तुमने कहा, हमने लिखा

>> शिरीष कणेकर
खलीद महंमद हा माझा इंग्रजी पत्रकारितेच्या काळातील सहकारी. (मी पत्रकारिता फक्त इंग्रजीतून केली व लेखन फक्त मराठीतून केलं.) फार सुरेख लिहायचा. सफाईदार व ओघवतं. तो ‘टाइम्स’मध्ये हिंदी चित्रपटांची समीक्षा लिहायचा. त्याच्या मतांचा चित्रपटसृष्टीतही दबदबा होता. हळूहळू त्याच्या महत्त्वाकांक्षेला कोंब फुटले. त्यानं ‘तेहजीब’ नावाचा चित्रपट केला. साफ पडला. कारण वाईट होता. ‘ऑटम सन्नाटा’ या गाजलेल्या चित्रपटाचा ‘तेहजीब’ हा ‘रिमेक’ असूनही तो जमला नाही. पार फसला. चित्रपटाचं परीक्षण करणं (म्हणजे त्यातल्या चुका, दोष दाखवणं) वेगळं व स्वतः (चांगला) चित्रपट निर्माण करणं वेगळं, हे खलीदला कळलं असावं. कदाचित नसेलही कळलं. आपल्या चुका कळणारी व त्या मान्य करणारी माणसं कमी आढळतात. ‘तेहजीब’चं परीक्षण सुभाष घईनं केलं व पुढला मागला सगळा वचपा काढला. ‘अब हमारी सुनो’ असंच जणू घईला व त्याच्यामार्फत चित्रपटसृष्टीला खलीदला सुनवायचं होतं. खलीदनं आणखी एक चित्रपट काढला. तोही ‘तेहजीब’ शेजारीच गाढ झोपला. खलीद पुन्हा चित्रपट काढण्याच्या फंदात पडला नाही हेही नसे थोडके. लेखणी परजणं हे त्याचं काम होतं; कॅमेऱयामागून ‘ऍक्शन’ आणि ‘कट’ ओरडणं हे नव्हे.
खलीद महंमदची आज एकाएकी आठवण येण्याचं कारण म्हणजे त्यानं शब्दांकित केलेलं आशा पारेखचं आत्मचरित्र. याला इंग्रजीत ‘as told to so and so’ असं म्हणण्याची पद्धत आहे. ज्याला लेखनाचं अंग नाही असा ‘सेलिब्रिटी’ (बहुधा चित्रपट कलावंत) कोणा लेखकाची मदत घेतो. हा सांगतो आणि तो लिहितो. पण हे सगळं इतकं सोपं नाही. त्यानं सांगितलेलं तसंच्या तसं उतरवून घ्यायचं असेल तर त्यासाठी लेखक कशाला हवा? नुसता लेखनिक चालेल. वि. से. खांडकर व ना. सि. फडके या गतकालीन दिग्गज कादंबरीकारांचेही लेखनिक होतेच. पण खांडेकर व फडके यांच्या लेखनसंसारात या लेखनिकांचा वैयक्तिक वाटा नव्हता. ते लेखकाची शैली घडवत किंवा बिघडवत नव्हते. किंबहुना त्यांच्या हातातून उतरलेल्या साहित्याशी त्यांचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो. असलाच तर शुद्धलेखनातील चुकांपुरता असू शकेल. पण शुद्धलेखनात उत्तम असलेल्यांनाच लेखनिक म्हणून नेमण्याची पद्धत होती अन् अक्षर सुवाच्च असलेल्यांना. आमच्या इसाक मुजावर यांची कुसुमाग्रजप्रभृती बडय़ा साहित्यिकांत उठबस होती, पण त्यांना कोण लेखनिक ठेवेल?
‘‘इसाकभाई, तुमचं दिव्य अक्षर ‘रसरंग’मध्ये कुणाला कळतं हो?’’ मी त्यांना थट्टेनं विचारायचो.
‘‘आहेत एक-दोन. त्यांना कळतं’’. मुजावर गुरगुरल्या आवाजात हसून म्हणत.
‘‘तुमच्या हस्ताक्षरातलं तुमचं लेखन डायरेक्ट वाचकांपर्यंत पोहोचलं तर बघा किती वाचक कमी होतात ते.’’ मी म्हणायचो.
आशा पारेखचे चरित्र अतिशय वाचनीय आहे असं कानावर आलं. मी ते मिळवलं (व्हिच इज डिफरंट फ्रॉम विकत आणलं). आशा पारेख माझ्या आवडत्या नायिकांपैकी एक कधीच नव्हती. ‘दिल देके देखो’ या तिच्या पहिल्या चित्रपटात ती मैत्रिणींसमवेत कोडाळं करून बसलेली असते. एकाएकी ती मागे वळून कॅमेऱयाकडे बघते. हे नायिकेचे पहिले दर्शन होते. अशावेळी प्रेक्षकांतून ‘ओह’ असे उद्गार यायला हवेत. माझ्या मनात मात्र ‘ही नवीन नायिका?’ असे निराशायुक्त विचार आल्याचं मला स्पष्ट आठवतंय. रूप, अभिनय, व्यक्तिमत्त्व यापैकी कुठल्याच निकषावर ती उतरली नव्हती. मात्र देव आनंद, शम्मी कपूर, शशी कपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्याबरोबर तिनं सुपरहिट चित्रपट दिले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्या दृष्टीनं ‘द हिट गर्ल’ हे तिच्या आत्मचरित्राचं नाव यथायोग्यच म्हणावं लागेल.
‘डबल क्राउन’ साइजचं दोनशे अठ्ठावन्न पानांचं ‘द हिट गर्ल’ मी मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत संपूर्ण वाचून काढलं.  (दुसऱया कोणाचंही आपण वाचू शकतो हा विस्मयकारक शोध मला लागला.) ते नक्कीच पुरेसं रंजक होतं. पण सवाल ये था की यातलं आशा पारेखचं किती व खलीद महंमदचं किती? आशाकडून माहिती घेऊन त्यावर स्वतःचा मुलामा चढवून, स्वतःची भर घालून, स्वतःच्या शैलीत खलीदनं या चरित्राची मांडणी केलीय. वाचताना कळत नाही की यातलं आशाचं किती व कुठलं आणि खलीदचं किती व कुठलं.
एकदा आशाची मैत्रीण सायराबानू तिला म्हणाली, ‘‘आशा, तू लग्न करायला हवं होतंस. वेगळीच झाली असतीस.’’
‘‘वेगळी म्हणजे चांगली का?’’ आशानं विचारलं.
हा किस्सा तरी आशानं सांगितला तसाच दिलाय की खलीदनं त्यावर आपलं कलम चढविलंय, हा प्रश्न पडावा इतका चरित्रावर खलीदचा प्रभाव जाणवतो. माझ्या मते हा शब्दांकन करणाऱयाचा पराभव मानावा लागेल. चरित्र नायिकेचा स्वभाव, गुणदोष, मतं, विचारसरणी, आयुष्यातील घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळय़ा गोष्टी बाहेर यायला हव्यात. खलीद वरचढ ठरून या गोष्टींवर स्वतःचंच भाष्य, निरुपण, समर्थन व सारवासारव करताना दिसतो. आशा पारेख आहे तशी वाचकांपर्यंत पोहोचवणे हे शब्दांकन करणाऱयाचं काम आहे हे विसरून तो आशा पारेखचा वकील म्हणून उभा राहतो. तिला कादचित तेच हवं असेल पण वाचकांचं काय? त्यांच्याशी प्रतारणा होत नाही का? ‘faux pas’ हा शब्दप्रयोग आशाला माहित्येय? खलील जिब्रान तिनं वाचलाय?… अशा अनेक ठिकाणी आशाच्या तोंडून खलील बोललाय.
याच कारणानं मला ‘स्क्रीन’ साप्ताहिकाची माजी संपादिका व सायराची मैत्रीण उदय तारा नायर हिने लिहिलेलं दिलीपकुमारचे चरित्र निरस वाटले. तुम्हाला काहीच लिहायचं नाही तर चरित्र लिहिता कशाला? राज कपूर, देव आनंद आणि तो जादुई काळ याबद्दल दिलीपकुमारला काहीच म्हणायचं नसेल तर चरित्राची पानं वाचकांसमोर न ठेवता चणेवाल्यास द्यावीत…
– shireesh.kanekar&gmail.com
आपली प्रतिक्रिया द्या