
>> विवेक दिगंबर वैद्य
श्रीगुरुंच्या वास्तव्याने गाणगापूर हे महान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. कारंजा येथील श्रीगुरुंचे जन्मस्थान काही कारणाने अज्ञात राहिले, मात्र श्रीवासुदेवानंद सरस्वती यांनी ते शोधून काढले आणि श्रीब्रह्मानंद सरस्वती यांनी तिथे श्रीगुरुमहाराजांचे भव्य मंदिर उभारले.
नरसोबाच्या वाडीस बराच काळ व्यतित केल्यानंतर श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज गाणगापूर येथे गेले व तेथे संगमावर राहू लागले. नित्यनेमानुसार भिक्षाफेरीस निघालेले श्रीगुरू एका गरीब ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या ब्राह्मण दांपत्याच्या घरातील वांझ म्हैस दुभती करून त्यांना आशीर्वाद दिला. ही नवलकथा कानावर येताच गाणगापूरच्या नगराधिपतीने श्रीगुरूंना गावात वास्तव्य करण्याची विनंती केली तेव्हा त्यास संमती देत श्रीगुरूंनी गाणगापूर येथे वास्तव्य करण्याचे मान्य केले. येथे एक ब्रह्मराक्षस श्रीगुरुंना शरण आला तेव्हा त्याला मुक्ती देत श्रीगुरुंनी तो ब्रह्मराक्षस जिथे वास्तव्य करून होता त्या जागी मठ स्थापन केला व ते तिथेच आपला नित्यनेम आचरू लागले.
श्रीगुरुमाहात्म्य अल्पकाळात सर्वत्र सर्वमुखे गाजू लागले. गाणगापुराजवळ कुमसी येथे राहणाऱ्या त्रिविक्रम भारतीच्या कानावर श्रीगुरूंचे माहात्म्य पोहोचले तेव्हा ‘त्यांचे आचरण संन्यासाश्रमी यतीकरिता योग्य नाही’ अशी निंदा तो सर्वत्र करू लागला. एके दिवशी श्रीगुरु कुमसी येथे त्रिविक्रम भारतीच्या भेटीस गेले आणि त्यास विश्वरूप दर्शन घडवून त्याचा भ्रम दूर केला. त्रिविक्रम भारती पुढे श्रीगुरुंच्या भक्तीत रुजू झाला. एकदा, आपल्या पांडित्याचा गर्व झालेले दोन ब्राह्मण राज्यातील सर्व ब्राह्मणांना वादविवादात मात देऊन त्रिविक्रम भारतींकडे आले. तेव्हा त्रिविक्रमांनी त्यांना श्रीगुरुंपाशी आणले. तेव्हा श्रीगुरुंनी त्या ब्राह्मणांना विद्येचा गर्व सोडून द्यावा असे परोपरीने समजावले असतादेखील ते आपला हट्ट सोडण्यास तयार होईना, तेव्हा तिथून जाणाऱ्या एका अंत्यजाला श्रीगुरुंनी बोलावले व जमिनीवर सात रेषा काढून त्याला त्या रेषा ओलांडण्यास सांगितले. प्रत्येक रेष ओलांडताक्षणी त्याला आपला पूर्वीचा जन्म आठवू लागला आणि सातवी रेष ओलांडताच तो अतिशय विद्वान झाला तेव्हा त्याच्याकरवी श्रीगुरुंनी अहंकारी ब्राह्मणांचा गर्वपरिहार केला. या लीलेद्वारे श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराजांनी वेदविस्तार अमर्याद असून या कूट व गूढ ज्ञानसागराचे आकलन करून घेणे किती दुरापास्त आहे हेच जणू विषद करून सांगितले.
गाणगापूर येथील श्रीगुरूंचे अवतारकार्य अनेक विस्मयकारक लीलाप्रसंगांनी व्याप्त झाल्याचे दिसून येते. त्वचारोगाने त्रासलेल्या नरहरी या भक्ताला श्रीगुरुमहाराजांनी औदुंबराची सुकलेली फांदी दिली आणि संगमाजवळ नदीकाठी रोपण करून त्यास नित्य पाणी घालावे असे सांगितले. ज्या दिवशी या सुकलेल्या काष्ठास पालवी फुटेल त्यादिवशी तुझा रोग नष्ट होईल, या श्रीगुरूंच्या अभयवचनावर दृढ श्रद्धाभाव राखून नरहरी सुकलेल्या फांदीवर पाणी घालीत राहिला. त्याचा उत्कट भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी एके दिवशी आपल्या कमंडलूतील पाणी त्या फांदीवर शिंपडले, त्यानंतर त्या सुकलेल्या फांदीला नवी कोवळी पालवी फुटली आणि नरहरी त्वचारोगापासूनही मुक्त झाला.
कोष्टी जातीतील एका भक्तास श्रीशैल्यमल्लिकार्जुनाची संपूर्ण यात्रा घडविणे, नंदी नामक ब्राह्मणाचा रोगपरिहार करून त्याला ज्ञानवंत करणे, दिवाळीच्या सणानिमित्त श्रीगुरुमहाराजांनी आपल्या घरी यावे असा हेतू धरून आलेल्या आणि निरनिराळ्या गावी राहणाऱ्या सात शिष्यांचे आमंत्रण स्वीकारणे व दिवाळीचे दिवशी त्या प्रत्येक भक्ताच्या घरी एकाच वेळी उपस्थित राहणे अशा अनेक लीला येथे घडल्या.
गाणगापूर येथे काशी, गंगा व प्रयागक्षेत्रे एकवटलेली आहेत असे भक्तजनांस पटवून देत श्रीगुरुमहाराज पुढे पापविनाशी तीर्थावर गेले. येथे त्यांना त्यांच्या पूर्वाश्रमीची बहीण रत्नाई, पूर्वसंकेतानुसार भेटण्यास आली. ती त्वचारोगाने पीडित होती तेव्हा श्रीगुरुंनी पापविनाशी तीर्थात स्नान करावे असे तिला सांगितले. तिने पापविनाशी तीर्थात तीन दिवस स्नान केले असतो तिचा त्वचारोग पूर्णतः नाहीसा झाला.
पूर्वावतारामध्ये श्रीपादश्रीवल्लभ रूप धारण केलेले असताना श्रीगुरूंनी एका रजकाला अर्थात धोब्याला, ‘तू पुढील जन्मी राजकुळामध्ये जन्म घेऊन राज्योपभोग घेशील व आयुष्याच्या अखेरीस तुला माझे दर्शन घडेल,’ असा वर दिला होता. त्यानुसार तो रजक विदुरानगरीत म्लेंच्छ कुळात जन्म घेऊन बराच काळ राजऐश्वर्याचा उपभोग घेता झाला. पुढे म्हातारपणी त्याच्या मांडीवर एक फोड उठला. नानाविध उपाय करूनही फोड बरा होईना, तेव्हा त्याला एकाने पापविनाशी तीर्थास जावे असे सुचविले. वृद्ध राजाने पापविनाशी तीर्थावर जात स्नान केले तेव्हा तिथे आलेल्या एका यतीने राजाला ऋषभ योग्याची कथा सांगितली आणि गाणगापूर येथे वास्तव्यास असलेल्या श्रीनृसिंहसरस्वती यांचे दर्शन घेतल्यास तुझा फोड बरा होईल असेही सांगितले. त्यानुसार राजा गाणगापूर येथे आला आणि श्रीगुरूंची भेट घेता झाला. तेव्हा त्यांनी ‘का रे रजका कोठे अससी?’ असे म्हणत वृद्ध राजाला त्याच्या पूर्वजन्माची आठवण करून देत आपण दिलेले वचन पूर्ण केले. पुढे राजाचा फोड बरा झाला. अशा रितीने श्रीगुरुमहाराजांनी आपल्या मागील अवतारातील आशीर्वचन पूर्णत्वास आणले.
कालांतराने आपल्यामागे लागलेली प्रसिद्धीची उपाधी वाढू नये म्हणून यात्रेच्या निमित्ताने कायमस्वरूपी श्रीपर्वतास जाण्याचा निर्णय श्रीगुरुनृसिंह सरस्वती महाराजांनी घेतला आणि आपले मनोगत शिष्यांच्या कानावर घातले. ‘मी या पार्थिव देहाने दृश्य रूपात नसलो तरी गुप्त रितीने, अमूर्तपणे माझ्या प्रेमळ व अनन्य भक्तांकरिता गाणगापुरातच कायमस्वरूपी वास्तव्य करणार आहे. मी माझ्या निर्गुण पादुका येथे ठेवून जात आहे आणि तेच माझे मूर्त स्वरूप आहे असे समजून निश्चिंत राहावे.’ असे सांगत त्यांनी सर्व भक्तांचे समाधान केले.
योग्य काळवेळ येताच श्रीनृसिंहस्वामी महाराज नदीमार्गे पुष्पासनावर बसून कर्दळीवनाकडे जाण्यास निघाले. काही अंतर दूर गेल्यावर त्यांनी नावाड्यासोबत काठावर असलेल्या सायंदेव, नंदी, नरहरी व सिद्ध या चार शिष्यांना निरोपाचे सूतोवाच करणारी चार फुले पाठवली.
श्रीगुरुंच्या वास्तव्याने गाणगापूर हे महान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. कारंजा येथील श्रीगुरुंचे जन्मस्थान काही कारणाने अज्ञात राहिले, मात्र श्रीवासुदेवानंद सरस्वती यांनी ते शोधून काढले आणि श्रीब्रह्मानंद सरस्वती यांनी तिथे श्रीगुरुमहाराजांचे भव्य मंदिर उभारले.
[email protected]



























































