>> विवेक दिगंबर वैद्य
अनेक ऋषीमुनींची तपोभूमी असलेल्या परमपवित्र ‘नगर’ जिह्याने महानुभाव, शैव, नाथ, वैष्णव आणि वारकरी अशा जवळपास सर्व संप्रदायांना स्थानापन्न केले आहे. अनेक महान संत-सिद्ध सत्पुरुषांमुळे नगरचा परिसर अध्यात्मदृष्टय़ा समृद्ध झाला. शिव-शक्तीच्या सहयोगातून जन्मलेले बीज जिथे रुजले त्या गर्भगिरीच्या विस्तीर्ण परिसरात स्थानापन्न झालेल्या आणि सभोवताली मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ आणि कानीफनाथ यांच्या शक्तिशाली कवचात नांदणाऱया आदिनाथ वृद्धेश्वराविषयी जाणून घेऊया.
महाराष्ट्रात अनेक पंथ व संप्रदाय आपापले वैशिष्टय़ आणि माहात्म्य जागवत गेली कित्येक शतके कार्यरत आहेत. प्रत्येक संप्रदायाची स्वतःची आगळीवेगळी शैली आहे, आराध्य देवदेवता आहेत, पूर्वापार माहात्म्य दर्शविणारे वैशिष्टय़पूर्ण ‘स्थान’ आहे व त्यासोबत प्रत्येक संप्रदायाला रीतभात, नेमनियम आणि प्रथा-परंपरेने सजलेली समृद्ध वैभवशाली पार्श्वभूमीदेखील आहे. यातील सर्वच संप्रदाय पूर्वापार चालत आलेली त्यांची वैशिष्टय़े जपताना अन्य संप्रदायांतील उत्तम मूल्ये व कवणदेखील आपलीशी करून घेतात, आत्मसात करतात. त्यामुळे संप्रदायामधील प्राचीनत्व आणि अर्वाचीनत्व एकमेकांत सहजगत्या मिसळते आणि त्याचा दृश्य स्वरूपात दिसणारा ठळक प्रत्यय येणाऱया प्रत्येक नव्या पिढीगणिक वृद्धिंगत होत जातो आणि त्या संप्रदायाला समृद्ध व संपन्न करतो. कणाकणाने, अंशा-अंशाने वृद्धिंगत होणारे असेच एक प्राचीन स्थान नगर शहराजवळच असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ‘वृद्धेश्वर’ नावाने प्रसिद्ध आहे. हे स्थान जिथे वसलेले आहे, त्या गर्भगिरी तथा गर्भाद्री या चैतन्यमय परिसराविषयी सर्वप्रथम जाणून घेऊया.
अनेक ऋषीमुनींची तपोभूमी असलेल्या परमपवित्र ‘नगर’ जिह्याने महानुभाव, शैव, नाथ, वैष्णव आणि वारकरी अशा जवळपास सर्व संप्रदायांना स्थानापन्न केले आहे. इथल्या वसुंधरेच्या पुशीत अनेक अलौकिक दिव्य ‘संत’रत्ने प्रसवली, उदयाला आली व कायमस्वरूपी आश्रय घेती झाली. सद्यकाळात साईबाबा, उपासनी महाराज, जनार्दन स्वामी, किसनगिरी बाबा, पैकाडी महाराज, दासगणू, गंगागीर बाबा, तनपुरे महाराज, भगवानबाबा, खंडूजी बाबा या व अशा अनेक महान संत-सिद्ध सत्पुरुषांमुळे नगरचा परिसर अध्यात्मदृष्टय़ा समृद्ध झाला. हे जरी खरे असले तरीदेखील पूर्वापार ‘नाथ’ संप्रदायाचे ‘वास्तव्य’स्थान म्हणून नगरचा परिसर सर्वत्र प्रख्यात व प्रसिद्ध आहे.
नाथ संप्रदायाचा उल्लेख होताच पावले आपसूकच नगर जिह्यातील गर्भगिरी पर्वतरांगांच्या दिशेने वळतात याचे कारण तेथील नाथांचे वास्तव्य. परकीय आक्रमणांमुळे हिंदुस्थान आणि पर्यायाने हिंदू धर्माला आलेली ग्लानी दूर सारून त्यास बलशाली व चैतन्यदायी करण्याचे कार्य नाथ संप्रदायाने केलेले आहे. जातीभेद, स्पृश्यास्पृश्य भेद यांच्या पलीकडे जाऊन ‘जे जे उत्तम आहे’ त्याचा स्वीकार करणारा नाथ संप्रदाय काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा आहे. म्हणून विविध जातीजमातीतील 84 सिद्ध हे नाथ परंपरेमध्ये वंदनीय ठरतात. प्रत्येक युगात संकट काळात मोक्याच्या क्षणी आपले ‘अस्तित्व’ प्रकट करणाऱया नाथ संप्रदायातील अनेक सिद्धपुरुषांचा सहवास ‘नगर’मधील ‘गर्भगिरी’ परिसरास लाभला. मच्छिंद्रनाथांचे ‘मायंबा’, कानीफनाथांची ‘मढी’ आणि आदिनाथांचे ‘वृद्धेश्वर’ ही त्याची ठळक उदाहरणे.
नगर जिह्यातून बीड-धाराशीवकडे जाण्याच्या दिशेस असलेल्या डोंगरफाटय़ावर नगरच्या वांबोरीपासून बीडच्या रायमोहपर्यंतचा भूभाग म्हणजेच गर्भाद्री किंवा गर्भगिरी. हे नामकरण नाथ परंपरेला साजेसे आहे. येथील शंभरेक कि.मी. परिसरात अनेक नाथपंथी सत्पुरुष नांदत आहेत. वांबोरी तीर्थाजवळील गोरक्षनाथांची तपोभूमी, भातोडी-पारगाव येथील अडबंगनाथांची तपोभूमी, करंजी घाटापाशी गडावर असलेली बाळकनाथांची समाधी, सावरगावच्या डोंगर-पठारावरील मच्छिंद्रनाथांची समाधी, कानीफनाथांच्या वास्तव्याने पावन झालेला मढी, मिरी, कापूरवाडी परिसर, त्याचप्रमाणे चिंचोली आणि रायमोह येथील गहिनीनाथांची गुंफा अशी अनेक नाथपंथी शक्तिस्थळे गर्भगिरीचे माहात्म्य वाढवितात. ‘गर्भाद्री’ किंवा ‘गर्भगिरी’ या शब्दाला गूढत्व प्रदान केले ते येथील घनगर्द वनसंपदेने. चार बाजूंनी डोंगरकडय़ांनी वेढलेला आणि मध्यभागी सुरक्षित घनदाट जंगलाने वेढलेला हा परिसर शिव आणि शक्ती यांच्यातील एकरूपत्वाचे प्रतीक आहे.
शिव-शक्तीच्या सहयोगातून जन्मलेले बीज जिथे रुजले त्या गर्भगिरीच्या विस्तीर्ण परिसरात स्थानापन्न झालेल्या आणि सभोवताली मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ आणि कानीफनाथ यांच्या शक्तिशाली कवचात नांदणाऱया आदिनाथ वृद्धेश्वराविषयी जाणून घेऊया.
ब्रह्मपुराणात उल्लेखानुसार गौतम ऋषी, कपिलमुनींच्या वास्तव्याने ‘तपसिद्ध’ झालेले आदिनाथ वृद्धेश्वराचे स्थान विलक्षण प्राचीन आहे. सध्याचे दगडी मंदिर काही शतकांपूर्वी बांधले गेले. मात्र दहाव्या शतकाच्याही पूर्वापार वृद्धेश्वराचे स्थान अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. धुंडीसुत मालुकवी यांनी ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथामध्ये वृद्धेश्वराचा उल्लेख केलेला आहे. मच्छिंद्रनाथ, जालंदरनाथ, कानीफनाथ यांनी गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये समाधी घेतल्याचा उल्लेखही ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथामध्ये धुंडीसुत मालुकवी यांनी केलेला आहे.
वृद्धेश्वर या क्षेत्राची मूळ देवता अर्थात श्रीवृद्धेश्वराची उत्पत्ती, ‘जो सातत्याने वृद्धिंगत होतो तो किंवा जो आदिकालापासून येथे स्थानापन्न झाला आहे तो’ या अर्थाने केली जाते. वृद्धेश्वर हे श्रीशंकराचे रूप आहे आणि प्रचलित रूपकांनुसार तो येथे ‘पिंडी’ स्वरूपात स्थापन आहे. मात्र सर्वसाधारणपणे इतरत्र पाहावयास मिळणारी शाळुंकेसह ‘पिंडी’ येथे आढळत नाही कारण वृद्धेश्वराचे शिवलिंग खडकाळ दगडासारखे आहे. वेगवेगळ्या आकाराचे, खाचखळग्यांनी भरलेले दगडी पुंजके वागविणाऱया या ओबडधोबड शिळेतून जलप्रवाह वाहतो. महाशिवरात्रीस दरवर्षी या दगडी पुंजक्यांचा आकार नियमितपणे वाढतो म्हणून हे शिवलिंग ‘वृद्धेश्वर’ (वृद्धिंगत होणारा) नावाने ओळखले जाते.
या शिवलिंगास सुरक्षिततेच्या दृष्टीने आच्छादित करण्यासाठी धातूचे आवरण तयार करण्यात आले. मात्र, पुढे शिवलिंगावर हे आवरण नीट बसेनासे झाले. याचा शोध घेता या शिवलिंगाचा आकार दरवर्षी सतत वाढत असल्याचे सत्य समोर आले. सातत्याने वृद्धिंगत होणारा म्हणून प्रसिद्धीस आलेला हा ‘वृद्धेश्वर’ प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे आणि त्याची ‘म्हातारदेव’ ही आणखी एक ओळख आहे. या वृद्धेश्वराचा नाथ संप्रदायाचा असलेला संबंध पुढे वारकरी संप्रदायाशी कसा जुळला त्याविषयीची माहिती पुढील लेखात पाहूया.
[email protected]





























































