
>> आशुतोष बापट
डॉ.गो. बं. देगलूरकर हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते मूर्तिशास्त्राचा गाढा अभ्यासक असलेलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. वारकरी संप्रदायामध्ये जन्म झालेल्या सरांचं व्यक्तिमत्त्वदेखील सौम्य, शांत आणि अत्यंत अभ्यासू असंच आहे. ‘मूर्तिशास्त्र व मंदिर स्थापत्य यांचा चालताबोलता ज्ञानकोश’ असं सरांना म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. मूर्तिशास्त्र या काहीशा चाकोरीबाहेरील विषयावर सरांचं असलेलं प्रभुत्व, त्या विषयावर सरांची असलेली निष्ठा आणि सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा सहज समजेल अशा शैलीमध्ये हा विषय समजावून सांगायची सरांची हातोटी केवळ अवर्णनीयच म्हणायला हवी. या विषयाचा अभ्यास करताना विद्यार्थ्याने त्यातल्या तांत्रिक गोष्टी तर शिकायलाच हव्यात, परंतु प्रत्येक मूर्तीमागे काही एक तत्त्वज्ञान आहे, काही विशिष्ट हेतू आहे तो समजावून घेणं जास्त गरजेचं असतं असं सर कायम सांगतात. मंदिरावर आपल्याला विविध प्रतिमा पाहायला मिळतात. त्या नेमक्या कशासाठी कोरल्या असतील, त्यांचं तिथे असण्याचं प्रयोजन काय आहे या गोष्टी देगलूरकर सर आपल्या रसाळ वाणीने जितक्या लीलया समजावून देतात तितक्याच सुंदर रीतीने सरांनी शिवमूर्तये नमः, विष्णुमूर्ती नमोस्तुभ्यं, वेरुळ, मार्कंडी, खिद्रापूर या आपल्या विविध पुस्तकांतून या मूर्तींची आणि मंदिरांची वर्णने केलेली आहेत.
या विषयावर सरांचं व्याख्यान ऐकणं किंवा त्यांच्याबरोबर एखादं मंदिर बघायला जाणं यासारखी दुसरी कुठली पर्वणी नाही. प्रत्येक मंदिर, त्यावरील प्रत्येक मूर्ती सर मनापासून समजावून सांगतात. खरं तर अशा वेळी सर एका वेगळ्याच विश्वात असल्याचा भास होतो. त्यांच्या अंगात एक विलक्षण उत्साह संचारलेला असतो आणि त्या मूर्तीच्या अथवा मंदिराच्या शिल्पकारांप्रति अत्यंत आदर, प्रेम, कौतुक या साऱया गोष्टी सरांच्या डोळ्यांत दिसतात. त्या शिल्पकारांचं ते वारंवार कौतुक करतात. त्यांच्या कल्पकतेला कायम दाद देतात आणि त्या अनामिक कलाकारांपुढे नतमस्तक होतात.
सरांनी नुकतंच 85 व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, पण बोलतानाचा त्यांचा उत्साह, त्यांची तळमळ तरुणांना लाजवणारी आहे. घारापुरी, अजिंठा-वेरुळ इथल्या लेणी, तसंच मराठवाडय़ातली अनेक मंदिरं सरांबरोबर पाहण्याचा योग आला. दिवस दिवस उभं राहून प्रत्येक मूर्तीमधले बारकावे समजावून सांगताना सरांच्या अंगात कुठली शक्ती संचारते ते केवळ त्या विठ्ठलालाच ठाऊक ! या वयातसुद्धा अत्यंत तल्लख असलेली त्यांची स्मरणशक्ती हा खरंच कुतूहलाचा विषय आहे. एखाद्या मंदिरात ते बसले असतील तर सहज सांगतात की, ‘अरे, असं करा. त्या पश्चिमेच्या भिंतीत जे देवकोष्ठ आहे ना त्याच्याखाली अमुक एक प्रतिमा आहे. पाहून या ती, मग मी त्याची कहाणी सांगतो.’’ आणि त्यानंतर सरांची वाग्वैजयंती अखंड प्रवाहित होते. असे प्रसंग अनेकदा घडतात. ‘मराठवाडा’ हा तर सरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सरांचा जन्म मराठवाडय़ातला आणि सरांची पीएचडीसुद्धा ‘कल्चरल हिस्टरी ऑफ मराठवाडा विथ स्पेशल रेफरन्स टू द ओल्ड मॉन्युमेंटस्’ या विषयावरची. मराठवाडय़ामध्ये मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी सर त्याकाळी सायकलवरून फिरले. मिळेल त्या ठिकाणी राहिले आणि अतिशय तुटपुंजी साधनं असतानासुद्धा या मंदिरांचा बारकाईने अभ्यास केला. अन्वा, निलंगा आणि औंढय़ा नागनाथ ही त्यातली सरांची विशेष आवडीची मंदिरं. या ठिकाणी गेलं की सर देहभान हरपतात. त्या कलाकृती पाहताना त्यांची वाणी बहरते. मराठवाडय़ात व्याख्यान देताना सर आवर्जून सांगतात की, तुम्ही मागासलेल्या भागात राहता असं समजू नका. सातवाहन, राष्ट्रकुट व यादव या प्रबळ राजसत्तांची राजधानी मराठवाडय़ातच होती. आजही महाराष्ट्रात सर्वाधिक शिल्पसमृद्ध मंदिरं मराठवाडय़ातच आहेत. तुम्ही पुढे या, त्यांचा अभ्यास करा आणि मराठवाडय़ाचं हे वैभव जगासमोर आणा, असं प्रत्येक वेळी सर आवर्जून सांगतात.
कुठलीही गोष्ट समजावून सांगताना ज्ञानेश्वरी, दासबोध यामधले तसेच पुराणांमधले दाखले देऊन समोरच्याला ती गोष्ट पटवून देणं ही सरांची हातोटीच आहे. त्यांच्या तोंडून चुकूनसुद्धा कोणाबद्दल वाईट शब्द बाहेर पडत नाहीत. एखाद्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत तर सर एवढंच म्हणतात की, ‘त्याच्या आणि माझ्या विचार करण्यात फरक आहे.’ बस्स, एवढंच. बाकी काही नाही. देगलूरकर सर म्हणजे प्रत्येक मूर्तीमागे तत्त्वज्ञान शोधणारं, ते उलगडून सांगणारं, त्यासाठी विविध दाखले देणारं असं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. जो जो माणूस त्यांच्या संपर्कात आला तो त्यांचाच झाला असं हे प्रसन्न निगर्वी व्यक्तिमत्त्व ! घारापुरीच्या लेणीमध्ये अर्धनारीश्वराची प्रतिमा दाखवताना सर म्हणतात, ‘शिव आणि शक्ती यांचं तादात्म्य पावलेलं हे रूप आहे. दोघंही खरं तर एकच आहेत, पण आपल्याला समजावं म्हणून शिल्पकारांनी ते अशा रूपात दाखवलंय.’ मूर्तिशास्त्र म्हणजेच देगलूरकर सर आणि देगलूरकर सर म्हणजेच मूर्तिशास्त्र. मूर्तिशास्त्राशी तादात्म्य पावलेलं ही देखणं रूप एकमेकांत इतकं भिनलंय की, त्या दोघांना आपण वेगवेगळं नाहीच करू शकत.




























































