
>> शुभांगी बागडे
नोकरी, व्यवसाय करणाऱया आजच्या स्त्रीला आपल्या बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान देता यावं यासाठी कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन पातळीवर सहकार्य मिळण्याची गरज आहे. तरच बाळ सुदृढ राहील. अशा स्तनदा मातांसाठी राज्यात 2008 साली ‘हिरकणी कक्ष’ सुरू करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील ही संकल्पना बी.पी.एन.आय. महाराष्ट्र (ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया) या संस्थेने मांडली आणि त्याला चांगला प्रतिसाद लाभला.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील एक घटना जगभरात कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरली. या संसदेतील एका महिला सदस्येने संसदेतच बाळाला स्तनपान केलं. खरंतर जगभरात या घटनेचं स्वागत झालं. बाळाला स्तनपान करणं ही निसर्गवत आणि स्वागतार्ह क्रियाच; परंतु सार्वजनिक ठिकाणी स्तनपान केल्यास भुवया उंचावल्या जातातच. हिंदुस्थानही याला अपवाद नाही. म्हणूनच ही आश्वासकता रुजवत बदल घडवून आणून आधार व पाठिंबा दिला पाहिजे.
आपल्याला हिरकणीची गोष्ट माहीत आहेच. गडावर दूध घालायला ही गवळण स्तनदा माता होती. बाळाला दूध पाजता यावं याकरिता जिवाची पर्वा न करता ही माता अंधाऱया रात्री बुरूज उतरून खाली आली. या शूर मातेचा शिवाजी महाराजांनी गौरव केला. तिची गोष्ट वाचताना अभिमान वाटतोच तसा बाळाच्या ओढीने घर गाठणाऱया नोकरदार स्त्रीचाही वाटतो. हिरकणी ही नोकरदार स्तनदा महिलेचं प्रतीक मानली जाते. बाळाला तिचं दूध मिळावं याकरिता राज्यात अनेक ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले. यात नोकरदार महिलांबरोबरच प्रवासात स्तनदा मातेला दूध पाजणं सुलभ व्हावं याकरताही विचार करण्यात आला. राज्यातील बस व रेल्वे स्थानकांवरही अशी सोय करण्यात आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी या कक्षाची उपयोगिता नक्कीच जास्त आहे. हा कक्ष सहज ओळखता यावा याकरिता बाहेरील बाजूस तशी चित्रे लावण्यात आली आहेत. तसेच आतील भागात स्तनपानाबाबतची सचित्र माहिती देण्यात येते. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही या कक्षाची स्थापना करण्यात आली असून तिथे स्तनपान कसे करावे, कधी करावे याबाबत माहिती देणारे समुपदशेकही नेमण्यात आले आहेत. हिरकणी कक्षाची ही संकल्पना समाजात रुजली आहेच परंतु तिचा जास्तीत जास्त वापर होणेही तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच हिरकणी कक्षाच्या उपयोजितेद्वारे नोकरदार महिलांना स्तनपानाबाबत जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे गरजेचे आहे.
आईच्या दुधाचं महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो, वाचत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते, हा प्रश्नच आहे. स्तनपानाचं महत्त्व माहीत असून, इच्छा असूनही या नोकरदार माता आपल्या तान्हुल्याला पाजू शकत नाहीत.
नोकरदार आईला प्रसूतीनंतर रजेची नितांत गरज असल्याने बाळाचे संगोपन व प्रसूतीच्या कारणासाठी पगारी रजेचा कालावधी 12 आठवडय़ांकरून (तीन महिने) 26 आठवडय़ांवर (साडेसहा महिने) नेण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला. प्रसूती रजेच्या कालावधीचा हा निर्णय बाळाच्या संगोपनाबरोबरच आईचं स्तनदा म्हणून असलेल्या स्वरूपावर अधिक आधारलेला आहे. मात्र तरीही स्तनपानाचा प्रश्न पूर्णत: सुटत नाही. बाळाच्या वाढीसाठी, योग्य पोषणासाठी बाळ 2 वर्षांचे होईपर्यंत आईचे दूध मिळणे आवश्यक असते. जगातील सर्व वैद्यकीय तज्ञ बाळ 2 वर्षांचे होईपर्यंत त्याला स्तनपान करायलाच हवे, असं मत व्यक्त करतात. खरंतर बाळाच्या दूध पिण्यामुळं आईलाही दूध भरपूर येत राहतं आणि स्तनपान चांगल्या रितीने चालू राहतं. हे केवळ तिच्या सहवासातूनच साध्य होऊ शकतं; परंतु खरी कुचंबणा होते ती नोकरदार स्त्रीची. ही नोकरदार स्त्री एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत असेल वा रस्त्यावर खडी फोडण्याचं काम करत असेल, दोन्हीही मातांची समस्या सारखीच. तिचा पान्हा बाळासाठी आतुरलेला असतो, पण त्याला दूध पाजणं शक्य नसतंच. बाळापासून 8-9 तास दूर राहिलं की दुधाचा ओघ कमी होत जातो (कारण स्तन भरलेले राहिले कि दुधाची निर्मिती कमी होत जाते) आणि बाळ वर्ष-दीड वर्षांचं होईपर्यंत आटत जातं. यासाठीच ‘हिरकणी कक्ष’ ही संकल्पना पुढे आली.
नोकरदार स्त्रिया, त्यांचे विशिष्ट प्रश्न, कुपोषण व बालमृत्यू रोखण्यात मातेच्या दुधाचे असलेले अबाधित स्थान हे सर्व लक्षात घेता नोकरदार स्त्रियांना आपल्या बाळाला दुसऱया वाढदिवसापर्यंत स्तनपान सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त तरतुदींची गरज असते. नोकरदार स्त्रिया गरोदरपणात आणि बाळंतपणाच्या पहिल्या दिवसापासून आपण कामावर गेल्यावर बाळाच्या दुधाचे कसे होणार याची काळजी करीत असतात. काम आणि स्तनपान यांची सांगड घालायची तिची धडपड असते. समाजाचा स्तनपानाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन अशा मातांसाठी जास्त आधार ठरू शकतो. बाळाला आईचं दूध मिळणं हा त्याचा हक्क आहे. कारण त्याचा फायदा बाळाबरोबर आईला, पर्यायाने कुटुंबाला, समाजाला आणि पुढे जाऊन देशाला होतो.
आईने बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन येणे किंवा कार्यालयात पाळणाघर असणे या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. अशा वेळी हिरकणी कक्षाचा आधार मिळू शकतो. हिरकणी कक्ष असेल तर तेथे बसून माता स्टीलच्या स्वच्छ डब्यात दूध साठकून घरी गेल्यावर बाळाला पाजू शकतील. हिरकणी कक्षाची सुविधा सर्वत्र सहज उपलब्ध झाल्यास मातांना त्याचा फायदा होऊ शकतो. हिरकणी कक्ष म्हणजे कार्यालयात काम करणाऱया स्तनदा मातांसाठी दूध काढून साठवण्यासाठी स्वतंत्र खोली. कार्यालयाशी संलग्न वा क़ार्यालयालगत पाळणाघर असल्यास ती कर्मचारी माता हिरकणी कक्षात बसून बाळाला स्तनपान देऊ शकते आणि हे शक्य नसल्यास ही माता कार्यालयातील हिरकणी कक्षात बसून दूध काढून साठवून ठेवू शकते. हे दूध साधारण तापमानाला ते 4 ते 6 तास टिकू शकते व फ्रीजमध्ये (चिलरमध्ये) 24 तास साठवून ठेवता येते. अनेक मातांना याबद्दल माहीत नसते. माहिती असली तरी कार्यालयात अशा प्रकारे दूध काढून साठवून ठेवण्याची सुविधा नसते. जर व्यवस्थापनाने महिला कर्मचाऱ्यांना हिरकणी कक्षाची सुविधा निर्माण करून दिली तर व्यवस्थापनालाही त्याचा फायदा होऊ शकतो. बाळाला योग्य पोषण मिळाल्याने बाळाचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी राहतं आणि पर्यायाने माताही निष्ठेने काम करू शकते.
नवमातांना आवश्यक सुविधा त्या कक्षात निर्माण करून दिल्यास या कक्षाचा फायदा या कार्यालयात काम करणाऱया स्तनदा मातांना आणि त्यांच्या बाळांना होतो. म्हणूनच असा हिरकणी कक्ष प्रत्येक कार्यालयात असावा, असे आवाहन बी.पी.एन.आय.महाराष्ट्र कडून केले जाते. बाळाच्या पोषक वाढीसाठी आईच्या दुधाशिवाय पर्याय नाहीच. म्हणूनच कार्यालयातील स्तनदा मातांसाठी असा कक्ष, अशी जागा उपलब्ध करून देणं ही सध्याची मुख्य आवश्यकता आहे.
कुठल्याही बाळाचं स्तनपान आणि बाळाचं सुरक्षित संगोपन धोक्यात येऊ नये याकरिता उपाय गरजेचे आहेत. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे हिरकणी कक्ष. या उपक्रमाचे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील स्वरूप चांगले असले तरी अनेक ठिकाणी हिरकणी कक्ष ही संकल्पना अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. विशेषतŠ खासगी क्षेत्रात काम करणाऱया महिलांसाठी याबाबत पाऊल उचलले गेले पाहिजे. स्तनदा मातेची ही समस्या दूर करण्यासाठी खासगी क्षेत्रानेही पुढे येणे गरजेचे आहे. याबाबत खासगी काही मार्गदर्शन हवे असल्यास बी.पी.एन.आय. महाराष्ट्र ते तत्परतेने देईल. याबरोबरच शासनानेही यात लक्ष घालून स्तनपानाचे महत्त्व जाणून याबाबत नवीन कायदे करत हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. बालकांचं पोषण आणि संरक्षण ही काही केवळ मातेचीच जबाबदारी नसते, तर ती संपूर्ण समाजाची असते. यामुळेच याचे महत्त्व आणि याची अनिवार्यता समाजाने जाणली पाहिजे. – डॉ. प्रशांत गांगल, बी.पी.एन.आय. – महाराष्ट्र





























































