
>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक
वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.
प्रश्न – आयकर वाचवण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी? – महेंद्र नाईक, डोंबिवली
उत्तर – आयकर वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला आयकर मोजण्याची जुनी पद्धत निवडावी लागेल. यात विविध पर्याय असे
– आयकर कलम 80 सीची सवलत मिळणाऱया अनेक योजना व खर्च आहेत. पीएफ वर्गणी, वीपीएफ, पीपीएफमधील जमा केलेली रक्कम, एनएससी, एनएससी व्याज, पाच वर्षे मुदतीच्या करबचत मुदत ठेवी, वरिष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, विमा हप्ते, राहत्या घराचे गृहकर्ज मुद्दल, रजिस्ट्रेशन खर्च, दोन मुलांचा शैक्षणिक खर्च, समभाग संलग्न योजना यांमध्ये जमा/खर्च केलेली रक्कम यांचा समावेश होतो.
– 80 सीसीसीमध्ये विमा कंपन्या व म्युच्युअल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.
– 80 सीसीसीडीमध्ये केंद्रीय कर्मचाऱयाच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समावेश होतो. यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली तरी एकूण सूट दीड लाख एवढीच मिळते.
– 80 सीसीडी (1 बी) नुसार एनपीएसमध्ये जमा केलेल्या रुपये 50 हजार रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते. अशा प्रकारे एकूण जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते.
– 80 डीनुसार स्वतःच्या, जोडीदाराच्या आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर रुपये 25 हजार, तर पालकांच्या आरोग्य विम्यासाठी जास्तीत जास्त रुपये 50 हजार रकमेवर वजावट मिळेल.
– 80 डीडीनुसार अवलंबित अपंग जोडीदार, मूल, पालक, भाऊ, बहीण यांचे वैद्यकीय उपचार, कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार रुपये 75 हजार ते रुपये एक लाख 25 हजारपर्यंत आहे असे गृहीत धरून सूट घेता येते. यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही.
– 80 डीडीबी या कलमानुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी, मूल, अवलंबित भाऊ, बहीण, आई, वडील यांच्यावर काही विशिष्ट आजारावर केलेल्या खर्चाबद्दल वयानुसार रुपये 40 हजार ते एक लाख रुपयांची सूट घेता येते.
– 80 डीयू या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातूनर रुपये 75 हजार ते एक लाख 25 हजारांची सूट मिळू शकते.
– 80 ईनुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी अथवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कर्ज.
– कलम 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर 30 हजार रुपयांची सूट मिळते.
– 80 जीनुसार मान्यताप्राप्त संस्था, न्यास यांना दिलेल्या एकूण उत्पन्नाच्या 10 टक्के मर्यादेत 50 ते 100 टक्के सूट मिळते.
– 80 जीजीसीनुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत 50 टक्केपर्यंत सूट मिळते.
– 80 जीजीमध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा काही रक्कम घरभाडय़ाची वजावट मिळू शकते.
– 80 टीटीए या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले 10 हजार रुपयावरील व्याज करमुक्त.
– 80 टीटीबीनुसार वरिष्ठ व अतिवरिष्ठ नागरिकांस रुपये 50 हजारांपर्यंत बचत खाते आणि मुदत ठेव यावरील व्याज करमुक्त आहे. त्यांना 80 टीटीएची सवलत मिळत नाही.




























































