लठ्ठपणा

>> शिरीष कणेकर

लठ्ठपणा अनारोग्याचं मूळ आहे असं एक आघाडीचं वृत्तपत्र सांगतं. यावर उपाय म्हणजे आपण ते वाचायचेच नाही. कारण लठ्ठपणा देवानं दिलेला असतो. देवाच्या कामात दखल देणारे आपण कोण? आपण म्हणतो ना, ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ (‘ठेविला अनंता तसाच राहिला.’ असे ठणठणपाळानं अनंत भावेंविषयी फर्मास लिहिले होते).

जाडेपणाची मी अनेक कारणे (म्हणजे समर्थने) ऐकलीत. त्यातील ही थोडी पहा (1) लठ्ठपणा आमच्याकडे आनुवंशिक आहे. (2) आमच्या पणजोबांना चरबी चढली होती. ती आमच्यात उतरली. (3) लहानपणी आम्ही खूप टरबुजं खायचो म्हणून टरबुजांसारखे दिसायला लागलो. केळी, काकडी, पडवळ खायला हवी होती. (4) ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ ही उक्ती विसरलो आणि पु. ल. प्रभृतींमुळे घोडय़ासारखा खिंकाळून हसत राहिलो. (5) निर्मळ मनाचा असल्यामुळे जाडा आहे. (6) मी जाडा होत असताना तसं मला कोणीच सांगितलं नाही. (7) आमच्या सोसायटीत सगळय़ाच बायका लठ्ठ आहेत. आम्ही कोणीही चवळीची शेंग घरात येऊ देत नाही. (8) हवा खाऊनही मी जाडी होते. (9) गेल्या जन्मीचं पाप असणार. कारण या जन्मी मी केवळ पुण्यच केलंय. (10) सडपातळ सुनेनं टोमणे मारून मारून माझं वजन वाढवलंय व घरातलं कमी केलंय.

जाडेपणावर केलेले उपाय (व पदरी आलेले दृश्य अपयश) हा संवेदनशील, हळवा व त्याच वेळी प्रक्षोभक असा विषय आहे. याबाबत विचारले गेलेले काही प्रश्न व त्यांना मिळालेली उत्तरे वाचा.

व्यायाम करता का?
(1) नाही. दमायला होतं. घरकाम हाच माझा व्यायाम.
(2) नाही. नवरा हसतो. त्यामुळे होणाऱया संतापानं माझं वजन वाढतं.
(3) नाही. व्यायामाचे प्रकार आरामात आरामखुर्चीत बसून करता आले असते तर मी अवश्य केले असते. आरामखुर्ची मोडली असती असं माझा नवरा कुजकटपणे म्हणतो.
(4) एकदा चालायला गेले होते, पण येताना रिक्षा करावी लागली. मग दोन्ही वेळा रिक्षा करून जाऊ लागले. परवडेनासे झाल्यावर थांबले.
(5) दोरीवरच्या उडय़ा मारण्याचा प्रयत्न केला. तोंडावर पडून नाक फुटले. खालच्या मजल्यावरचे भांडायला आले ते वेगळेच.
(6) तोंड चालविणे हे व्यायामात मोडते का? मग माझा हा व्यायाम दिवसभर चालतो. घरातले कानात कापसाचे बोळे घालतात. मला काय, माझा व्यायाम होतो.
(7) डॉक्टरने मला मानेचे व्यायाम सांगितलेत. शेजारच्या घरात सतत डोकावून मी हा व्यवसाय नियमितपणे करते.
‘डाएट’ करता का?
(1) कसं करणार? एवढं अन्न रोज उरतं ते काय फेकून द्यायचं? हा माजोरडेपणा माझ्या आईनं नाही शिकवला.
(2) तसं मी कॅलरीयुक्त फारसं काही खातच नाही, फक्त नॉनव्हेज खातो व दारू पितो.
(3) माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की, खाण्याचा आणि जाडेपणाचा काहीही संबंध नाही म्हणून मी काहीही खातो.
(4) ‘डाएट’ करूनही काही फरक पडला नाही. मग खाण्याच्या आनंदाला का मुका?
(5) ही ‘डाएट’ वगैरेंची श्रीमंती थेरं करून आम्हाला कुठं ‘ब्युटी क्वीन’ स्पर्धेत जायचंय? बिल्डिंगचा जिना चढता आला तरी खूप झालं. त्या परचुरे बाईला बघितलंय का जिना चढताना? हॅ। हॅ। हॅ।
(6) नुसते चुरमुरे खाऊन व पाणी पिऊन राहायचं? मग चिकन, मटण, रबडी, पुरणपोळी हे काय कुत्र्यांना घालायचं?

आपल्या जाडेपणाची खंत वाटते का?
(1) नवरा रस्त्यात वळून वळून तरुण, सडपातळ पोरींकडे बघतो तेव्हा वाटते. मग रात्रीच्या त्याच्या जेवणात तिबल मीठ घालते. नमकीन पोरी पोटभर बघितल्यात नं, आता पोटभर मीठ खा.
(2) ऑफिसात तरुण ख्रिश्चन सेक्रेटरी वारंवार माझ्या पोटाकडे कटाक्ष टाकते तेव्हा वाटते.
(3) क्रिकेट सामन्यात पोटापायी चेंडू अडवायला व उचलायला जमत नाही व सगळा स्टाफ बघून दात काढतो तेव्हा वाटते.
(4) या वयात लोकांना वाटतं की, मी गरोदर आहे तेव्हा मला सुटलेल्या पोटाची व एकूणच जाडेपणाची लाज वाटते.
(5) कश्मीरला जाऊन घोडय़ावर बसता येत नाही तेव्हा जाडेपणाची खंत वाटते. नवरा टुणदिशी घोडय़ावर बसतो. त्याची जास्तच खंत वाटते.

जाडेपणा घालविणारी एखादी गोळी बाजारात आली तर?
(1) अय्या, मी तर पिंपभर गोळय़ा घरी आणून ठेवीन व कोणालाही सांगणार नाही. त्यांना राहू देत जाडय़ाच्या जाडय़ा.
(2) दिवसातून किती गोळय़ा घ्यायच्या व कशाबरोबर?
(3) तिकडे अमेरिकेत आल्या असतील. इकडे येई येईपर्यंत आम्ही म्हाताऱया होऊ. (म्हणजे आज नाही?).

फुग्याप्रमाणे सर्वांगानं फुललेल्या अतिविशाल महिला दावा करीत असतात की, कोणे एकेकाळी पूर्वी (रॉबर्ट क्लाइव्ह हिंदोस्तानात आला होता तेव्हा) त्या दीपिका पदुकोन, अनुष्का शर्मा यांच्यासारख्या स्लिम आणि ट्रिम होत्या. आता याला साक्षीदार कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. तो तर कधीच गेला. तुम्ही विरोधी सूर काढण्याची हिंमत केलीत तर वणवा पेटणार. व्हा जळून भस्मसात, पण तुला तशी बघितलेलं कोणी तरी असेलच ना? नवऱयानं विचारण्याची हिंमत केली. आधी तिनं (अधू) नजरेनं त्याला जाळलं व मग जुन्या ट्रंकेतला आपला फोटो काढून दाखवला.
तो फोटो उषाकिरणचा होता असा नवऱयाला आजही संशय आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या