
>> स्वरा सावंत
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर सणावारांतला मरगळलेला जोश पुन्हा तरोताजा झाला. सणांवरील बंदी उठली आणि आपले बाळगोपाळ तयारीला लागले. थरार आणि जल्लोषाचा धुमधडाका घेऊन मच गया शोर सारी नगरी रे असे म्हणत आज राज्यात गोविंदा हंडी फोडण्यासाठी सज्ज झालाय. साहस, थरार, उत्कंठा आणि जोशपूर्ण वातावरणात पावसाच्या सरींसोबत माखनचोरांचा हा उत्साह मुंबई, ठाणे, पुण्यासह समस्त महाराष्ट्रात संचारणार आहे.
आला रे आला… गोविंदा आला… जरा मटकी संभाल बृजबाला, गोविंदा गोपाळा, चांदी की डाल पर सोने का मोर… अशा माहोलने आज गोविंदा पथक आपापल्या विभागातील मानाची हंडी फोडून ग्रामदेवतेला नमस्कार करत खांद्याला खांदा लावत एकजुटीचे दर्शन घडवणार आहेत. थरांचा थरथराट, कायम असला तरी प्रत्येक गोविंदा कसा सुरक्षित राहील याची काळजी सगळ्याच मंडळांचे सदस्य घेत आहेत.
कोरोनाची दोन वर्ष, त्यानंतर विकारस्वरूपात त्याचे उमटलेले पडसाद, या दरम्यान प्रशासनाने दाखवलेले दायित्व याला मिळालेली माणूसकीची जोड या सगळ्याचा आता कस लागणार आहे. महिनाभर सुरू असलेल्या सराव शिबीरात स्पर्धेत उतरताना बाळगोपाळांना वॉर्मअप करूनच सरावात उतरवले जात असल्याचे ठाण्याचे कोच तुषार मोहन यांनी सांगितले. दहीहंडी सणाच्या निमित्ताने बाळगोपाळांमध्ये चुरस दिसतेय. नविन जनरेशन स्वतŠहून सहभागी होतेय. एक पिढी बदलताना नविन मुलांना ट्रेन करणं जेणेकरून सणावाराचा हा वारसा अविरत पुढे चालत राहणार आहे. मुंबई, ठाण्यात सात, आठ, नऊ असे विक्रमी थर रचणाऱया मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दहीहंडीचा इव्हेंट करणाऱया आयोजकांनी यामुळे बाळगोपाळांच्या सुरक्षेचा विडा उचलला आहे. काही ठिकाणी बाळगोपाळांचा विमा, आरोग्य सेवा, ऍम्ब्यूलन्स, प्राथमिक उपचार, खानपान सेवा, उत्सवाच्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
आमच्या मंडळाचे यंदाचे 67 वे वर्ष. खोपट गावाच्या गावदेवीच्या साक्षीने येथील जुन्या ग्रामस्थांनी हा वारसा पुढे आमच्याकडे दिला. चार-पाच थरांपासून सुरू झालेला खोपटचा राजाचा प्रवास नऊ थरांकडे पोहोचला आहे. आमच्या बाळगोपाळांची पूर्ण काळजी घेत यंदाही लॉकडाऊनची मरगळ झटकत आम्ही कडकडीत नऊ थर लावणार यात शंका नाही…
अमित पेंढारे, अध्यक्ष खोपट सार्वजनिक गोकुळाष्टमी मंडळ, ठाणे.



























































