लेख – पार्थिव गणेशाचे महत्त्व

>> विलास पंढरी

आपले सण, उत्सव, विविध व्रते निसर्गाशी निगडित आहेत. हे उत्सव आणि व्रते परंपरागत अनादी काळापासून चालत आलेली आहेत. शास्त्रांचे मर्म आणि परंपरा जाणून उत्सव साजरे केले तर धर्माचीही बूज राखली जाईल. या अनुषंगाने आपण पार्थिव पूजेबद्दल माहिती घेऊ. मूर्तिपूजा सनातन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. चित्र अथवा मूर्ती ही मनातल्या देवतेशी संपर्क साधायची सोपी पद्धत आहे. मूर्ती घडवण्यासाठी निसर्गात सहज उपलब्ध असणारा कच्चा माल म्हणजे माती. ती मुबलक आणि जवळपास विनामूल्य उपलब्ध असून हाताने मूर्ती बनवता येते. पूजा झाल्यावर तिचे विसर्जनही सोपे असते. प्राचीन संस्कृतीमध्ये अनेक देवतांच्या मातीच्या मूर्ती आढळतात. शास्त्रात अशा पूजेला ‘पार्थिव पूजा’ म्हणतात. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेले. ‘धर्मसिंधू’ या ग्रंथात देवतांच्या मूर्ती घडविण्याच्या विविध द्रव्यांची यादी दिलेली आहे. रत्नमय मूर्ती, धातूची मूर्ती, पाषाणमूर्ती, लाकडाची म्हणजे काष्ठमूर्ती आणि मातीची अर्थात पार्थिव मूर्ती हे काही मूर्तिप्रकार आहेत. याच ग्रंथात असेही म्हटले आहे की, कलियुगात सोने, चांदी इत्यादींपेक्षाही पार्थिव मूर्ती श्रेष्ठ आहे. किती दूरदृष्टीचा विचार आहे हा! सध्याचं प्रदूषण बघता कदाचित शास्त्रकारांनी हा सोपा मार्ग सुचविला असावा. महत्त्वाचे म्हणजे सहज उपलब्ध होणाऱया वस्तूंच्या सहाय्याने हवी ती मूर्ती बनवून पुन्हा निसर्गातच विलीन करायची हे पर्यावरणस्नेही सूत्र पार्थिव पूजेत आहे.

अंगुष्ठपर्वादारभ्य विवस्तिं यावदेवतु।।
गृहेषु प्रतिमा कार्या नाधिका शास्याते बुधै।।

अंगठय़ाच्या पेरापासून ते एक वीत म्हणजे आठ-नऊ इंच ऊंचीची घरातील देवाची मूर्ती असावी असा या श्लोकाचा अर्थ आहे. शिवपुराणातही गणेश चतुर्थीला गणेशाची पार्थिव मूर्ती तयार करून तिची पूजा करण्याचे सांगितले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेशमूर्तीचे पूजन करण्याची महाराष्ट्रात अनेक लोकांकडे जुनी परंपरा आहे. खरे तर गणेश चतुर्थी हे पार्थिव गणेश पूजेचेच व्रत आहे. त्यामुळे ती मूर्ती मातीची असणे आवश्यक आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत गेल्यावर गणपती बनविण्याचे कारखाने तयार झाले. शाडूच्या वाढत्या किमती, मूर्तीचे जास्त वजन आणि मूर्ती सुकायला लागणारा वेळ यामुळे शाडूची जागा प्लॅस्टर ऑफ पॅरिसने घेतली. खरे तर आपले सण पर्यावरणपूरकच आहेत. पण पार्थिव गणपती हल्ली फारसे कुणी बसवत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे.