
>>शिरीष कणेकर
पञ्जर दिवसांनी नव्हे, फार वर्षांनी मला माझा जाड चष्मेवाला मित्र भेटला. त्याच्यात म्हणण्यासारखा विशेष फरक पडला नव्हता. चष्म्याचा नंबर आणखी वाढायला स्कोपच नव्हता.
‘‘अरे होतास कुठे तू?’’ त्याच्या पाठीवर थाप मारत जुनी सलगी दाखवत मी विचारलं.
‘‘इथेच होतो. तू कुठे होतास?’’ त्यानं प्रतिप्रश्न केला ही त्याची जुनी सवय. तुला मधुबाला आवडते का, असं विचारलं तर उत्तर न देता तोच उलट तुम्हाला विचारणार, ‘‘तुला आवडते का मधुबाला?’’
मागे त्याला मी विचारलं होतं, ‘‘लग्न का करत नाहीस?’’ लगेच पलीकडून उत्तर-कम्-प्रश्न आला, ‘‘तू का करत नाहीस?’’
मी वैतागून म्हणालो होतो, ‘‘मी का करत नाही यावर तू का करत नाही हे ठरणार आहे का? मी करत नाही कारण माझ्याशी कोणी करत नाही.’’
‘एक्झॅक्टली! माझ्याशीही कोणी करत नाही’’ तो समाधानानं म्हणाला व चष्मा काढून खसाखसा पुसायला लागला. आपल्याला चष्मा नाही याचं त्याक्षणी मला वाईट वाटलं होतं. शिवाय त्याला कशाचं समाधान वाटत होतं हेही जाणून घ्यायला मला आवडलं असतं. यच्चयावत उपवर पोरी आपल्याला नकार देतात यात कसलं आलंय बोडक्याचं समाधान? त्या वाचल्या असं तर त्याला वाटत नव्हतं ना…?
माझ्या या जाड चष्मेवाल्या मित्राबरोबर एकदा मी मुलगी बघायला गेलो होतो पंपनी म्हणून. ‘एक से भले दो’. मुलगी त्यानं बघण्याआधीच पसंत केली होती. ती सांगून आली एवढं पुरेसं होतं. मुलीची फार तर थोरली बहीण वाटणारी तिची तरणी आई माझ्या मनात भरली होती, पण म्हटलं आधी आपल्या मित्राचं ठरू दे. मग आपलं घोडं पुढं दामटू. आई कुठं जात्येय? मायलेकीचं लग्न एकाच मांडवात. दोन जिगरी दोस्तांचं लग्नही एकाच मांडवात. म्हणजे बघायला आलेलो ती मुलगी थोडय़ाच दिवसांत माझी ‘रेडिमेड’ मुलगी होणार. इतपंच नाही तर माझा जाड चष्मेवाला मित्र माझा जावई होणार. जावयाची खातिरदारी म्हणून मला माझ्या इंपोर्टेड शर्टानं त्याचा जाड चष्मा खसाखसा पुसून द्यावा लागणार.
माझं हे मधुस्वप्न भंग पावलं. त्या मुलीनं माझ्या जाड चष्मेवाल्या मित्राला प्रथेनुसार सपशेल नकार दिला. हे एकवेळ परवडलं, पण तिनं एकाच फटक्यात त्याला आणि मला दोघांनाही नाकारलं, याला काय अर्थ होता? मी तिला कुठे सांगून गेलो होतो? मला रिंगणात ओढण्याची काय गरज होती? तिच्या नकारामुळे तिच्या आईवर अकारण दडपण आलं असणार. मुलगी नाही म्हणाली त्याला हो कसं म्हणायचं? जो जावई व्हायचा तोच नवरा कसा? मुलगी मनाशी काय म्हणाली असेल? जो नवरा होऊ शकला असता त्याला बाप म्हणून कसा स्वीकारायचा? या सगळय़ा गोंधळात कोणाचंच लग्न जुळलं नाही. पुढे नंतर मला कळलं की, त्या मुलीनं ज्याच्याशी लग्न केलं त्याच्या बापानं तिच्या आईशी लग्न केलं. च्या मायला, या तिढय़ावर असा तोडगा होता तर. या सगळय़ा तापदायक प्रकरणात माझा एकच फायदा झाला. माझ्या ‘इंपोर्टेड’ शर्टानं माझ्या मित्राचा चष्मा पुसणं टळलं होतं.
बघता बघता आमच्या लग्नाचा विषय हा राष्ट्रीय प्रश्न झाला. निरनिराळय़ा राज्यांचे मुख्यमंत्री एकत्र बैठकी घेऊन आमच्या लग्नाचा गहन विषय ऐरणीवर घेत होते. या तुंबळ चर्चेनंतर त्यांच्या काही सचिवांची स्वतःचीच लग्न मोडल्याच्या विदारक बातम्या आमच्या कानावर आल्या. विविध परदेशी तज्ञ, दूत, पर्यटक इकडे आले की, त्यांच्यापुढेही आमची समस्या मांडली जाई. आमचे पह्टो पाहिल्यावर आमची लग्ने का होत नसावीत याचा त्यांना अंदाज आला. तरीही त्यांनी आमच्या लग्नाचे आव्हान स्वीकारले. फ्रान्स, जपान आदी देशांतील उपवर कन्यकांची स्थळे त्यांनी आणली. आम्ही एका पायावर तयार होतो. आपल्या संस्कृतीची जाण नसल्यामुळे आम्ही एका पायावर का उभे आहोत हे समजावून सांगता सांगता आमच्या नाकी नऊ आले. ‘नाइन केम टू अवर नोज’ हेही त्यांना कळेना. अडाणी लेकाचे. आम्ही तुमच्या मुलींना सुखात ठेवू हेदेखील त्या अक्षरशत्रूंना मुलींना ‘रिफ्रिजरेटर’मध्ये पिंवा चुलीमध्ये पिंवा वॉशिंग मशिनमध्ये ठेवू असं कायसं वाटलं. हे बिथरले व पाय आपटत निघून गेले. त्यांच्याबरोबर त्यांनी आणलेली सुस्वरूप स्थळेही माघारी गेली. आता कोणी ‘स्थळांना भेट’ म्हणालं की, आम्ही घाबरेघुबरे होतो. एकदा तर प्रेक्षणीय स्थळाला भेट देताना माझ्या जाड चष्मेवाल्या मित्राच्या चष्म्याची काच तडकली होती. तो उद्वेगाने म्हणाला,
चष्मा फुटे, पोरगी न भेटे
नशिबी आले धुणे म्हशींचे गोठे
माझ्या जाड चष्मेवाल्या मित्राला आणि मला पूर्वी म्हणजे हेलन तरणीबांड होती, तेव्हा बैलांची खिलारी जोडी म्हणत. आता रेडे म्हणतात, असं कॉलनीतली एक म्हैस सांगत फिरते.
अखेर ज्यांच्याशी कोणी म्हणजे कोणी लग्न करत नव्हतं अशा दोन पोरींशी (आय मीन, बायकांशी) आम्ही दोघांनी लग्न केलं.
‘‘का रे एकटाच आलास?’’ अनेक वर्षांनी भेटल्यानंतर मी माझ्या जाड चष्मेवाल्या मित्राला विचारले.
‘‘गेली सोडून’’ तो आनंदाने थयथयाट करीत म्हणाला.
‘‘काय?’’ मी पिंचाळलो.
म्हणजे मलाही स्कोप होता तर!
– [email protected]

























































