शिरीषायन – दिलू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  शिरीष कणेकर

मी फोन फिरवला. पलीकडून उचलल्याचा आवाज आल्याबरोबर मी सुरू झालो – ‘का रे xxxxx ! तुझ्या xxx xxx xxxxx’

फोनमधून खळखळून हसणे ऐकू आले तेव्हाच माझ्या शिव्यांचा भडीमार थांबला.

माझ्या काळजाला ठंडक पोहोचली. माझ्या सगळ्यात जुन्या व जवळच्या मित्राला क्षणभर का होईना, मी हसवले होते. याचसाठी माझ्या अट्टहास होता. माझ्या बिछान्याला खिळलेल्या जिगर दोस्ताच्या सर्वस्वी परावलंबी आयुष्यात ओझरती हास्याची लकेर आपण आणू शकलो याचं मला धन्य वाटलं होतं. यापेक्षा अधिक मी काही करू शकत नव्हतो. डॉक्टरही काहीच करू शकत नव्हते. मानवी प्रयत्न थिटे पडले होते.

एके काळी आमच्या मित्राचं – दिलू राजेचं हसणं दणाणून सोडायचं. पौराणिक चित्रटातील रावणासारखा तो हसायचा. नुसता गडगडाट. एकदा आम्ही रॉक हडसनचा चित्रपट बघायला गेलो होतो. रॉक हडसनच्या चित्रपटाला स्वतःच्याच चित्रपटाच्या प्रीमियरला गेल्यागत तो (नसलेल्या) मानवंदना स्वीकारत रुबाबात जायचा, तसा तो रुईया कॉलेजचा रॉक हडसन होताच म्हणा. त्याला व क्रिकेटपटू अरुण वर्देला ‘हँडसम डोअरकीपर्स ऑफ रुईया कॉलेज’ असा ‘फिशपाँड’ मिळाला होता. कॉलेजच्या फाटकातून आत जायचं असतं व शिकायचं असतं हे त्याला कोणी सांगितलंच नव्हतं. क्रांतिकारी इंग्रजांचा तिरस्कार करत नसतील तेवढा तो शिक्षणाचा करायचा. त्याला शक्य असतं तर शिक्षण बंद करून त्यानं पीडित समाज शिक्षणमुक्त केला असता. सरकारनं त्याचा शिक्षणद्वेष्टा म्हणून गौरव केला असता.

तो कुठेही चवळीच्या शेंगेसारखी स्लिम छत्री घेऊन फिरायचा. ही छत्री पावसापासून संरक्षणार्थ म्हणून नसे (तो ती कधी उघडायचाही नाही.) की काठीप्रमाणे आधार म्हणून नाही. ‘मॅन विथ द गोल्डन गन’सारखा आपल्यावर ‘मॅन विथ अ स्लिम अंब्रेला’ नावाचा चित्रपट निघेल अशी त्याची धारणा होती. यासाठी शिक्षणाची व पदवीची काय गरज होती?

… हा, तर सांगत काय होतो, रॉक हडसनच्या चित्रपटातील पहिलाच सीन. विराण वाळवंटात एका तंबूत रॉक हडसन व एक अरब धंद्याच्या गोष्टी बोलतायत. चर्चा संपवून दोघं तंबूबाहेर येतात. बाहेर चकाचक रोल्सराइस गाडी व उंट उभे असतात. अरब रोल्सराइसमधून व रॉक हडसन उंटावरून विरुद्ध दिशेला निघून जातात. थिएटरात हास्याचा स्फोट झाला. त्यात मी आणि दिलू सामील होतो. हास्याचा जोर ओसरला तरी दिलू त्याच तीक्रतेनं हसत होता. हास्य विरून प्रेक्षक पुढील चित्रपट पाहू लागले तरी दिलू त्याच तीव्रतेनं हसत होता. आसपासच्या रांगांनी त्याच्याकडे कौतुकानं पाहिलं. त्यानंतरही दिलू तेवढ्याच मोठ्यानं हसत राहिला. उचकी थांबू नये तसे त्याचे ते रावणासारखे हसणे थांबतच नव्हते. ‘अबे, चूप कर.’ शेवटी कोणीतरी थिएटरात ओरडलं. चित्रपट संपल्यावर काही प्रेक्षकांनी पुढे येऊन त्याचा चेहरा पाहिला. असा हसणारा प्राणी कसा दिसतो त्यांना पाहायचं होतं.

आज हे हसू हरवलंय, हरपलंय, हिरावलं गेलंय. देवानं नेमका नको तिथं वार केला होता. दिलूच्या हसण्याला देवाचीच दृष्ट लागली होती.
मी मागे त्याला म्हणालो, ‘दिलू, तुझ्या अमेरिकेतल्या मुलाची गर्लफ्रेंड गुजराती आहे ना?’
‘बंगाली – बंगाली.’ तो म्हणाला, ‘गुजराती माझी.’
ही गुजराती गर्लफ्रेंड दिलूचं पाकीट स्वतःच्या घरून पैशांनी भरून आणायची. ते दिलूला द्यायची व दुसरं रिकामं भरायला(!) घेऊन जायची. कुठं असतात अशा, दानशूर गर्लफ्रेंडस्?
‘कुठं असते रे ती आता?’ मी दिलूला विचारले.
‘काय माहीत! कोणाची तरी पाकिटं भरून देत असेल.’ दिलू निर्विकारपणे म्हणाला. मी उगाचच माझं पाकीट चाचपलं.

एकदा दिलूच्या मम्मीनं आंब्याच्या कापट्यांनी भरलेलं ताट आमच्या समोर आणून ठेवलं.
ते क्षणार्धात रिकामं झालं. ते पाहून दिलूची मम्मी म्हणाली, ‘तू एखादी कपटी खाल्लीस की नाही, दिल्या?’
‘एखादी?’ मी ओरडलो, ‘हे अख्खं ताट कोणी खाल्लं असं तुम्हाला वाटतं?’

‘दिल्या, तू खाल्लंस? सगळे राजे खादाड.’ मम्मी चित्कारली.
त्यातला एक राजे पोलीस युनिफॉर्ममध्ये बाहेरच्या खोलीतून डोकावून ऐकत होता.
आमच्या जवानीच्या काळात (माझी जवानी म्हणजे विधवेचं तारुण्य!) मी दिलूसाठी चिठ्ठी ठेवली होती. ती अशी – ‘इफ कम गो, नॉट कम नॉट गो. व्हेन कम गो.’

ती चिठ्ठी दिलूच्या पप्पांच्या हातात पडली. ते चक्रावून गेले.
‘तुला कळतो याचा अर्थ?’ त्यांनी दिलूला विचारले.
‘सोपा आहे.’ दिलू म्हणाला, ‘इफ कम गो म्हणजे मी आलो तर आपण सिनेमाला जाऊ. नॉट कम नॉट गो म्हणजे मी आलो नाही तर तू एकटा जाऊ नकोस आणि व्हेन कम गो म्हणजे मी येईन तेव्हा आपण दोघे मिळून सिनेमाला जाऊ.’

तो निष्णात पोलीस अधिकारी तिथून कपाळ बडवीत गेला.
परवा बऱ्याच दिवसांनी दिलूचा मला फोन आला. मी उचलताच त्यानं माझ्यावर शिव्यांची बरसात केली. मला खूप बरं वाटलं. त्याच्यासाठी व माझ्यासाठीही.

‘अशाच शिव्या देत रहा रे, दिलू.’ मी गहिवरून म्हणालो, ‘जगण्यासाठी मला आनंदाची व आनंदासाठी तुझ्या शिव्यांची नितांत गरज आहे. बोल xxx काय म्हणतोस…?