हरिब्रह्मअंजदुर्ग सफरनामा

बऱ्याच दिवसांपासून गड भटकंतीची ओढ लागली होती. आपल्याला हरिहर, अंजनेरी, ब्रह्मदुर्ग, दुर्गभंडार हा ट्रेक करायचा आहे. उत्सुकता होती ती ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडारची. ट्रेक कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार याची शिखर ऍडव्हेंचर क्रिएटर ग्रुपला खात्री होती.

 दोन दिवसांच्या ट्रेकला आम्ही निघालो. रात्री 11.30 वाजता बस अंधेरी येथून सुटली. पहाटे 5.30 पर्यंत सर्वांना हरिहरला कूच करायचे होते. सर्वांची ओळख परेड झाल्यावर बॅटरीच्या प्रकाशात 6 वाजता ट्रेकला सुरुवात झाली. गडावर जाताना दोन पठार लागतात. पहिल्या पठारावर डावीकडे गणेश मंदिर आणि एक पुष्करणी आहे.  दुसऱया पठारावर आल्यावर समोर हरिहरचे पूर्ण दर्शन झाले. हरिहरच्या 70 ते 80 च्या कोनात असलेल्या उभट पायऱया मनातील धडधड वाढवीत होत्या. हरिहरची उभी भिंत पार केल्यावर पहिले प्रवेशद्वार लागले. तिथून कातळ खणून मार्ग तयार केलेला होता. परत दगडी पायऱया चढून गेल्यावर तिथे डाव्या बाजूला एक चोरवाट होती. समोरच्या बालेकिल्ल्यावर भगवा डौलाने फडकत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारांनी परिसर दुमदुमून गेला.

 अंजनेरीकडे कूच

गडफेरी आटोपल्यानंतर गड उतरायला सुरुवात केली. दुपारी  अंजनेरीला पोहोचलो. तिथून फॉरेस्ट चौकीला पोचलो. तिथून अंजनेरीला जायला पायऱया होत्या. पुढे डोंगराची एक खिंड लागते. खिंड पार केल्यावर अंजनेरीचे सपाट पठार चालू झाले. दूरवर अंजनी मातेचे मंदिर दिसत होते.  बालेकिल्ल्यावर चढताना डाव्या बाजूला सीता गुंफा आहे. पुढे वर पोहोचल्यावर तलावाचा आकार स्पष्ट दिसून येतो.  बालेकिल्ल्यावरून  उतरेपर्यंत चांगलाच अंधार झाला होता.

त्र्यंबकेश्वरब्रह्मगिरी

दुसऱया दिवशी त्र्यंबकेश्वर दर्शन, ब्रह्मगिरी, संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर, दुर्गभंडारगड दर्शन असा कार्यक्रम ठरला. निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे दर्शन घेऊन सकाळी ब्रह्मगिरी ट्रेकला सुरुवात केली. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी घनदाट जंगल आहे. ब्रह्मगिरीच्या पहिल्या दगडात कोरलेल्या प्रवेशद्वाराचे दर्शन झाले.  गडाचे दुसरे प्रवेशद्वार पार केल्यावर पठारी भाग दिसू लागला. त्यानंतर ब्रह्मगिरी मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन पुढे गोदावरी मातेचे उगमस्थान दिसले.

वेध दुर्गभंडारचे

जटाशंकर मंदिराचे दर्शन झाल्यानंतर पुढे दुर्गभंडारला जायचे वेध लागले. हा एक टेहळणीचा किल्ला असून खूप मोठा भूप्रदेश इथून नजरेस पडतो.  किल्ल्याचे वैशिष्टय़ म्हणजे या दोन किल्ल्यांना जोडणारा अरुंद नैसर्गिक पूल. किल्ल्यावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱया होत्या.  पन्नास फुटांवरून खाली पायऱया खोदलेल्या आहेत. किल्ल्यावर दोन पाण्याची टाकी आहेत. पुढे एक बुरूज होता. त्यावर शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा डौलाने फडकत होता. दुर्गभंडारच्या पायथ्याशी गंगाद्वाराचे तसेच गौतम ऋषींनी स्थापना केलेल्या 108 शिवलिंगांचे दर्शन घेऊन खाली उतरायला सुरुवात केली.

 –  विलास सावंत, शिखर ऍडव्हेंचर क्रिएटर, अंधेरी

 

प्रॉमिसिंग