निसर्गाचा हरितदूत

227

>> सुवर्णा क्षेमकल्याणी

निसर्गाचे संवर्धन व्हावे म्हणून बरेच जण प्रयत्नशील असतात, पण काही संस्था असे काही उपक्रम राबवतात की ते सगळय़ांसाठी आदर्श ठरतात. अशीच एक संस्था म्हणजे स्थानिक वृक्ष लागवड करणारी ‘ग्रीन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’ आणि ज्याला ही कल्पना सुचली तो संस्थेचा हरितदूत विक्रम यंदे यांच्या कामाचा परिचय.

मुं बईसारख्या शहरी भागात निसर्ग संवर्धनासाठी उपक्रम राबवणं सोपं नाही. जागेचा अभाव, अपुरी जागरूकता आणि इतर अनेक अडचणींचा सामना करत विक्रम यंदे त्यांच्या ‘ग्रीन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून निसर्गातील हिरवाई राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठाण्यात बालपण घालवलेल्या विक्रम यांना लहानपणात काही काळ का होईना इथल्या वाडा संस्कृतीचा अनुभव घेता आला. हळूहळू शहरीकरणाला सुरुवात झाली असली तरी वड, पिंपळ, आमराईचं अस्तित्व टिकून होतं. कालांतराने या वाडय़ांची जागा इमारतींनी घेतली आणि हिरवाईचा अंश हळूहळू कमी होऊ लागला. हे बदलणारं चित्र मनावर घाव घालणारं होतंच, पण काहीतरी करायला हवं या विचाराने विक्रम यंदे झपाटले गेले.

त्याच दरम्यान ते एका संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करत होते. या कामानिमित्त झाडांची प्राथमिक ओळख होत होती. स्थानिक झाडांचं महत्त्वही कळत होतं. शाळकरी वयाचा हा टप्पा पुढे गेल्यानंतर विक्रम यांनी काही मित्रांना सोबत घेऊन बिल्डिंगच्या भिंतीवर लागलेली वड, पिंपळाची रोपं काढून ती योग्य ठिकाणी लावायची असा उपक्रम सुरू केला. अशा उपक्रमांना एकच व्यासपीठ देता येईल का, या विचाराने त्यांची ‘ग्रीन अम्ब्रेला’ ही संस्था आकारास आली. अनेक सूक्ष्मजीवांना सामावून घेणारं वडाचं झाड. हा डेरेदार वृक्ष म्हणजे पृथ्वीला सावरणारी, आधार देणारी जणू एक छत्रीच आहे ही कल्पना समोर ठेवत त्या नावाने संस्था सुरू करण्यात आल्याचं विक्रम सांगतात.

ग्रीन अम्ब्रेला संस्था स्थानिक दुर्मिळ वृक्ष लागवडीचं महत्त्वाचं काम करते. इमारती व अन्य जागेवरून काढलेली रोपं तयार करून ती योग्य ठिकाणी लावेपर्यंत कुठे ठेवायची हा मोठा यक्षप्रश्न असायचा. अभ्यास करून कालांतराने भिंतीवरची काढलेली रोपं नीट रुजेपर्यंत त्यांचं संगोपन करणं. तसंच तंत्रशुद्ध पद्धतीने काढून त्यांचं पुनर्रोपण करण्याचं कसब विक्रम यांना अगदी योग्य पद्धतीने कळलं आहे. 2010 पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणचे अनेक जण या कार्यात जोडले गेले आहेत.

वड, पिंपळ, उंबर हे फायकस कुळातील वृक्ष सर्वात जास्त प्राणवायू हवेत सोडतात. तसेच मोठय़ा प्रमाणात कार्बन शोषून घेतात. त्यामुळे या वृक्षांची लागवड करण्यावर भर असतो, असं विक्रम सांगतात. एखादं रोप लावलं म्हणजे काम भागत नाही. त्याची योग्य तितकी वाढ होईपर्यंत त्याला जपावं लागतं. रोप लावलेल्या जागेत ते योग्य पद्धतीने रुजलं की त्याला पाणी घालणं, योग्य पद्धतीने वाढ होतेय का हे सुद्धा तपासावं लागतं. शिवाय रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडाच्या फांद्यांची योग्य रीतीने छाटणी करावी लागते जेणेकरून अपघात टाळले जावेत. हे काम त्या झाडावर असलेली पक्ष्यांची घरटी पाहूनही करावं लागतं. माणसासोबत बाकी जीवसृष्टीचाही इथे विचार केला जातो.

जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी असे वृक्ष लावणं आवश्यक असून पूर्ण वाढलेला पिंपळ वर्षाला 18 टन प्राणवायू देतो तर 21 टन कार्बन शोषून घेतो. एका वटवृक्षावर 5 लाख सूक्ष्मजीव, किटक असतात त्यामुळे असे वृक्ष तापमान वाढ रोखण्याबरोबच जैवविविधतेसाठीही मोलाची भूमिका बजावतात. मुंबईसारख्या महानगरात लाखो गाडय़ांचे प्रदूषण कमी करण्यासाठी अशा झाडांची गरज असल्याचे विक्रम सांगतात आणि म्हणूनच मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड ते घाटकोपर या पट्टय़ात विक्रमने त्याच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात 2500 हून अधिक पिंपळ महामार्गाच्या दुतर्फा लावून त्यांचे संवर्धन केले आहे. महामार्गालगत फूटपाथवर खड्डे तया करणं, रोपं लावणं, त्यांना पाणी घालणं, त्यांची वेळोवेळी छाटणी करणं अशी सर्व प्रकारची कामं वर्षभर दर रविवारी विक्रम आणि त्यांचे सहकारी करत असतात. संस्थेकडून झाड 3-4 वर्षांचे होईपर्यंत अशी काळजी घेतली जाते त्यामुळेच लावलेल्या रोपांपैकी 95 टक्के रोपं जगतात.
वड, पिंपळ याव्यतिरिक्त अनेक स्थानिक झाडं लावण्यावर विक्रमचा भर असतो. ज्यात काटेसावर, कौशी, किन्हई, मोई, तीवर, नेवरी, रतनगुंज, फालसा, धामण, शिकेकाई, धावडा, बहावा, अंबाडा, तांबट, देवसावर, चांदा, वारंग, बेल, पाडळ, बिब्बा, शिसम, करवत अशा जवळपास 100 हून अधिक महत्त्वाच्या झाडांचा यात समावेश होतो.

स्थानिक वनस्पतींचं महत्त्व आता लोकांना समजू लागलं आहे. पण त्यांची रोपं सहज मिळत नाहीत. याकरिता विक्रम यांनी वसई येथे देशी, स्थानिक वृक्ष व वनस्पतींची नर्सरी सुरू केली असून तिथे 120 हून अधिक प्रकारची 10000-15000 रोपं दरवर्षी तयार करून लोकांना व संस्थांना देण्यात येतात. अनेक शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी वसई येथील नर्सरीत निसर्गाच्या सान्निध्यात रोपं तयार करण्यास येतात. तसेच फेब्रुवारी ते मे महिन्यात ग्रीन अंब्रेला संस्थेमार्फत मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या जंगलांमध्ये बीजसंकलन मोहीम आखली जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर, कर्नाळा, तुंगारेश्वर, राणी बाग अशा विविध ठिकाणी जाऊन बीजसंकलन केले जाते. यात बीजसंकलनाबरोबरच जंगलातील स्थानिक वृक्ष, वेली, वनस्पती यांची ओळख तज्ञांकडून करून दिली जाते. हे सगळं करत असताना आपल्याकडून कमीत कमी प्रदूषण व्हावं या दृष्टीने स्वत:च्या सवयी सुद्धा बदलल्यात असं विक्रम सांगतात, जवळच्या प्रवासासाठी सायकलचा वापर करणं, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन अशा यंत्रांचा वापर टाळणं ही जीवनशैली त्यांनी निवडली आहे.

ग्रीन अम्ब्रेला संस्थेत विक्रम सोबत अनेक जण सध्या कार्यरत आहेत जे पावसाळ्यात किंबहुना वर्षभर वेगवेगळ्या कारणांसाठी एकत्र येऊन काम करतात. बीज संकलन उपक्रम, वैविध्यपूर्ण नर्सरी याकडे लोकांचा ओढा वाढत आहे. संस्थेद्वारे शाळेच्या आवारात भाजीपाला आणि काही औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. गरजेनुसार रस्त्याच्या दुतर्फा जास्तीत जास्त कार्बन शोषून घेणारी आणि जास्त प्राणवायू उत्सर्जित करणारी झाडं लावणं ही आजची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या