वटवट्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

तेजस्वी पंख आणि अखंड बडबड हे या चिमुकल्या पक्ष्याचे वैशिष्टय़.

वटवटय़ा पक्षी अतिशय चंचल प्रवृत्तीचे असून आकाराने छोटे व सुबक असतात. त्यांचे पंख तेजस्वी असतात. ते उत्साही व सतत कार्यरत असतात. हे पक्षी दिसण्याआधी त्यांचा आवाज ऐकू येतो. त्यांना योग्यरीत्या ओळखणे अवघड असते, कारण बरेच वेळा त्यांची फक्त झलकच पाहायला मिळू शकते.

हे पक्षी काटक असून त्यांचा बांधा व चोच मजबूत असते. त्यांची लांबी 11 ते 17 सें.मी.पर्यंत असून वजन 7 ते 36 ग्रॅम्सपर्यंत असते. सर्वसाधारण त्यांचा रंग राखाडी, तपकिरी असून खालील बाजूस गडद होत जातो. बऱयाचशा प्रजातींमध्ये निळा किंवा गुलाबी रंगांची छटा असते. पंख नारिंगी तपकिरी किंवा तांबूस तपकिरी रंगांचे असतात. शेपटी चौकोनी असून टोके गोलाकार असतात. बहुतेक नरांच्या डोक्यावर काळा किंवा राखाडी रंग असतो. नर व मादीसारखे नसून त्यांचा पिसारा, रंग वेगवेगळा असतो. मादींमध्ये तपकिरी, तपकिरी-राखाडी किंवा धूसर रंग असतो. थंड प्रदेशात प्रजनन करणाऱया प्रजाती स्थलांतरित तर उष्ण प्रदेशातील स्थानिक असतात. झाडाझुडुपांमध्ये, कुंपणांमध्ये यांचे वास्तव्य असते. यांचा आहार मुख्यतः किडे कीटक असून काही प्रजाती फळे, छोटय़ा बेरीज पण खातात.

राखाडी टोपीचा वटवटय़ा
राखाडी टोपीचा वटवटय़ा पक्षी राखाडी व पिवळ्या रंगांचे असतात. डोळ्याभोवती दोन पांढऱया पट्टय़ा असून चोचसुद्धा राखाडी व पिवळ्या रंगांची असते. हे पक्षी खूप चंचल असले तरीसुद्धा पोटाच्या तेजस्वी पिवळ्या रंगामुळे झाडाझुडपात पटकन ओळखू येतात. त्यांचे गाणे अतिशय गोड असते. प्रजननाचा काळ पावसाळ्याआधी मार्च-जूनपर्यंत असतो. नर व मादी दोघेही मिळून गोलाकृती घुमटाच्या आकाराचे घरटे बांधतात. मात्र मादी जास्त मेहनत घेते. मादी 2-5 मोतिया रंगाची अंडी देते. 12 दिवस उबवल्यानंतर पिले बाहेर येतात. हे पक्षी स्थानिक असले तरी प्रजननानंतर बरेच वेळा कमी उंचीच्या प्रदेशात स्थलांतर करतात.

मुकूटधारी वटवटय़ा
मुकूटधारी वटवटय़ा राखाडी-शेवाळी रंगाचे असून भुवई लांब फिक्कट पिवळ्या रंगाची असते. डोक्यावर पिवळा राखाडी पट्टा असून पंखांमध्ये पांढरे पट्टे असतात. बरेच वेळा हे पक्षी छोटय़ा समूहात राहतात. काही वेळा इतर पक्ष्यांबरोबर असतात. या पक्ष्यांचे प्रजनन मध्य आशियात होते. प्रजननाचा काळ मे-जुलै असतो. मादी शेवाळे, कोरडे गवत आणि जनावरांचे केस वापरून भिंतीच्या भोकात किंवा जमिनीवर भोकात किंवा झाडावर झावळीमध्ये घरटे बनविते. मादी 4 अंडी देते. हे पक्षी स्थानिक असले तरी थंडीमध्ये ते पश्चिम घाटातील जंगलात स्थलांतर करतात.

पायमोज वटवटय़ा
पायमोज वटवटय़ा पक्षी वरील बाजूस फिक्कट तपकिरी असून खालील बाजूस पांढऱया रंगाचे असतात व त्यावर फिक्कट पिवळ्या रंगाची किनार असते. भुवई फिक्कट व छोटी असून चोच बाकदार व मजबूत असते. या पक्ष्यांची साद व शीळ ठरावीक स्वरांची नसून घोगरी असते. या पक्ष्यांचे प्रजनन पश्चिम-मध्य रशिया, पश्चिम चायनामध्ये होते. हिवाळ्यात मात्र हिंदुस्थानी उपमहाद्वीप ते श्रीलंकापर्यंत स्थलांतर करतात. त्यांचा प्रजननाचा काळ मे ते जुलै असून वर्षभरात मादी एकदाच अंडी देते. त्यांचे घरटे झाडावर किंवा वनस्पतीमध्ये किंवा जवळच जमिनीवर ‘झाडांची मुळे, फुलांचे देठ , मऊ काटक्या’ वापरून बांधलेले असते. मादी 3-4 अंडी घालते.

हिरवट पर्णी वटवटय़ा
हिरवट पर्णी वटवटय़ा पक्षी शेवाळी-हिरव्या रंगाचे असून त्यांची भुवई लांब असते व ती चोचीपर्यंत जाऊन पुढे मानेपर्यंत गेलेली असते. हे पक्षी वर्षभर अतिशय कर्कश्य आवाजात शीळ घालतात व सतत साद देऊन कासावीस होऊन पंख उडवीत असतात. हे पक्षी ‘युरोप समशीतोष्ण ते उपोष्णकटिबंधीय महाद्वीपीय आशियात’ असतात. हिवाळ्यात ते हिंदुस्थानात स्थलांतर करतात. त्यांचे प्रजनन 4500 मीटर उंचीपर्यंत सखल प्रदेशात व पर्वतमय भागात मिश्र शंकूच्या आकाराचे वृक्ष येथे होते. मे ते ऑगस्ट त्यांचा प्रजननाचा काळ असून वर्षभरात एकदाच अंडी देतात. नर आजूबाजूच्या प्रदेशाचे व घरटय़ाचे रक्षण करतो. या सर्व पक्ष्यांचे फोटो मी गणेशगुडी, सत्ताल, कच्छ इत्यादी ठिकाणाहून काढले आहेत.

– [email protected]