाघिणीच्या डोळय़ात डोळे घालून ताठ उभा राहतो.
अनिल अंबानी भलेही देशातील सर्वात श्रीमंत माणूस असेल, परंतु डॉक्टरी सल्ल्यानुसार त्याच्या अगडबंब मुलाला धड जेवताही येत नाही.
मला टीना मुनीम (दिसायला) आवडायची, परंतु तिच्या पायगुणानं आधी राजेश खन्नाचा व नंतर अनिल अंबानीचा ऱ्हास झाला.
मीनाकुमारीचा म्हणे दारूनं घात केला, परंतु धर्मेंद्रला काहीच झालं नाही.
माझा रक्तदाब उच्चीचा आहे, परंतु माझे ग्रह उच्चीचे नाहीत.
तरुणींच्या केशरचनेत मला काडीचा इंटरेस्ट नाही, परंतु त्यांच्या केसातून बोटं फिरविण्याची कल्पना मला भावते.
माझा देवावर विश्वास नाही, परंतु तो अधून मधून पावतो म्हणून त्याला अधून मधून नवस बोलतो.
दोन किंवा तीन मुलं असं म्हणतात, परंतु ती मुलं जन्माला घालणारी कुठं भेटेल हे कोणीच सांगत नाही.
परीक्षेत पास व्हावं लागतं, परंतु करेक्ट उत्तरे कोणीच सांगत नाही.
पापाचा घडा भरत असेलही, परंतु मुळात घरात घडा ठेवायचाच कशाला?
उंदीर मांजराला घाबरतो, मांजर कुत्र्याला घाबरतं, कुत्रा माणसाला घाबरतो, परंतु माणूस बाईमाणसाला घाबरतो.
त्याला गणितात खूप गती होती, परंतु म्हणून आयुष्याचं गणित सुटलं नाही.
शिकल्यासवरलेल्यांनाही चेहरे वाचता येत नाहीत, परंतु ‘फेस रीडर्स’ना ते आरामात वाचता येतात म्हणे.
आत्मा अमर आहे परंतु, सी.एच. आत्मा तर गेला.
शत्रू जवळ असावा म्हणून पुरुष लग्न करतात, परंतु चेचायची वस्तू हाताशी असावी म्हणून स्त्र्ाया लग्न करतात. ‘सासवा आणि पिसवा’ या शब्दांत खूपच साम्य आहे, परंतु पिसवा निरुपद्रवी असतात.
टांग्याचा घोडा व रेसचा घोडा यात फरक असतो, परंतु तो काय विवाहित पुरुष व अविवाहित पुरुष यांच्यातही असतो.
कपडे मुख्यतः लज्जारक्षणार्थ असतात, परंतु काही पोरी ते घालतात तेव्हा ते लज्जाप्रदर्शनासाठी असावेत असा समज होतो.
शिक्षकाची पत्नी त्याची सहधर्मचारिणी असेलही, परंतु प्रामुख्यानं छडी वापरून त्याला वळण लावणारी कडकलक्ष्मी असते.
साडी नऊवारी असो किंवा पाचवारी असो, परंतु तिच्या आतला देह किती कमनीय आहे यावर साडीचं सौंदर्य खुलतं.
मी बुद्धिमान असतो तर यापेक्षा वेगळं काय काय केलं असतं, परंतु ही शिंची बुद्धी सिटीलाइट मार्पेटमध्ये विकायला नसते.




























































