शहाजहाँ, मुमताज आणि बऱ्हाणपूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश मिश्र

शहाजहाँने मुमताज बेगमसाठी ताजमहाल आग्रा येथे बांधला असला तरी मुमताजचा सर्वाधिक काळ मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेच व्यतीत झाला. शहाजहाँ आणि मुमताज यांच्या प्रेमकहाणीने बऱ्हाणपूरमध्येच उत्कर्षबिंदू गाठला होता. आता बऱ्हाणपूर पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण असे की, या शहरातील एका दारूच्या व्यापाऱ्याने त्याच्या पत्नीला ताजमहालसारखे सात बेडरूम असलेले घर भेट म्हणून दिले आहे.

शहाजहाँ आणि मुमताज यांची प्रेमकहाणी तुम्ही नक्कीच ऐकली असेल. शहाजहाँने त्याची पत्नी मुमताज हिच्यासाठी ताजमहाल बांधला हेही तुम्ही ऐकले असेल. हा ताजमहाल प्रेमाचे प्रतीक म्हणून जगभरात ओळखला जातो. जगातील कोणत्याही भागातून हिंदुस्थानात कुणी आले तरी ताजमहाल पाहण्याची त्यांची इच्छा असतेच, परंतु केवळ शहाजहाँ हा पत्नीवर प्रेम करणारा एकटाच पती नव्हता, असे सांगणारी अनेक सत्ये आणि तथ्ये आहेत. अश्वत्थामा, मुघल बादशहा शहाजहाँ याची प्रिय पत्नी मुमताज बेगम आणि मोती बेगम, शेकडो वर्षे जुनी पाणीपुरवठा प्रणाली, अकबराच्या नवरत्नांमध्ये समाविष्ट असणारा अब्दुल रहीम खानखाना, फ्रेंच लेखक जुल्स वर्नी यांचे ‘अराऊंड दि वर्ल्ड इन 80 डेज’ हे पुस्तक, खोए की जलेबी, रुमाली रोटी आणि रस्सी – या सर्व गोष्टींमध्ये काहीच साधर्म्य असल्याचे दिसत नाही, परंतु एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे बऱ्हाणपूर नावाचे शहर. मध्य प्रदेशातील हे शहर म्हणजे शेरशहा सुरी याच्या मते ‘दख्खनचा दरवाजा’ होय.

शहाजहाँ आणि मुमताज यांच्या प्रेमकहाणीने बऱ्हाणपूरमध्येच उत्कर्षबिंदू गाठला होता. आता बऱ्हाणपूर चर्चेत येण्याचे कारण असे की, या शहरातील एका दारूच्या व्यापाऱ्याने त्याच्या पत्नीला ताजमहालसारखे सात बेडरूम असलेले घर भेट म्हणून दिले आहे. घरात सात बेडरूम असण्याचे कारण असे की, आठवड्यातील सात दिवस वेगवेगळ्या प्रकारे आनंदात व्यतीत करता यावेत. या प्रेमाच्या गोष्टी आहेत आणि अजरामर प्रेमाचे उदाहरण शहाजहाँ आणि मुमताज यांच्या कहाणीद्वारे दिले जाते. वास्तविक, अकबराने जेव्हा बऱ्हाणपूर 1601 मध्ये खानदेश संस्थानातून जिंकून मुघल साम्राज्यात समाविष्ट केले, तेव्हापासून हे शहर मुघल साम्राज्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण बनले. शहाजहाँने या शहरात अनेक वर्षे व्यतीत केली. येथे शाही किल्ला बांधला. याच किल्ल्यात मुमताज बेगमसाठी बांधलेला खास हमामखाना होता. या हमामखान्याच्या भिंतींवर जी चित्रे काढली आहेत, त्यातील एक ताजमहालसारखे आहे.

प्राणाहून प्रिय असलेल्या आपल्या पत्नीसाठी शहाजहाँने ताजमहाल जरी आग्रा येथे बांधला असला तरी मुमताज बेगमचे खरे नाते बऱ्हाणपूरशी होते. आग्रा शहराशी मुमताजचे नाते केवळ मीना बाजारपुरतेच मर्यादित होते. अर्थात, मुमताज बेगमने आपला सर्वाधिक काळ बऱ्हाणपुरातच व्यतीत केला. आपल्या चौदाव्या मुलाच्या जन्मावेळी याच शहरात तिचा मृत्यू झाला होता. बऱ्हाणपुरातील असीरगढमध्ये मुमताजचा दफनविधी करण्यात आला. जेव्हा ताजमहाल बांधून तयार झाला, त्यानंतर सहा महिन्यांनी मुमताजला आग्रा येथे नेऊन पुन्हा दफन करण्यात आले. बऱ्हाणपूरमध्ये मुमताजची आठवण म्हणून शहाजहाँने एक काळा ताजमहाल बांधला होता.

महाकाव्यांमधील वर्णनांनुसार बऱ्हाणपूरचा असीरगड दुर्ग हा एक प्राचीन दुर्ग आहे. या किल्ल्यात एक शिवमंदिर आहे. चिरंजीवत्व लाभलेला अश्वत्थामा या मंदिरात दररोज येतो आणि शिवलिंगाला पुष्पांजली अर्पण करतो, असे सांगितले जाते. हे मंदिर खूपच लहान आहे. मंदिराजवळ अश्वत्थामा नावाचा जलकुंडही आहे. बऱ्हाणपूरमध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी पाणीपुरवठा यंत्रणा आहे. ही प्राचीन यंत्रणा मुघलांनी उभारली होती. ही अनोखी पाणीपुरवठा यंत्रणा निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे नाव अब्दुल रहीम खानखाना होय. त्यांनी ही अत्यंत सुविहित योजना तयार केली. या यंत्रणेत जलाशय, कुंड, पाट आणि जलवाहिन्यांचाही समावेश होता. ही योजना आजही अस्तित्वात आहे.

‘अराऊंड दि वर्ल्ड इन 80 डेज’ हे फ्रेंच लेखक जुल्स वर्नी यांचे गाजलेले पुस्तक आहे. या कादंबरीत एका व्यक्तीच्या जगप्रवासाचे वर्णन आहे. हा जगप्रवास या व्यक्तीने 80 दिवसांत पूर्ण केला होता. प्रवासात ती व्यक्ती बऱ्हाणपूरलाही आली होती. कापूस, कापड आणि दोरी तयार करण्याच्या उद्योगासाठी बऱ्हाणपूर प्रसिद्ध आहे. येथे एकाहून एक सरस दोऱ्या तयार केल्या जात असत आणि त्यांचा पुरवठा जगभरात केला जात असे. आजही हे शहर या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. जिलेबी ही तसे पाहायला गेल्यास एक सर्वसामान्य मिठाई आहे, परंतु बऱ्हाणपूरची जिलेबी काही औरच असते. येथील खाण्यापिण्याच्या सवयींवर मोगल परंपरेची छाप दिसून येते. कदाचित त्यामुळेच खाणेपिणेही वेगळ्याच प्रकारचे आहे. या शहरात मिळणाऱ्या जिलेबीत मावा म्हणजे खवा भरलेला असतो. त्यालाच ‘खोये की जलेबी’ म्हणतात. याखेरीज बऱ्हाणपूरची रुमाली रोटीही खूपच लोकप्रिय आहे. ही रोटी भाजण्याची अनोखी कला मुघल काळापासून चालत आली आहे. ‘भृगुसंहिते’त या शहराचा उल्लेख केला आहे, असे सांगितले जाते. कारण या शहराची रचना भृगू ऋषींनी ताप्ती नदीच्या किनारी बसून केली होती. असे म्हणतात की, प्राचीन काळात या शहराला ब्रह्मपुरी म्हणून ओळखले जात असे, परंतु त्याचे कोणतेही पुरावे अस्तित्वात नाहीत.

अशा प्रकारे अनेक बाबतीत प्रसिद्ध असलेल्या या शहराकडे एका मद्य व्यावसायिकाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे असे म्हणता येईल, परंतु केवळ शहाजहाँ आणि हा व्यापारीच असे नाहीत, ज्यांनी आपापल्या पत्नीला अनमोल वास्तू भेट म्हणून दिली. त्यांच्याव्यतिरिक्तही अनेक लोक असे आहेत, ज्यांनी आपल्या पत्नीवरील प्रेम आपल्या कृतींनी अमर करून ठेवले आहे. मध्य प्रदेशातील कटनी येथे राहणाऱ्या कल्पनाथ यांची पत्नी दरवर्षी छठपूजा करण्यासाठी बिहारमध्ये जात असे. या काळातील पत्नीवियोग पतीला सहन होत नसे. त्यामुळे कल्पनाथ यांनी पत्नीला दूर जाण्यापासून रोखण्यासाठी कटनीमध्येच सिमरार नदीवर घाट बांधून घेतला. हा घाट पती-पत्नीच्या प्रेमासाठी संपूर्ण जिह्यात प्रसिद्ध आहे. बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांची पत्नी सुनीता कपूर यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मर्सिडिज बेंझ जीएलएस दिली होती. तिची किंमत सुमारे एक कोटी होती, असे सांगण्यात येते.

याच धर्तीवर चंदिगढ येथील उद्योजक हरीश गोयल यांनी त्यांच्या पत्नीला व्हॅलेन्टाइन वीकच्या प्रारंभी कारचा व्हीआयपी नंबर भेट दिला होता. या नंबरसाठी त्यांना पावणेनऊ लाख रुपये मोजावे लागले. अजमेरमध्ये राहणारे धर्मेंद्र अनिजा हे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चंद्र-तारे तोडून आणू शकले नाहीत. मात्र पत्नीला खूश करण्यासाठी त्यांनी चंद्रावर तीन एकर जमीन खरेदी केली आणि पत्नीला भेट म्हणून दिली.

ज्यांच्याकडे काही नाही, त्यांच्यासाठी मात्र दोन हात पुरेसे आहेत हे सिद्ध करून दाखवले मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका मजुराने. भरतसिंह नावाच्या या मजुराने त्याची पत्नी सुशीला हिच्यासाठी आपल्या हाताने विहीर खणून दिली. वस्तुतः सुशीला हिला पाणी आणण्यासाठी खूप दूरवर जावे लागत असे. पत्नीला होणाऱ्या यातना पाहून या गरीब मजुराने तिला भेटवस्तू देण्यासाठी अनोखी युक्ती शोधून काढली. आपल्या झोपडीजवळच त्याने एक विहीर खणली. दुरून पाणी आणण्याचे आपल्या पत्नीचे कष्ट त्याने अशा प्रकारे वाचविले. त्याचप्रमाणे गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहणारे विनोद पटेल यांनी प्राणाहून प्रिय पत्नी रिताचा जीव वाचविण्यासाठी आपली किडनी दान केली. विनोद यांनी आपल्या लग्नाच्या 23 व्या वाढदिवसानिमित्त पत्नीला किडनीचे दान दिले. रिता यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उपचार सुरू आहेत. प्रेमात लोक काहीही करू शकतात… खिसा भरलेला असला तरी आणि रिकामा असला तरी!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक आहेत)