
>> श्रीनिवास बेलसरे
सुमारे 2022 वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील ज्यू धर्मीय लोक इतर धर्मांप्रमाणे कर्मठ धर्मकल्पना आणि कर्मकांडाच्या प्रभावाखाली जगत होते. ज्यू धर्मातील प्रेषित मोशे याने अनेक नियम आणि कर्मकांडे निश्चित केली. तो जणू यहुदी लोकांचा मनू (Law-giver) होता. त्याच्या लिखाणाला बायबलमध्ये ‘नियमशास्त्र्ा’ म्हणतात.
प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत राहिल्याने काहीसा आक्रमक बनलेल्या समाजाला नियंत्रणात ठेवण्यासाठी मोशेने नियम कडक ठेवले होते. आजही आपण अरबी देशांतील कठोर शिक्षांबद्दल ऐकतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते, पण त्यांचे उगमस्थान मोशेच्या नियमशास्त्र्ाात आहे. कारण ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाममध्ये बराचसा भाग एकसारखा आहे. त्यामुळे मोशेने ‘डोळ्याकरिता डोळा’ आणि ‘दाताकरिता दात’ अशा रोखठोक दंडसंहितेत समाजाला बांधले होते. त्यावेळचा रांगडा समाज पाहता मोशेपुढे पर्यायही नसावा.
या व्यवस्थेचा मूळ उद्देश चांगला असला तरी त्यातून अनेकांचे हितसंबंध निर्माण झाले. एक मंदिर, तेथे रोजचे प्रायश्चित्ताचे विधी, होमहवन, पशुबळी, देवापुढची अर्पणे इत्यादीद्वारे पुरोहित समाजावर हुकमत गाजवू लागले.
त्यावेळी ज्यू धर्मातच जन्मलेला येशू मात्र ईश्वराशी सरळ संबंध जोडणारे तत्त्वज्ञान सांगू लागला. पुरोहितांच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला. येशूच्या शिकवणुकीमुळे देवाच्या दलालांची दुकाने बंद होणार होती. त्याशिवाय गोरगरीब लोक येशूमध्ये एक आदर्श राजा पाहू लागले होते. येशूने राजा होऊन लोकांचे जीवन सुधारावे अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यामुळे धर्मसत्ता आणि राजसत्ता जास्तच चिंतेत पडली. ते सतत येशूला कसे रोखावे हा विचार करत.
येशूकडून मात्र रोज नवनवे चमत्कार घडत होते. त्याने नुसता स्पर्श केला तर कुष्ठरोगी बरे होत (ल्यूक, अध्याय 17), अंधांना दिसू लागे, पक्षाघात झालेली माणसे खाटेवरून उठून तीच खाट घेऊन चालू लागत. काही मृत व्यक्ती कबरेतून जिवंत बाहेर आल्या. यामुळे दुखणाईत आणि पीडित लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याचे गुणगान करत त्याच्यामागे फिरू लागल्या.
येशू या चमत्कारांचे श्रेय स्वतः घेत नसे. आंधळ्यांना दिसू लागल्यावर, कुष्ठरोग्याचे कुष्ठ गेल्यावरही हा अवलिया म्हणायचा, ‘‘तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरे केले आहे.’’ (ल्यूक, 18ः42). त्याचे प्रमुख निवेदन होते, ‘‘आपले आचरण शुद्ध ठेवा, इतरांवर आणि ईश्वरावर स्वतःइतकेच प्रेम करा.’’ तो म्हणायचा, ‘‘ईश्वर न्यायाधीश नाही, प्रेम करणारा तुमचा वत्सल पिता आहे. तुम्हीही त्याच्यासारखे व्हा. सर्वांवर प्रीती करा.’’
हे शास्त्री, पंडितांना असह्य झाले. उपासनेचे, पापाच्या प्रायश्चित्ताचे, मोक्षाचे पेटंट तर त्यांच्याकडे होते. हा माणूस धंदा बिघडवित होता. मग सगळे एकत्र आले. त्यांनी येशूवर अनेक आरोप केले. ‘‘हा मोशेचे धर्मशास्त्र बाद ठरवितो’’, ‘‘उपवासाच्या दिवशी काम करतो.’’ (योहान 9ः16), ‘‘स्वतःला ईश्वराचा पुत्र म्हणवितो’’असे आरोप लावून त्याला रोमन शिपायांकरवी अटक करून घेतली. त्याच्यावर राजसत्तेविरुद्ध बंड केल्याचा आणि स्वतःला देवाचा पुत्र म्हणवून घेतल्याने ईश्वरनिंदा (Blasphemy) केल्याचा आरोप लावला.
मात्र रोमन अधिकारी पिलात याला प्रभूच्या ठायी कोणताही दोष आढळला नाही. त्याने तसे जाहीर केले, पण लोकांनी, ‘‘येशूला निर्दोष ठरवाल तर तुम्ही रोमन सम्राटाचे विरोधी ठराल’’ अशी पिलातलाच धमकी दिली.
तत्कालीन रिवाजाप्रमाणे सणाच्या दिवशी एका कैद्याला सोडता येत असे. पिलातने मग या नियमाचा लाभ देऊन येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यात खून चढलेले लोक म्हणाले, ‘‘बरब्बाला सोडा, येशूला वधस्तंभी सुळी द्या!’’ बरब्बा हा दंगा आणि खून यासंबंधात तुरुंगात पडलेला कैदी होता. लोकांनी सणाचा नियम पाळण्यासाठी त्याला सोडण्याची मागणी केली. पिलात म्हणाला, ‘‘येशू या निर्दोष माणसाच्या हत्येचे पाप माझ्यावर नको, तुम्हीच त्याचे काय ते करा.’’ शेवटी हातापायांत खिळे ठोकून, अनन्वित छळ करून येशूला ठार मारण्यात आले. समाजाचा विवेक सुटला की, तो खुनी माणसालाही माफ करतो आणि सज्जनाचा निर्दयपणे जीव घेतो हे पुन्हा सिद्ध झाले, परंतु आज 2022वर्षांनंतरही ज्यांनी येशूला ठार केले, त्या एकाचेही नाव शिल्लक नाही. येशूच्या नावावर मात्र जगभर लाखो अनाथाश्रम, मोफत दवाखाने गोरगरीबांना दिलासा देत आहेत. प्रभूच्या शिकवणुकीचा खरा विजय हाच म्हणावा लागेल.



























































