
>> शिरीष कणेकर
‘उडता पंजाब’मधल्या शाहीद कपूरप्रमाणे माझे दाढीचे खुंट वाढले होते. (नशीब पुरुषत्वाची एवढी एक निशाणी तरी आहे.) डोईवरचे केसही काँग्रेस गवताप्रमाणे फोफावले होते. अखेर नाईलाजानं पाय ओढत मी सलूनकडे निघालो. साधारण देवनारमधल्या कापायला नेत असलेल्या बोकडासारखा मी दिसत होतो.
एका दुकानदारानं माझ्याकडे हसून बघितलं व मी केविलवाणं हसून प्रतिसाद देण्याआधीच तो म्हणाला, ‘केवढे केस आणि दाढी वाढलेत? अर्थात तुमची हजामत कोण करणार म्हणा!’
या खेपेला मी केविलवाणं हसण्याचाही प्रयत्न केला नाही. माझी हजामत कोण करणार? हा ‘काँप्लिमेंट’ म्हणायचा की बदनामीकारक आरोप? या न्यायानं सर्वच विवाहित महिलांना केशकर्तनाचा डिप्लोमा करण्याची गरजच नाही. त्या नवऱयाची व्यवस्थित चंपी करत असतात. हजामत तर पाचवीला पुजलेली. त्यानंतर पुरुष वेगळे सलूनमध्ये का जातात तेच कळत नाही. घरच्या घरी तुमची फुकट हजामत होत असते ना? पुरुष तुकतुकीत दिसत असला की त्याचे मित्र कौतुकानं विचारतात – ‘आज हजामत झालेली दिसते.’ नापितही या नियमाला अपवाद नसतात. बायको ही तासडंपट्टी करणारी स्वयंप्रेरित मानवी यंत्र आहे. म्हणून पुरुष यंत्रवत वागताना दिसतात. चावी दिली की ही खेळणी चालतात, बोलतात, उठतात, बसतात. हजामतीला उसन्या उत्साहानं तोंड (आय मीन, डोकं!) देतात.
साहेबानं केलेली हजामपट्टी व बायकोनं केलेली हजामपट्टी यात काय फरक आहे? साहेबाला तुम्ही प्रसंगी दुरुत्तरं करू शकता व राजीनामा त्याच्या तोंडावर मारू शकता. बायकोपुढे काहीच चालत नाही. तुम्ही बॅग भरून माहेरीही जाऊ शकत नाही, रडून भेकून आकांत करू शकत नाही, तोंडातल्या तोंडात शिव्याशाप देऊ शकत नाही, भांडय़ांची आदळआपट करू शकत नाही, भाजीत मुद्दाम जास्त मीठ घालू शकत नाही, रात्री पाठ करून झोपू शकत नाही…
पोलीस स्टेशनातल्या हजामपट्टीला एकतर्फी मारझोडीची चंदेरी किनार असू शकते. काही वर्षे मी वरळी पोलीस स्टेशनच्या बरोबर समोर राहत होतो. (स्टेशनात जाण्याचा योग रवळनाथाच्या कृपेनं आला नाही. पण तिथल्या कोठडीत मी अधिक शोभलो असतो असे अनेक रहिवाशांचे मत होते.) बाल्कनीत उभं राहिलं की समोर अनेक गमती जमती पाहायला मिळायच्या, आपण (अजून तरी) बाहेर आहोत याचा आनंद वेगळाच.
एकदा भांडणतंटा करणाऱया एका समूहाला धरून आणण्यात आलं होतं. सगळे एकाच वेळी बोलत होते. त्यामुळे कुणाचं कुणाला ऐकू येत नव्हतं. मुख्य म्हणजे बाल्कनीत मला ऐकू येत नव्हतं, मी फुकट करमणुकीला मुकत होतो. आपल्यावर आवाज चढवून कोणी बोलावं हे पोलिसांना अजिबात रुचत नव्हतं. ओरडणाऱयांना थोडं शांत करून स्थानिक नेता असू शकेल किंवा होऊ शकेल असा त्यातल्या त्यात जबाबदार दिसणारा एक मध्यमवयीन माणूस आत्मविश्वासानं पुढे सरसावत धीरगंभीर आवाजात म्हणाला, – ‘त्याचं काय आहे, साहेब -’ दुर्दैवानं त्याचं वाक्य पूर्ण व्हावं हे नियतीला मंजूर नव्हतं. समोर उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱयानं काहीही ऐकून न घेता खाडकन् त्याच्या मुस्काटीत मारली. सगळं टायमिंग असं काही जमून आलं की, त्या नेत्याचा जबडा हलला. तोंडातले शब्द निखळून पडले. सोबत दातही पडले असू शकतील. ‘त्याचं काय आहे, साहेब-’ हे चार शब्द या क्रमानं त्यानं उरलेल्या आयुष्यात उच्चारले नसतील. बाल्कनीत माझे पाय का लटपटत होते कोण जाणे.
एकेकाळी बाप मुलाची हजामत करायचा. तशी वहीवाटच होती. ती जगन्मान्य होती. काळ बदलला. हजामत कायमच राहिली, पण ती कोणी कोणाची करायची याचे संकेत बदलले. आमूलाग्र बदलले. मुलं बापाची हजामत करायला लागली. आता तर हे सत्कृत्य नातू करायला लागलेत. त्यातून तुम्ही हिंदुस्थानात असलात व तुमची नातवंडे अमेरिकेत असतील तर मेलातच. सगळी हुशारी, शहाणपण व अक्कल याचं त्यांना बाळकडूच मिळालेलं असतं. ती थेट ट्रंपचीच माणसं असतात. हू द हेल आर यू! नात्यामुळे ती पोरं ओळख तरी दाखवतात. एरवी तुम्ही ‘ब्लडी इंडियन्स’ असता.
माझा नातू माझ्या मुलाला म्हणाला, – ‘इंडियात जाऊन राहायला माझी मुळीच हरकत नाही पण तिथं शाळा कुठं आहेत?’
मी आणि माझा मुलगा दोघंही चाट पडलो. हिंदुस्थानातील शिक्षण पद्धतीविषयी जन्मानं आपसूक अमेरिकन नागरिकत्व मिळालेल्या माझ्या नातवाला काही माहिती नसेलही; पण हिंदुस्थानात शाळाच नाहीत ही बहुमोल माहिती त्याला कोणी दिली? द्यायला कशाला पाहिजे, श्रीमंत, समृद्ध व शक्तिमान देशाच्या नागरिकाला ते आपसूक कळलं. आम्ही श्रेष्ठ, तुम्ही बाकी सगळे भीकमंगे! माझ्या दुसऱया नातवानं मला लिहिले – ‘करेक्ट युअर इंग्लिश फर्स्ट!’ ‘माझं इंग्लिश? मी हयातभर इंग्लिश पत्रकारिता केली. एक खुंटाएवढा पोरगा त्यात सुधारणा करायला सांगतोय?’ मी दुखावून व तडकून उत्तरादाखल लिहिलं. ‘यू हॅव गॉन ओल्ड ऍण्ड युअर इंग्लिश इज डेड.’ तो म्हणाला. नशीब ‘यू आर डेड’ नाही म्हणाला. हे आजोबाला झापणं होतं. आता पुढली पायरी हजामत…





























































