दिल्ली डायरी – ‘रिटायर्ड हर्ट’ येडियुरप्पाः भाजप ‘हर्ट’ होणार!

>> नीलेश कुलकर्णी 

भाजपचे कर्नाटकातले दिग्गज नेते येडियुरप्पा यांनी राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राजकारणातूनरिटायरहोण्याचा निर्णय जाहीर करून खळबळ उडवून दिली आहेयेडियुरप्पांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्यावररिटायर्ड हर्टहोण्याची वेळ दिल्लीकर मंडळींनी आणल्याची चर्चा आहे. 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींना सत्तेत आणणे एवढेच आपले इतिकर्तव्य आहे, असे येडियुरप्पा सांगतात, मात्र तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत काहीही बोलत नाहीत, यातच सगळे आले. येडियुरप्पारिटायर्ड हर्टझालेले असले तरी त्यामुळे भाजपच विधानसभेच्या निवडणुकीतहर्टहोईल, असे दिसते.

भाजपमध्ये सध्या येडियुरप्पांच्या नाकदुऱ्या काढण्याचे उद्योग सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत खुर्चीसाठी धडपडत असलेल्या येडियुरप्पांसाठी पीयूष गोयल यांनी पहिल्या रांगेतली आपली खुर्ची त्यागली होती. हे सगळे ताजे असतानाच येडियुरप्पांनी अचानकपणे राजकीय निवृत्तीची घोषणा करून भाजपची गोची केली आहे. वास्तविक, कर्नाटक जिंकण्यासाठी दिल्लीकर मंडळींनी सगळय़ा गोष्टी नियोजित पद्धतीने करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राबरोबरच्या सीमावादाला दिल्लीतूनच पद्धतशीरपणे फोडणी दिली जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी कर्नाटकसाठी ‘मदतीची कावेरी’च बहाल केली आहे! भरीस भर म्हणून वोक्कलिग समाजाची मते मिळावीत यासाठी कोणाच्या स्मरणात नसलेले माजी काँग्रेसी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र येडियुरप्पांनी रिटायरमेंट जाहीर करत या सगळय़ांवर पाणी फेरले आहे. चिरंजीव विजयेंद्रच्या राजकीय भवितव्याबाबत कोणतीही ‘कमिटमेंट’ न मिळाल्यामुळे येडियुरप्पांनी ही चतुर राजकीय चाल खेळल्याचे मानले जात आहे. कर्नाटकातील लिंगायत समुदायाचे येडियुरप्पा हे सर्वोच्च नेते आहेत. बोम्मईंना मुख्यमंत्री करून या समाजाला खूश करत येडियुरप्पांना काटशह देण्याचा दिल्लीकरांनी प्रयत्न केला असला तरी बोम्मई मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव होईल आणि त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, अशी भाकिते वर्तविण्यात येत आहेत. तेथील सत्ता टिकविणे भाजपसाठी कठीण झाले आहे. अर्थात, दुसरीकडे काँग्रेसमध्येही सत्ता येण्यापूर्वीच सिद्धरामय्या विरुद्ध डी. के. शिवकुमार यांच्यात परंपरेनुसार ‘कलगीतुरा’ रंगला आहे तर देवेगौडा खानदानातही आलबेल नाही. अशा परिस्थितीत कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे. त्या स्थितीत येडियुरप्पा म्हणतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती राहू शकते. त्यामुळे येडियुरप्पांना ‘रिटायर्ड हर्ट’ करण्यात आले असले तरी ते पॅव्हेलियनमध्ये बसून भाजपचा टांगा पलटी करू शकतात. बघूया काय होते ते.

हवा बडी खराब चल रही है

देशभरात भाजप सरकारविरोधात वातावरण असले तरी हे वातावरण ईव्हीएममध्ये काही परावर्तित होत नाही आणि त्याचा राजकीय पटलावर फारसा परिणाम होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. घटना हरयाणातील गोहानामधली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘जन उत्थान’ वगैरे ठेवणीतले नाव त्या सभेला दिले गेले होते. आता खुद्द अमितभाईच येणार असल्यामुळे सगळेजण तयारीला लागले. हरयाणात या वेळी कडाक्याची थंडी आहे, अशा स्थितीत गर्दी जमवायची तर ‘बिडीपाण्या’ची सोयही आलीच. ती करण्यासाठी भाजपला वेगळी यंत्रणा कामाला लावावी लागली. जेवणाचा टिफीन, पैशासह ‘बिडीकाडी’ देऊनही भाजपची गावागावांत गेलेली वाहने रिकामी परतायला लागल्यानंतर मात्र अशा कडाक्याच्या थंडीतही मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह स्थानिक नेत्यांना घाम फुटला. काही केल्या गर्दी काही जमा होत नाही. आता अमितभाईंना काय उत्तर देणार? त्यांचा पारा वगैरे चढला तर? या सगळय़ा परिस्थितीत मनोहरभाईंनी सगळे अवसान गोळा करून, ‘‘अमितभाई भीड तो नही जमा हो रही है,’’ अशी आपबिती सांगितली. संतापलेल्या अमितभाईंनी, ‘‘फिर रॅली कॅन्सल करा दो. हवा खराब है ये कारण बता दो, मैं फोन पर रॅली को संबोधित करूंगा,’’ असे उत्तर दिले. त्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांचा जीव भांडय़ात पडला. पुढे अमितभाईंनी ‘‘खराब हवा होने के कारण आप लोगों से मैं मिल नही पाया, इसलिए मैं क्षमा चाहता हूं…’’ वगैरे सांगत मोबाईल सभा पूर्ण केली. भाजपविरोधात जनमानसांत प्रचंड वातावरण आहे. गोहानाची ही ‘मोबाईल सभा’ हे त्याचे प्रतीक मानायला हरकत नाही.

खासदार, पत्रकारांनी करायचे काय?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले खरे, मात्र खासदार व पत्रकारांच्या मागचे दुर्दैवाचे दशावतार काही संपण्याचे नाव नाही. मध्यंतरी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा फॉर्मात असताना सरकारकडून कोरोनाची पुडी सोडण्यात आली होती. त्यामुळे काही काळ घबराटही निर्माण झाली होती. या यात्रेच्या मार्गात खोडा घालण्यासाठी खेळलेली ती खेळी होती, मात्र आता ‘भारत जोडो’ यात्रा संपवून राहुल दिल्लीत परतले आहेत. कोरोनाही नाही. तरीही संसदेत प्रवेश करण्यासाठी पत्रकारांना अनेक अग्निदिव्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या लाडक्या एजन्सीज आणि निवडक वृत्तपत्रे सोडली तर इतरांना टाकीचे घाव सोसावे लागत आहेत. लोकसभेप्रमाणेच राज्यसभा सचिवालयानेही आता ‘लॉटरी सिस्टिम’ अवलंबली आहे. त्यामुळे संसदेत प्रेस गॅलरीतील प्रवेश ही पत्रकारांसाठीच ‘एक ब्रेकिंग’ न्यूज कम लॉटरी बनली आहे! एकीकडे पत्रकाराचे हाल होत असताना, खासदार महोदयही त्यातून सुटलेले नाहीत. लोकसभेत दहा-बारा लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा खासदारांना आपल्या पाहुण्यांसाठी दिवसाकाठी फक्त दोनेक पासेस देण्यात येत आहेत. त्यामुळे आठ-दहा जणांच्या घोळक्याने दिल्ली पाहण्यासाठी आलेली मतदारसंघातील मंडळी खासदारांनाच दूषणे देऊन मोकळी होत आहेत. दिल्लीत आल्यानंतर किमान संसद भवन पाहावे, ही लोकांची स्वाभाविक भावना असते. त्यासाठी स्थानिक खासदार मदतही करतात, मात्र नियमच असे विचित्र बनविण्यात आले आहेत की, खासदारांना नसत्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचा बागुलबुवा अजून किती दिवस? असा उद्विग्न सवाल केला जात आहे.

[email protected]