शिरीषायन – मोठ्यांच्या छोट्या गोष्टी : 30

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिरीष कणेकर

ख्यातनाम संगीतकार अनिल विश्वास (म्हणा रे कोणी तरी ‘सीने में सुलगते है अरमाँ’ (तराना)- लता व तलत) हिंदी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेऊन द्वितीय पत्नी गायिका मीना कपूर हिच्यासह बंगालमध्ये बाडबिस्तरा घेऊन बसला होता, पण काही निमित्तानं त्याची कर्मभूमी मुंबईला अधूनमधून एखादी फेरी व्हायची. अशाच एका भेटीत त्याच्या मनात आलं की आपल्या काळाच्या जुन्या संगीतकारांचा मेळावा भरवावा. भेटी, गप्पाटप्पा, गाणीबजावणी असा भरगच्च कार्यक्रम त्याने योजला होता. त्याचं कमनशीब बघा, पहिलाच फोन सज्जादला करण्याची दुर्बुद्धी त्याला झाली. त्यांच्यात खालीलप्रमाणे संवाद घडला –

अनिलदा : कैसे हो बेटा?
सज्जाद : बेटा? बेटा? तुम मेरे बाप के उमर के कब हुए?
अनिलदा : मैं तुमसे पाँच साल बडा हूं।
सज्जाद : तो क्या पाच साल के उमर में तुमने बेटा पैदा किया था?
अनिलदा : ..? ..?
सज्जाद : और किस किसको बुलानेवाले हो?
अनिलदा : अंSSनौशाद.
सज्जाद : वा वा वा! म्हणजे संगीतातलं काहीही न कळणाऱयांनाही निमंत्रण आहे तर!

अनिल विश्वासनं फोन ठेवून दिला व मेळाव्याची कल्पना कायमची सोडून दिली.
कवी दीनानाथ मधोक (देव आनंदच्या बहिणीचा सासरा) खूपच टॅलेंटेड हाता. त्याच्यात एक छुपा संगीतकार दडलेला होता. तो चित्रपटासाठी गाणी लिहायचा तेव्हा त्या गाण्यांना चाल लावूनच आणायचा. संगीतकारांची याला हरकत नसायची. त्यांना आयती चाल मिळायची. शिवाय ती त्यांच्याच नावावर जायची. मधोक व सज्जाद एकत्र आले तेव्हा ठिणग्या उडणे स्वाभाविकच होते. मधुबाला अभिनीत ‘सैया’ला सज्जादचे संगीत होते व गाणी मधोकची होती. कराराच्या कागदाकडे सज्जाद बराच वेळ बघत होता.

‘काय झालं, सज्जादसाहेब?’ निर्माता-दिग्दर्शक एम. सादिकने विचारले.

‘यात माझं नावच नाही.’ सज्जाद म्हणाला.

‘असं कसं होईल?’ सज्जादच्या हातातून कागद घेत सादिक आश्चर्यानं म्हणाला, ‘हे काय, संगीत सज्जाद हुसेन.’

‘पण मी चित्रपटातली गाणी लिहीन असा उल्लेख कुठाय?’ सज्जादनं विचारलं, ‘चाली जर मधोक देणार असेल तर गाणी मी लिहीन.’

सादिक काय ते समजला. त्यानं मधोकला समज दिली. संगीत सज्जादच्या समर्थ हातात देऊन मधोकनं गाणी लिहिण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर ‘खयालों में तुम हो’, ‘काली काली रात रे’, ‘तुम्हे दिल दिया’ व ‘वो रातदिन वो शाम की’ ही मधोक, सज्जाद व लता यांची अफलातून कामगिरी होती.

एकोणीस वर्षांत सज्जादनं केवळ तेरा चित्रपट केले. त्यातील ‘गाली’, ‘मगरूर’ व ‘हलचल’ या तीन चित्रपटांत त्याच्यासह सहसंगीतकार होते. निर्मात्याशी वाजल्यामुळे त्यांचा प्रवेश झाला असावा. फाटकं तोंड व विक्षिप्त स्वभाव. त्यापायी त्यानं निर्मात्यांना दूर लोटलं असावं.

अलीकडेच लतानं मला सज्जादकडे गायलेली तिची गाणी पाठवायला सांगितली.

‘कुठली?’ मी विचारलं.

‘कुठलीही पाठवा.’ त्याची सगळीच चांगली आहेत.’ स्वरलता म्हणाली.

इतक्या संगीतकारांकडे इतकी छान छान गाणी गायल्यावर लता सज्जादला एवढा मोठा कॉम्प्लिमेंट देत होती. अनेक संगीतकारांनाही मी सज्जादच्या नामोच्चाराबरोबर कानाच्या पाळय़ा पकडताना पाहिलंय. त्याच्या घाणेरडय़ा चाळीतील त्याच्या जास्त गलिच्छ उंबऱयावर पांढऱया शुभ्र शास्किनच्या कपडय़ातील ओ. पी. नय्यरनं त्याच्या पायावर सपशेल लोटांगण घातल्याचा मी साक्षीदार होतो. ‘तुझे क्या सुनाऊं मैं दिलरूबा’ (आखरी दाव – रफी) ही चाल आपण सज्जादच्या ‘ये हवा ये रात ये चांदनी’ (संगदिल – तलत महमूद) वरून घेतल्याची कबुली द्यायला मदन मोहन सज्जादकडे गेला होता.

एक सज्जाद भक्तानं त्याला विचारलं, ‘नूरजहान कशी वाटते?’

‘तुला आवडत असेल तर ऐक की. मी थोडाच आडवा येतोय?’

‘तसं नाही. मला विचारायचंय की लताच्या तुलनेत ती कशी वाटते?’

‘लताच्या तुलनेत?’ सज्जाद म्हणाला, ‘तू हिंदू आहेस ना? मग मला सांग, माँ सरस्वती के साथ किसी और को बिठाते है क्या? मैं उपर खुदा को और नीचे लता को मानता हूं। सैगलही मला प्रिय आहे, पण ते सगळं लतानंतर…’

फलाणं गाणं तू संध्या मुखर्जींकडून गाऊन घेतलं होतंस का, या माझ्या प्रश्नावर उसळून सज्जाद म्हणाला होता, ‘हम किसी संध्या या सुबह को नही जानते. हम सिर्फ लता से गवाँ लेते है. लता गाती है, बाकी सब रोती है.’

माझ्या नव्हाळीच्या उमाळय़ात मी पहिल्या भेटीत सज्जादला विचारले होते, ‘अनिल विश्वास कसा वाटतो?’

‘अच्छे थे, मुझे बहुत मानते थे।’

‘आणि सी. रामचंद्र?’

‘वो भी अच्छे थे। मुझे बहुत मानते थे।’

‘रोशन?’

‘वो भी अच्छे थे, मुझे बहुत मानते थे।’

पुढले प्रश्न माझ्या घशातच गुदमरले. ‘मुझे बहुत मानते थे’ हे त्याचं ठाशीव उत्तर तयारच होतं. ‘सज्जाद कैसे थे’ असं मी विचारलं असतं तर तो म्हणाला असता, ‘अच्छे थे। मुझे बहुत मानते थे आणि खरंच होतं ते.

 [email protected]