चांद्रयान पार्ट टू

173

>> सुजाता बाबर

चांद्रयान-2 ही मोहीम 2019 च्या जुलैमध्ये प्रक्षेपित होईल. व हे यान सप्टेंबर 2019 चंद्रावर जाऊन पोहचणार अशी घोषणा ‘इस्रो’ने नुकतीच केली आहे. याविषयी सगळीकडून भरभरून कौतुक होत आहे. ‘इस्रो’ने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या मोहिमा आणि नवीन विक्रम करून दाखवले आहेत. चांद्रयान-2 ही एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून पाहिली जात आहे. चांद्रयान- 1 मध्ये आपण अनेक देशांच्या मदतीने उपकरणे वापरून ही मोहीम पाठविण्यात आली होती, मात्र चांद्रयान 2 या मोहिमेमध्ये केवळ हिंदुस्थानी उपकरणे असणार आहेत.

चांद्रयान-2 या वर्षी जुलै महिन्यात अवकाशात झेप घेईल. चंद्रावर पोहोचणारी ही आपली दुसरी मोहीम आहे. चंद्र ही आपल्याला सर्वात जवळची अवकाशीय वस्तू आहे. चंद्राची भ्रमणकक्षा गोल नसून किंचित लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे चंद्र आपल्याला जेव्हा सर्वात जवळ असतो तेव्हा त्याचे अंतर 3 लाख 63 हजार 104 किलोमीटर इतके असते तर जेव्हा तो सर्वात दूर असतो तेव्हा हे अंतर 4 लाख 6 हजार 696 किलोमीटर इतके असते. चांद्रयान – 2 च्या प्रक्षेपणाच्या तारखा 9 ते 16 जुलैदरम्यान आखल्या आहेत. अवघ्या दोन महिन्यांत हे यान चंद्रावर उतरेल. या यानाचे लँडिंग अत्यंत सौम्य असेल याची काळजी घेतली जाणार असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या 70 डिग्री अंशावर हे यान उतरेल. या भागात असलेल्या मांझिनस सी आणि सिम्पेलियस एन या विवरांच्या मध्ये असलेल्या सपाट पृष्ठभागावर यान उतरणार आहे. ‘इस्रो’च्या म्हणण्यानुसार यात नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन प्रयोग करण्यात येतील. यानामधील रोव्हर चंद्राच्या सपाट पृष्ठभागावर फिरून तिथेच त्याचे रासायनिक विश्लेषण करेल. ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या दक्षिण धुवावर उतरणारी ही पहिली मोहीम ठरेल. तसेच अमेरिका, रशिया व चीननंतर चंद्रावर उतरणारे आपले चौथे राष्ट्र असेल.

‘इस्रो’ने या मोहिमेचे आयोजन जरी वेळेनुसार केलेले असले तरी यासाठी आपल्याला रशियाकडून वेळेवर मदत न मिळाल्याने ही मोहीम पुढे ढकलावी लागली होती. रोसकॉस्मोसतर्फे फोबॉस-ग्रंट या मंगळ मोहिमेमध्ये अपयश आल्याने आपणही रशियाकडून मदत न घेता चांद्रयान-2 मोहिमेसाठी लागणारी सर्व उपकरणे आपणच बनवायची असे ठरवले. यामुळे आपला आत्मविश्वासही वाढला आहे आणि यामुळे ही योजना आपल्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरली. अर्थातच या सगळय़ा प्रकारामुळे मोहीम बऱयाचदा पुढे ढकलावी लागली होती, परंतु आता मात्र खात्रीपूर्वकरीत्या हे यान जुलैमध्ये प्रक्षेपित होईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून सुमारे 3 हजार 877 किलो वजनाचे हे यान अवकाशामध्ये झेप घेईल. यासाठी भू-समकालिक (जियोसिंक्रोनस) उपग्रह प्रक्षेपण वाहन मार्क II च्या सहाय्याने हे उड्डाण होईल. यासाठी सुमारे 800 कोटी निधी राखून ठेवण्यात आला आहे.

हा ऑर्बिटर चंद्राच्या पृष्ठभागाच्या 100 किलोमीटर उंचीच्या अंतरावर भ्रमण करेल. यामध्ये पाच उपकरणे नेण्यात येतील. यातील तीन उपकरणे नवीन बनवली असून दोन उपकरणे चांद्रयान 1 मधील सुधारित उपकरणे आहेत. या मोहिमेच्या लँडरला प्रसिद्ध शास्त्र्ाज्ञ व ‘इस्रो’चे पितामह विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ ‘विक्रम’ असे नाव दिले आहे.

मिशनच्या रोव्हरला ‘प्रग्यान/प्रज्ञान’ असे नाव दिले आहे. हा साधारण 27 किलो वजनाचा असून संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. याला एकूण सहा चाके असून चांद्रपृष्ठभागावर फिरणार आहे. याच्या रचनेसाठी रशिया मदत करणार होता, परंतु आता कानपूर आयआयटी मदत करीत आहे.

‘इस्रो’ने यामध्ये जे पेलोड निवडले आहेत त्यात ऑर्बिटरसाठी पाच वैज्ञानिक उपकरण, लँडरसाठी चार आणि रोव्हरसाठी दोन अशी निवड केलेली आहे. याव्यतिरिक्त केवळ एकच पेलोड अमेरिकन आहे.

ऑर्बिटर पेलोडमधील पाच उपकरणे पाच वेगवेगळी कामे करतील.

1) चंद्राच्या पृष्ठभागावरील मुख्य घटकांचे मॅपिंग करणे.

2) चंद्राच्या पृष्ठभागावरील काही दशके मीटर्स अंतरावर पाणी, बर्फ आणि विविध घटकांची तपासणी करणे.

3) खनिजे, जल अणू आणि हायड्रॉक्सिलच्या अभ्यासासाठी विस्तृत तरंगलांबी श्रेणीमधील चंद्राच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करणे. 4) चंद्राच्या एक्सोस्फीअरचा विस्तृत अभ्यास करणे.

5) चंद्र खनिजशास्त्र्ा आणि भूगर्भशास्त्र्ा अभ्यास करण्यासाठी आवश्यक त्रिमितीय नकाशा तयार करणे.

विक्रम लँडर पेलोडची कामे अशी आहेत.
1) लँडिंग साइटजवळील चंद्र-भूकंपांचा अभ्यास करणे.

2) चंद्राच्या पृष्ठभागाच्या औष्णिक गुणधर्मांचा अंदाज करणे.

3) चंद्राच्या पृष्ठभाग प्लाझमाची घनता आणि फरक मोजणे.

4) एकूण इलेक्ट्रॉन सामग्री मोजणे.

5) पृथ्वी-चंद्र यातील अचूक अंतर मोजणे.

‘प्रज्ञान’ रोव्हर पेलोडमध्ये लेझर प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप आणि अल्फा कणिक प्रेरित एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप अशी दोन उपकरणे आहेत.

चांद्रयान-2 चंद्रावर उतरवणे हे इतके सोपे असणार नाही. कारण इस्रायलने आपले बेरेशीट लँडर चंद्रावरील लाव्हाने बनलेल्या सपाट पृष्ठभागावर उतरविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो संपूर्ण अयशस्वी ठरला. हा पृष्ठभाग असा आहे जेथे सूर्याचा प्रकाश सर्वाधिक प्रमाणात पोहोचतो, परंतु चांद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल आणि चीनशिवाय इतर कोणत्याही देशाने असा प्रयत्न केलेला नाही.

चीनने जानेवारीत आपल्या चँग 4 या यानाला चंद्राच्या कधीही न दिसणाऱया बाजूवर उतरवून एक नवा विक्रम केला होता. चांद्रयान-2 च्या यशस्वी लँडिंगने असाच नवा विक्रम निश्चित होईल ही आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची बाब असेल. यामुळे आपल्याला मंगळ मोहिमा आणि मानवी अंतराळ मोहिमा प्रत्यक्षात आणण्यामध्ये नक्कीच प्रेरणा मिळेल.

सौम्य आणि आरामशीर लँडिंग
चांद्रयान-1 मोहिमेमध्ये मून इम्पॅक्ट प्रोब लँडिंग आरामशीर नव्हते, त्यात अनेक धक्के बसले होते. मात्र चांद्रयान-2 मोहिमेमध्ये ही काळजी घेण्यात आली असून हे लँडिंग सौम्य व आरामशीर असेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. किमान 15 दिवस विविध शास्त्रीय प्रयोग करण्यात येतील. यामध्ये चंद्राचे फोटो घेणे तर आहेच, शिवाय चांद्रपृष्ठभागावरील भूकंपांचादेखील अभ्यास होणार आहे. काही संबंधित तंत्रज्ञानांमध्ये उच्च रिझोल्युशन कॅमेरा, नेव्हिगेशन कॅमेरा, धोका टाळण्यासाठी सजग कॅमेरा, 800 ऱ थ्रोटेलेबल द्रव इंजिन, ऍटिटय़ूड थ्रस्टर्स, अल्टिमीटर, व्हेलोसिटी मीटर, एक्सेलेरोमीटर आणि या घटकांना चालविण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या