शिरीषायन – मला पडलेले फिल्मी प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिरीष कणेकर

राखी गुलझारला सोडून का गेली?
ओ. पी. नय्यरनं लता मंगेशकरला एकही गाणं न देण्याचं खरं कारण काय?
किशोरकुमार, हेमंतकुमार व मन्ना डे दिलीपकुमारसाठी एकदाही का गायले नाहीत?
आशा पारेख (80), हेलन (84) व वहिदा रहेमान (85) या जिवलग मैत्रिणींचे आशिक अनुक्रमे नाझीर हुसेन, पी. एन. अरोरा व गुरुदत्त मागेच निवर्तले; पण पिकनिकला, बोटिंगला जाण्याइतकं तारुण्य व उत्साह या तिघींनी अद्याप कसं टिकवलंय?
‘शक्ती’ पाहून आल्यावर राज कपूरनं ‘आज भी दुनिया में एकही युसुफ है’, असे उद्गार का काढले?
एका समारंभात बांगलादेशची रूना लैला लता मंगेशकरच्या पाया पडली तेव्हा संगीतकार जयदेव उद्गारला, ‘देखो, सूरज इन्सान के पैर छू रहा है.’ असं का?
दिलीपकुमारनं ‘प्यासा’ व देव आनंदनं ‘जंजीर’ का सोडले?
नौशादनं ‘अंदाज’मध्ये दिलीपकुमारसाठी मुकेश व राज कपूरसाठी महंमद रफी अशी उलटी निवड करून ती यशस्वी कशी करून दाखवली?
पेहरावापासून हावभावांपर्यंत पूर्णपणे पाश्चिमात्य असलेली झीनत अमान आपल्या प्रेक्षकांना कशी एवढी आवडली?
नर्गिस राज कपूर सोडून आणखी कोणाला सुंदर वाटली?
किशोर कुमारनं आयुष्यात एकूण चार लग्ने केली. हा विक्रम असू शकेल का?
स्वभावानं अतिशय गोड असं लता मंगेशकर जिचं यथार्थ वर्णन करते त्या मीनाकुमारीच्या वाटय़ाला इतकी दु:खं का आली?
नूरजहान फाळणीनंतर हिंदुस्थानातच राहिली असती तर लताच्या आगमनानंतर तिचं कठीण झालं असतं, असं तलत मेहमूद पाकिस्तानात पत्रकारांसमोर स्पष्ट बोलण्यावर पत्रकार का रागावले होते?
आशा भोसलेची दिवंगत कन्या वर्षा ‘संडे ऑब्झर्वर’मध्ये फडर्य़ा इंग्लिशमध्ये फर्मास स्तंभ लिहायची. तो वाचून देव आनंद उत्स्फूर्तपणे बोलून गेला, ‘आशा की बेटी भी अंग्रेजी लिखती है!’ नकळत आपण आशाचा उपमर्द केलाय, हे देवला कळलं होतं का?
राज कपूर लता मंगेशकरच्या डोक्याला मालीश करतोय असा फोटो सर्वत्र आला होता तेव्हा पुढे मागे लता आपली चंपी करेल हे त्याच्या ध्यानीमनी तरी होतं का?
शमशादला रेकार्डिंग स्टुडियोच्या गेटच्या बाहेर उभं करून गायला लावलं असतं तरी काही फरक पडला नसता, असे निवृत्तीनंतर शमशादचे स्तुतीगीत गाताना नौशाद सोयिस्करपणे विसरला होता का की एकापेक्षा एक सरस गाणी त्यानं आवर्जून लताला दिली होती?
‘ए समा हम तुम जवाँ’ (‘पिलपिली साहेब’- शार्दुल ख्वाजा) हे द्वंद्वगीत लतासह गाणाऱया शामींदरनं आत्महत्या का केली?
भायखळय़ाला बंगल्यात शेजारी राहणारी उषा सामी (लग्नानंतर उषा उथुप) गच्चीत बसून मोठमोठय़ानं गायची तेव्हा आम्ही एका सुरात ‘उषा गप-उषा गप’ असे ओरडायचो त्याचा आज पश्चात्ताप होतो का?
हेमंतकुमार गायक म्हणून त्याच्या वाटय़ाला संगीतकार म्हणून कमी चित्रपट आले, की तो संगीतकार म्हणून त्याच्या वाटय़ाला कमी गाणी आली?
‘चैन से हमको कभी’ (‘प्राण जाये पर वचन न जाये’) या आशा भोसलेनं गायलेल्या गाण्याबद्दल संगीतकार ओ. पी. नय्यरला मिळालेली ‘फिल्मफेअर’ची ट्राफी त्यानं हाजीअलीजवळ समुद्रात भिरकावून दिली. आशा पारितोषिक स्वीकारायलाच समारंभाला गेली नाही. हा उभयपक्षी एकमेकांविषयी असलेला खुन्नस कुठून व कशामुळे आला?
दिलीपकुमार-गीताबाली ही जोडी एकत्र चमकवावी असं कोणालाच कसं वाटलं नाही?
‘चलती का नाम गाडी’मध्ये अशोककुमार, किशोरकुमार व अनुपकुमारच्या ऐवजी राज कपूर, शम्मी कपूर व शशी कपूर हे तीन भाऊ असते तर काय झालं असतं?
‘संगम’मधील दोन नायकांपैकी कुठलीही भूमिका करायला दिलीपकुमार तयार होता. अट एकच! चित्रपट राज कपूरनं दिग्दर्शित करायचा नाही. दिलीपकुमारनं ही अट का घातली असेल? अन् राज कपूरला ती का परवडली नसेल?
‘नमकहराम’ चित्रपटात राजेश खन्नाला अमिताभनं केलेली भूमिका करायची होती. हृषिकेश मुखर्जीनं दुसरी भूमिका आपल्या गळय़ात मारली व तिथं आपल्या कारकीर्दीला ग्रहण लावलं व घसरण सुरू झाली असंच राजेश खन्ना शेवटपर्यंत म्हणत राहिला ते पटतं का?
– [email protected]