चहा : एक खरे ‘समाजवादी’ पेय

721

>> वृषाली पंढरी

हिंदुस्थानच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रमाणे आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्यास संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) मान्यता दिली आहे. मिलान येथे 2015 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य आणि कृषी संघटनेच्या बैठकीत असा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार 21 मे रोजी, म्हणजे आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने चहा आणि त्याचा इतिहास, त्याचे उत्पादन, फायदे-तोटे, चहाचे इतर उपयोग.. याविषयी…

इ सवी सन पूर्व 350 च्या सुमारास चिनी शब्दकोशात पहिल्यांदा चहाचा उल्लेख आढळतो. आपल्या देशातील 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत चहा हादेखील राजकीय मुद्दा झाला. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ‘चाय पे चर्चा’ हा शब्द रूढ झाला. ‘चाय पे चर्चा’ या अनोख्या उपक्रमाने देशभरातील चहा विक्रेत्यांना गौरव प्राप्त करून दिला. हिंदुस्थानने मांडलेल्या प्रस्तावानुसार 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. त्यानंतर आता हिंदुस्थानच्याच शिफारसीमुळे संयुक्त राष्ट्र महासभेच्या निर्णयानुसार 21 मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात आहे. हिंदुस्थानने 2015 मध्ये मिलान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य आणि कृषी संघटनेच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव सादर केला होता. आता हिंदुस्थानच्याच पुढाकारामुळे 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून निवडला गेला असून ते संयुक्त राष्ट्र संघानेही (युनो) मान्य केले आहे.

युनोला विश्वास आहे की 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस घोषित केल्यामुळे उत्पादन आणि खप वाढवण्यासाठी मदत मिळेल. ग्रामीण क्षेत्रामध्ये भूक आणि गरीबीसोबत लढण्यासाठी फायदेशीर ठरेल. संयुक्त राष्ट्र महासभेने चहाच्या औषधी गुणांसोबत त्याच्या सांस्कृतिक महत्वालादेखील मान्यता दिली आहे.

चहा उत्पादनात हिंदुस्थान आणि चीन सर्वात पुढे आहेत, पण मोठय़ा लोकसंख्येमुळे उत्पादित चहापैकी बहुतेक चहा देशातच वापरला जात असल्याने चहाच्या निर्यातीत केनिया व श्रीलंका एक व दोन क्रमांकावर आहेत. हिंदुस्थानात उत्पादित अनेक प्रकारच्या चहापैकी दार्जिलिंग चहा हा एका शतकापेक्षा जास्त काळापासून त्याची गुणवत्ता आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे दार्जिलिंग भागातील भौगालिक परिस्थिती. समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर या चहाच्या बागा वसल्या आहेत. कर्बंचे जास्त प्रमाण असलेली डोंगराळ जमीन व उत्तम पर्जन्यमान हे या चहाच्या लागवडीसाठी वरदान आहे. हवेतील विशेष आर्द्रता, बाष्पीभवन दर, वाऱयाची गती, दररोज दोन ते चार तास मिळणारा सूर्यप्रकाश, भरपूर ढग आणि धुके असे अनुकूल वातावरण जगात इतरत्र नाही. याच हवामानामुळे दार्जिलिंग प्रदेशातील चहाची गुणवत्ता नैसर्गिकरित्या खुलली आहे. त्यातूनच या चहाने जग पादाक्रांत केले आहे. आसाममध्ये लाखभर लोकांना यातून रोजगार मिळाला असून त्यात स्त्रीयांचे प्रमाण सत्तर टक्के आहे. देशभरातील चहा उत्पादनात लाखो लोकांना रोजगार मिळत असून केवळ चहा विकून उदरनिर्वाह करणारेही लाखो गरीब लोक देशात आहेत.

दूध घालून केलेल्या नेहमीच्या चहात, स्पेशल, कटिंग, फक्कड, उकाळा, आद्रकवाला चहा, मलई चहा, चॉकलेट चहा, बासुंदी चहा, बोर्नव्हिटा चहा, तंदुरी चहा, इराणी चहा, दालचिनी चहा, गवती चहा, गुळाचा चहा असे प्रकार आहेत. शिवाय हल्ली मागणी वाढत असलेले लेमन चहा, लेमन हनी टी, आवळा चहा, ब्लॅक चहा, बुस्ट चहा, जिंजर हनी टी, लेमन हनी टी, नॉर्मल ग्रीन टी, मिंट अँड रोज टी, तुलसी ग्रीन टी, जिंजर हनी ग्रीन टी असे जवळपास पन्नासांवर चहाचे प्रकार चहाबाजांसाठी बाजारात उपलब्ध आहेत.

चहा म्हणजे उत्साह वाढवणारा, शीणवटा, मरगळ घालवणारा, चहा म्हणजे भांडणं मिटवणारा, चहा म्हणजे नाती आणि दोस्ती दृढ करणारा, चहा म्हणजे काम फत्ते करणारा अशा अनेक चहाच्या व्याख्या करता येतील. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, लहान-मोठा असा भेदाभेद न करणारे खरे ‘समाजवादी’ पेय म्हणून चहाचा उल्लेख करता येईल. म्हणूनच वेळी-अवेळी नि:संकोचपणे चहाचा आस्वाद घेण्याची आणि देण्याची ऑफर सहसा कुणी टाळू शकत नाही.

अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं आपल्याकडे म्हटले जाते. पण मर्त्य मानवाने चहाला अमृततुल्य असे गोड नाव दिले. चहाच्या दुकानाच्या नावात अमृततुल्य शब्द वापरणं ही पुणे आणि मुंबईकरांची एक खासियत, पण यातील बहुतेक विक्रेते मात्र उत्तर हिंदुस्थानी आहेत.

चकचकीत पितळी भांडय़ात आलेली उकळी,त्यातून फिरणारी पितळी पळी आणि त्या पळीतून उकळत्या चहाचा घोट हातावर घेऊन चव घेतल्यानंतरच वाफाळणारा ग्राहाकासमोर आलेला कप किंवा काचेचा ग्लास. कधी एकदा हा दूग्धशर्करा योग जुळून येतो अन् पृथ्वीवरच्या या ‘अमृता’चा घोट घशात उतरतो असे अनेकांना वाटत असते. असा हा वाफाळलेला चहा मनाला उभारी आणतो, थंडी असेल तर हुडहुडी घालवतो. असा हा इहलोकीचा एक अविष्कार आपल्या संस्कृतीचा आणि पाहुणचाराचा अविभाज्य भाग झाला आहे. अर्थात, चहाला व्यसन म्हणणे फारसे संयुक्तिक वाटत नाही. काळा चहा आपल्या हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज आपण एक कप काळा चहा प्यायलो तरी ते आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यात असलेले फ्ल्वेनोइड एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यात उपयोगी ठरते. याशिवाय काळा चहा प्यायल्याने हृदयाच्या धमन्यांना निरोगी ठेवण्यास आणि रक्त क्लोटिंग प्रक्रिया कमी करण्यास मदत होते. काळा चहा पिण्याने प्रोस्टेट, ओवेरीयन आणि फुप्फुसांच्या कर्करोगासारख्या मोठय़ा रोगापासून बचाव होण्यासदेखील मदत होते. काळा चहा शरीरातील कर्करोगाला उत्तेजना देणाऱया पेशी नष्ट करण्यात मदत करतो. याच काळ्या चहामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते आणि तोंडाच्या कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते.

अर्थात, कुठलेही सेवन अती केले की त्याचे दुष्परिणामही होणारच. आलं, तुळस, लवंग, वेलची आणि दालचिनी यांसारख्या वस्तू घालून आरोग्याच्या दृष्टीने गरम चहा पिणे हितावहच आहे, पण त्याचे अतिप्राशन नुकसानकारकच ठरते. रिकाम्या पोटी चहा पिण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे ऍसिडिटी. रिकाम्या पोटी चहा पिण्याने आपली भूक मंदावू शकते. त्यामुळे आपण आवश्यक पोषणापासून वंचित रहातो. पचन तंत्र कमजोर होऊन बद्धको…, पुढे त्यातून मधुमेह अशा समस्या निर्माण होउै शकतात. पोटात किंवा अन्ननलिकेत जळजळ, उलटी येणे, जीव घाबरणे अशा समस्या रिकाम्या पोटी चहा पिण्याने निर्माण होतात.

वरील गोष्टी टाळून व शक्यतो दुधाशिवाय किंवा कमी दुधाचा चहा पिणे आरोग्यवर्धकच आहे. याशिवाय ग्रीन टीचे काही घरगुती फायदेही आहेत. वापरलेल्या ग्रीन टीची पत्ती केसांना लावल्यास केस चमकदार बनतात तर केसांना गडद करण्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापरही करता येतो. कधी कधी तणाव, ऍलर्जी, जास्त दारू प्यायल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. वापरलेल्या ग्रीन टीच्या दोन बॅग डोळ्यांवर 10 मिनिटं ठेवल्यास चहात असलेली कॅफीन सुजलेल्या डोळ्यांच्या नसा आणि त्वचेला आराम देतात आणि सूजलेले डोळे ठीक होतात.
जास्त वेळ उन्हात राहिल्याने चेहऱयावर काळे डाग येण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी थंड टी बॅग चेहऱयावर 10 मिनिटे ठेवल्यास त्वचा स्वच्छ होते. त्वचा कडक असेल व इंजेक्शन घ्यायची वेळ आल्यास त्वचा मऊ होण्यासाठी वापरलेल्या ग्रीन टीचा चांगला उपयोग होतो. वापरलेला चहा गुलाबाच्या झाडांना टाकल्यास फुले टवटवीत येतात. अशा या बहुगुणी चहाला नावं ठेवण्यापेक्षा त्याचा योग्य व माफक उपयोग करून आनंद घेणेच योग्य.

आपली प्रतिक्रिया द्या