‘स्थान’ माहात्म्य – लेखमाला क्र. 3 – गणपतीपुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

अष्टविनायकांमधील ‘लंबोदर’ हा महाराष्ट्र देशाच्या कोकण प्रांतामध्ये ‘गणपतीपुळे’ येथे वास्तव्य करून आहे. प्राचीन काळी ‘पश्चिमद्वार देवता’ म्हणून परिचित असलेला हा लंबोदर सृष्टिसौंदर्याने नटलेल्या कोकणभूमीत समुद्रकिनारी वाळूच्या पुळणीमध्ये विराजमान झाला. त्याचे हे प्राचीनत्व दृढ करणारी मूळ ओळख आजदेखील ‘गणपतीपुळे’ या स्थानाचे अपरंपार माहात्म्य जतन करून आहे.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभकार्याचा आरंभ करतेवेळी श्रीगणेश या पुराणोक्त देवतेचे स्मरण केले जाते. प्रज्ञावंत बुद्धिदाता असा लौकिक मिरवणारी ही देवता सुखकर्ता, विघ्नहर्ता म्हणून अधिक लोकप्रिय आहे. कारण श्रीगणेशाच्या स्मरणाने संकटांचा नाश होतो ही प्रत्येकाची धारणा आहे. माणसाला कशा ना कशाचे तरी भय असते आणि हे भय दुःख-संकटे, अडीअडचणींपासून निर्माण होते. आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्टय़ा उद्भवणारे पेच सोडवणारी देवता जेव्हा श्रीगणेशरूपाने अवतरते तेव्हा ती केवळ पुराणोक्त न राहता सर्वसामान्यांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग बनते. म्हणूनच रक्षणकर्ता श्रीगणेश सर्वत्र आत्मीयतेने पुजला जातो व त्याची मंदिरे सर्वत्र पाहावयास मिळतात.

हिंदुस्थानच्या आठही दिशांचे रक्षण अष्टविनायक करतात अशी धारणा आहे. विकट (कश्मीर), महोदर (रामेश्वर), धूम्रवर्ण (तिबेट), एकदंत (केरळ), गजानन (तंजावर), वक्रतुंड (मद्रास), विघ्नराज (हिमालय) व लंबोदर (महाराष्ट्र) अशा त्या अष्टविनायकांचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये केलेला आहे. या अष्टविनायकांमधील ‘लंबोदर’ हा महाराष्ट्र देशाच्या कोकण प्रांतामध्ये ‘गणपतीपुळे’ येथे वास्तव्य करून आहे. प्राचीन काळी ‘पश्चिमद्वार देवता’ म्हणून परिचित असलेला हा लंबोदर भक्तांवर कृपा करणारा, त्यांच्या मनोकामना पुरविणारा, गिरिरूपाने राहणारा, सृष्टिसौंदर्याने नटलेल्या भूमीत समुद्रकिनारी वाळूच्या कुळणीमध्ये विराजमान झाला. त्याचे हे प्राचीनत्व दृढ करणारी मूळ ओळख आजदेखील ‘गणपतीपुळे’ या स्थानाचे अपरंपार माहात्म्य जतन करून आहे.

पुराणोक्त संदर्भानुसार सांगायचे झाले तर शकुनी दैत्याचा शिवभक्त पुत्र भस्मासुर याने दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून घनघोर तपश्चर्या केली आणि श्रीशंकरांना प्रसन्न करून घेतले. ‘‘निसर्गातील चर-अचर प्राणी माझ्या स्वाधीन राहतील. मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेन त्याचे भस्म होईल’’ अशी जगावेगळी इच्छा त्याने व्यक्त केली. भोळ्या सदाशिवाकडून इच्छापूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होताच भस्मासुर उन्मत्त झाला व त्याच्या मार्गात येणाऱया प्रत्येकाच्या मस्तकावर हात ठेवून त्यास भस्मीभूत करू लागला. त्याचे उपद्रवमूल्य चढत्या गतीने वाढू लागले तेव्हा भस्मासुराच्या त्रासापासून स्वर्ग, पाताळ आणि वसुंधरेचे रक्षण करण्याच्या हेतूने श्रीविष्णू ‘मोहिनी’रूप घेते झाले. स्त्र्ााrरूपातील सुस्वरूप मोहिनीने भस्मासुराला मोहविले आणि एका मोहाच्या क्षणी स्वतःच्या मस्तकावर हात ठेवण्यास त्याला भाग पाडले. भस्मासुराने मिळवलेला ‘वर’ त्याच्यासाठी ‘शाप’ ठरला आणि स्वतःच्या मस्तकावर हात ठेवून भस्मासुर स्वतःच भस्मीभूत झाला.

भस्मासुरासारखा बलशाली असुर जिच्या देखण्या रूपामुळे घायाळ झाला आणि काळाच्या फेऱयात सापडला त्या मोहिनीला पाहण्यास श्रीशंकर उत्सुक झाले. त्यांनी श्रीविष्णूंकडे मोहिनीरूप पाहण्याची इच्छा वारंवार प्रकट केली तेव्हा अनिच्छेने का होईना, श्रीविष्णूंनी पुन्हा एकदा ‘मोहिनी’रूप धारण केले. मात्र त्या आकर्षक विश्वमोहिनी रूपाचे दर्शन घडताच श्रीशंकर सारासार विचारशक्तीपासून दूर गेले आणि कामविव्हल होत मोहिनीच्या मागे धावले. अवचित उद्भवलेल्या या बिकट प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी श्रीविष्णू ‘मोहिनी’रूपाचा त्याग करून तत्काळ गुप्त झाले. मात्र, इथे श्रीशंकरांना मोहिनीचा विरह सहन होईना. तिचा शोध घेत त्रिभुवन पालथे घालणाऱया श्रीशिवशंकरांना मोहिनी प्राप्त झाली नाही तेव्हा ते प्रचंड क्रोधित झाले. त्यांच्या क्रोधातून घडलेल्या वीर्यस्खलनामुळे एक बालक जन्म घेता झाला.

या बालकाचे संगोपन दैत्यगुरु शुक्राचार्यांनी केले. महातेजस्वी, बलदंड, सामर्थ्यशाली असा हा बालक शैशव दूर सारून तरुण झाला. तोवर आपल्या मातापित्यांविषयीची माहिती जाणून घेण्यात अपयशी ठरल्याने सतत क्रोधित राहणाऱया त्या तरुणाची ओळख ‘क्रोधासुर’ या नावाने झाली. श्रीशंकराच्या क्रोधातून जन्म घेतलेल्या क्रोधासुराला आवश्यक ते शिक्षण देऊन दैत्यगुरू शुक्राचार्यांनी सर्व क्षेत्रांत निपुण व पारंगत केले. त्यासोबतच क्रोधासुराच्या मनात त्रिभुवनावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा जागवून त्याला सूर्यदेवतेची उपासना करण्यास भाग पाडले. क्रोधासुराने उग्र तपश्चर्या केली आणि सूर्यदेवतेला प्रसन्न करून घेतले. सोबतच सूर्यदेवाने वर प्रदान केला असता त्यायोगे ‘‘चराचरावर माझी सत्ता राहावी. उत्पत्ती-स्थिती व लय ही प्रमुख कार्ये ज्यांच्या हाती आहेत अशा देवतांकडून मला अभय मिळावे’’ अशी विचित्र मागणी पूर्ण करण्यास त्याने सूर्यदेवाला भाग पाडले. पुढे अल्पावधीतच क्रोधासुर स्वर्ग-पृथ्वी आणि पाताळ लोकावर अमर्याद सत्ता गाजवू लागला. सामर्थ्याच्या बळावर त्याने समस्त देवदेवतांना आपल्या अंकित करून घेतले. इतकेच नव्हे तर क्रोधासुराने त्याला वर प्रदान करणाऱया सूर्यदेवतेलाही अडचणीत आणले आणि ‘सौर’लोकाचा त्याग करून तिथून निघून जाण्यास भाग पाडले.

इथे तोवर देवदेवतांची आणि देवसेनेची बिकट अवस्था झाली. क्रोधासुराच्या निरंपुश सामर्थ्यामुळे हतबल झालेल्या देवता मंडलाने महर्षी वसिष्ठांकडे धाव घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्गुण निराकार अशा श्रीगणेशाला साकडे घातले. ज्याला आदि- अंत नाही, ज्याला पूळ-गोत्र नाही अशा ब्राह्मणस्पती विघ्नहर्त्याला केलेले आवाहन फलदायी ठरले आणि देवदेवतांच्या मंडलासमोर प्रकट झालेल्या लंबोदराने सर्व विषय समजून घेत सर्व सामर्थ्यानिशी क्रोधासुरावर चढाई करून त्याचा पराभव केला. क्रोधासुराच्या जाचातून त्रिभुवनाची मुक्तता झाली. लज्जित, पराभूत क्रोधासुर क्षमायाचना करीत लंबोदरास शरण आला तेव्हा श्रीगणेशाने त्याला विराट रूपदर्शन घडवले आणि त्याचा वध न करता त्याला कायमस्वरूपी पाताळ लोकामध्ये धाडून देवदेवतांना पूर्वस्थिती प्रदान केली. दुष्टांचे पारिपत्य व सुष्टांना अभय प्रदान करून श्रीगणेशाचे हे ‘लंबोदर’रूप गुप्त झाले. मात्र त्याची प्रतिमा तिथेच स्वयंभूरूपाने निर्माण झाली. त्याच्या प्रतिमेचे पूजन देवदेवता करू लागले. श्रीगणेशाची कायमस्वरूपी प्रतिमा लाभलेले हे स्थान पुढे कोकण प्रांतात ‘गणपतीपुळे’ नावाने प्रसिद्धीस आले. (पूर्वार्ध)

[email protected]