
>> सुधीर (हेमंत) थोरवे
इमारत सुरक्षेसाठी राष्ट्रीय बिल्डिंग कोड, इमारत रेग्युलेशन ऍक्ट, नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऍक्ट अस्तित्वात आहेत, ज्यामध्ये इमारतींसाठी आवश्यक असलेल्या विविध सुरक्षा प्रणालींची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे, परंतु असे आढळून येते की, बहुतेक सोसायटय़ांमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणेवरील खर्चाला दुय्यम स्थान दिले जाते.
आग आणि त्यामुळे होणारे नुकसान हा देशासाठी चिंतेचा विषय आहे. दैनंदिन वर्तमानपत्रात आगीच्या दुर्घटनेचा संदर्भ नाही हे दुरापास्तच म्हणावे लागेल. यावर्षी हिंदुस्थानात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेच्या लाटेबरोबरच आग लागण्याच्या विविध घटनांचादेखील मोठय़ा प्रमाणात सामना करावा लागला.
मागील पंधरा दिवसांत संपूर्ण देशातील जंगलातील आगीसंदर्भातील 16 हजार 840 घटनांची नोंद झाली. दुर्दैवाने यामध्ये 700 हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्र नष्ट झाले. तसेच प्रभादेवी येथील गॅमन हाऊस, कुर्ला येथील घरातील आग, बदलापूर केमिकल कंपनीतील आग, विरार जीवदानी गडावरील वणवा, पुणे कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट येथील आग, धारावी, परळ येथील एलपीजी सिलिंडरचा स्फोट, पुणे कात्रज येथील अनेक सिलिंडरचा स्फोट अशा अनेक घटनांनी आगींची भीषणता जाणवली.
मागील वर्षभरात देशांमध्ये सोळा लाख आगीच्या प्रकरणांची नोंद झाली, ज्यामध्ये 27027 जणांच्या मृत्यूची नोंद झाली व कोटय़वधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या सर्व घटनांवर दृष्टिक्षेप टाकल्यास अग्नी सुरक्षेसंदर्भात मोठय़ा प्रमाणात जागरुकता निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे हे समजते.
14 एप्रिल हा अग्नी सुरक्षा दिन म्हणून हिंदुस्थानात सर्वत्र कारखान्यांमध्ये आणि अग्निशमन केंद्रांमध्ये पाळला गेला. कामगारांमध्ये आणि सामाजिक क्षेत्रात अग्नी सुरक्षेचे महत्त्व आणि त्याद्वारे लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या दिनाचा मूळ उद्देश आहे. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदर स्फोटकांच्या आगीमुळे हादरले. या भयानक आगीशी सामना करताना अग्निशमन दलातील 66 जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. मुंबई शहराची सुरक्षित शहरांमध्ये गणना होते. असे असले तरी मागील दहा वर्षांत मुंबई, उपनगरे व सभोवताली परिसरात 48,434 आगीच्या घटनांची नोंद झाली, ज्यामध्ये 1568 उंच इमारतींचा समावेश आहे व त्यामध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि हजारो कोटी मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
निवासी विभागातील आग लागण्याचे प्रमाण अनिवासी विभागातील (कारखाने, गोदामे, वाणिज्य विभाग) लागणाऱया आगीपेक्षा जास्त आहे. निवासी विभागातील लागणाऱया आगीचा विचार केला तर बहुतांश आगी शॉर्टसर्किट व किचनमधील गॅस गळतीमुळे झाल्याचे आढळून येते. तसेच जुन्या वायरिंग, घरातील वाढणारा लाइटिंगचा भार शॉर्टसर्किटसाठी कारणीभूत ठरतात. सर्किट ब्रेकर लावलेले आहे, परंतु ते कार्यरत आहे का याबाबतीत अज्ञानच पाहायला मिळते. घरगुती गॅसचा वापर व धोक्यांची कल्पना जवळ जवळ सगळ्यांनाच असते, परंतु बऱयाचशा आगींमध्ये गॅस सुरक्षेच्या बाबतीत दाखवलेला निष्काळजीपणा हेच कारण पुढे आले आहे. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, एखाद्या व्यक्तीच्या या चुकीची झळ इतर कुटुंबीयांनासुद्धा मोठय़ा प्रमाणात सोसावी लागते.
अनिवासी विभागात कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अग्निशमन यंत्रणा लावली जाते, परंतु त्यांच्या देखभालीच्या अभावामुळे आपत्कालीन मध्ये बऱयाचदा ती कार्यरत नसल्याचे आढळून येते.
इमारत सुरक्षेसाठी राष्ट्रीय बिल्डिंग कोड, इमारत रेग्युलेशन ऍक्ट, नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऍक्ट अस्तित्वात आहेत, ज्यामध्ये इमारतींसाठी आवश्यक असलेल्या विविध सुरक्षा प्रणालींची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे, परंतु असे आढळून येते की, बहुतेक सोसायटय़ांमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणेवरील खर्चाला दुय्यम स्थान दिले जाते. बरं, ती यंत्रणा किती प्रमाणात कार्यान्वित आहे किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिचा वापर कसा करायचा याची माहिती बऱयाचदा सोसायटीमधील जनतेला नसते आणि मग आपत्कालीन परिस्थितीमध्ये या उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्रणेचा काहीच उपयोग होत नाही. अशा आगींवर वेळीच नियंत्रण न मिळवल्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्तहानीला सामोरे जावे लागल्याचे नेहमीच पाहण्यात येत आहे.
अग्निशमन व्यवस्थापनाकडून कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचे कडक धोरण तसेच लोकांमधील वाढत असलेली जागरुकता यामुळे मागील काही वर्षांत आगीच्या प्रमाणात सातत्याने घट होत आहे. असे असले तरी सध्याची आकडेवारी नक्कीच सुखद नाही. आगींपासून होणारे नुकसान कमी करायचे झाल्यास सर्वप्रथम आग लागू नये यासाठीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक सोसायटीने तसेच विविध आस्थापनांनी फायर सेफ्टी ऑडिट आणि एनर्जी ऑडिट करून त्यामधील त्रुटी वेळोवेळी दूर करणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इमारतीच्या स्ट्रक्चरनुसार अग्नी सुरक्षा यंत्रणेची पूर्तता, ती कार्यरत राहण्याची खबरदारी व ही यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण संबंधितांना मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून आगीच्या घडणाऱया घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट होऊन होणारी जीवित आणि वित्तहानी नियंत्रणात आणण्यासाठी हातभार लागेल.
























































