
>> नीलेश कुलकर्णी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन महिन्यांत तब्बल आठ वेळा कर्नाटकच्या भूमीला पाय लावले आहेत. अमितभाईदेखील वेगवेगळ्या मठ-मंदिरांमध्ये परिक्रमा करत आहेत. दोघेही मेहनत घेत आहेत. इतके सगळे करूनही कर्नाटक हातून जाण्याची चिन्हे आहेत. देवेगौडा सुपुत्र कुमारस्वामी कर्नाटकात ‘किंगमेकर’ बनावेत व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुढचे ‘सत्ताकारण’ करण्याचा आता भाजपचा डाव आहे. पुढे काय होते ते दिसेलच!
कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. 11 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल आणि 13 मे रोजी निकाल जाहीर होतील. ओपिनीयन पोल वगैरेच्या अंदाजावरून कर्नाटकात काँग्रेसचे सरकार बहुमताने सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकात भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर दिल्लीकरांनी येडियुरप्पांना हटवून त्यांनीच दुसऱ्या पक्षातून भाजपात आणलेल्या बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले. येडियुरप्पांच्या नाराजीचे धुमशान तेव्हापासून सुरू आहे. त्याची जबर किंमत भाजपला मोजावी लागेल अशीच चिन्हे आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून येडियुरप्पांची खुर्ची घालवली गेली खरी, पण त्यानंतरचे सध्याचे कर्नाटक सरकार ‘40 परसेंट कमिशन सरकार’ म्हणूनच नावारूपाला आलेले आहे. भाजपाई आमदार रोख पैशांची लाच घेताना सापडत आहेत. बोम्मईंचे कसलेही नियंत्रण सरकारवर राहिलेले नाही. अनागोंदी व भ्रष्टाचाराच्या दलदलीत सापडलेल्या भाजप सरकारला अंतर्गत कलहाने घेरलेले आहे.
येडियुरप्पांची ‘नाराजी’ दूर करण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवेळी दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी ‘पीयूष’ असे सुनावत येडियुरप्पांसाठी पहिल्या रांगेतील खुर्ची रिकामी करायला लावली. एरवी कोणाच्या घरी वगैरे न जाणारे पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा येडियुरप्पांच्या घरच्या चकरा मारत आहेत. येडियुरप्पांचे चिरंजीव विजयेंद्र यांच्या हस्ते बुके वगैरे स्वीकारत आहेत. ही अगतिकता आहे. कर्नाटकातील भ्रष्टाचार व अनागोंदीपासून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अमितभाईंनी बोम्मईंना महाराष्ट्राविरोधात बोंब मारण्याची तसेच सीमावासीयांच्या भावना दुखावण्याची खुली सूट दिली होती. ती बोंबही कर्नाटक भाजपच्याच अंगाशी आली आहे.
बसवराज बोम्मई यांचे वडील कर्नाटकचे मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट आहे. एस. आर. बोम्मईंनी तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची उघड मागणी दिल्लीतील सत्ताधाऱ्यांकडे केली होती. मात्र त्यानंतरच्या काळात भाजपने बोम्मई चिरंजीवांना ‘पवित्र’ करून नुसते भाजपात घेतले नाही, तर राज्याचे नेतृत्व त्यांच्या हाती दिले. इतर राज्यांत जसे आयात नेतृत्व लादले गेले तसाच प्रकार कर्नाटकात घडला. येडियुरप्पांवर भलेही भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी कर्नाटकात त्यांनी सायकलवर फिरून भाजप रुजवला. देवेगौडा भलेही पंतप्रधान झाले, मात्र कर्नाटकातला सर्वात मोठा ‘मास लीडर’ येडियुरप्पाच राहिले व अजूनही आहेत. येडियुरप्पांचा दिल्लीकरांनी अपमान केल्याने लिंगायत समाज नाराज आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी लिंगायत व वक्कलिंगांना आरक्षणाचे गाजर दाखवून चुचकारण्याचा प्रयत्न झाला आहे खरा, मात्र त्याने फारसा फरक पडेल असे दिसत नाही. बी. एल. संतोष विरुद्ध येडियुरप्पा वादाने कर्नाटकात भाजपचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे सिद्धरामय्यांसारखा कार्यक्षम नेता असणे ही काँगेससाठी जमेची बाजू आहे. सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार या ‘दोन तलवारी’ एकाच म्यानात मल्लिकार्जुन खरगे कशा पद्धतीने ठेवतात, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत. सर्वार्थाने योग्य असूनही खरगे कधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत ही खंत अजूनही त्यांच्या मनात आहे. कर्नाटकात काँग्रेसला रोखायचे असेल तर कुमारस्वामींना बळ द्या, असे भाजपचे धोरण आहे. कुमारस्वामी किंगमेकर झाले तर भाजपचे फावणार आहे. ईडी, सीबीआयने आजवर देवेगौडा कुटुंबीयांवर दाखविलेली ‘माया’ हे यामागचे कारण आहे. काँग्रेसला हे ‘दुहेरी आव्हान’ पेलावे लागणार आहे. भाजपच्या हातून ‘कर्नाटक तो गयो’ हे आजचे वातावरण आहे. बघू या पुढे काय घडते!
गुन्हेगाराची ‘लाईव्ह’ यात्रा
गेल्या आठवडय़ात देशापुढचा जीवनमरणाचा प्रश्न होता तो अतिक अहमद. गँगस्टर, माजी खासदार असलेल्या अतिकची साबरमती ते प्रयागराज यात्रा देशातील तमाम मीडियाने रंगवून सांगितली, दाखविली. ‘वरून’ आदेश असल्याने जाहिरात संपली रे संपली की, अतिकची अपडेट असायची. ‘अतिक की गाडी पलटी भी हो सकती है…’ अशी भाकिते मीडियावाल्यांनी अतिकची कुंडली मांडून आणि विकास दुबे प्रकरणाचा दाखला देऊन मांडायला सुरुवात केली होती. दुबेचा एन्काऊंटर केल्यानंतरही ब्राह्मण व्होट बँक कुठेही जाणार नाही, हा भाजप नेतृत्वाला तेव्हा विश्वास होता. तसेच घडले. अतिकची ‘केस’ तशी नाही. 2024 च्या निवडणुकीपर्यंत अतिक हा दिल्लीकरांसाठी ‘सेट’ आहे. हिंदू-मुस्लीम अशी पह्डणी या मुद्दय़ामुळे मिळणार आहे. अतिक आणि त्याच्या झुपकेदार मिश्या हे आबालवृद्धांपर्यंत कुतूहलाचे कारण बनविल्याबद्दल जनतेने पेंद्रीय सरकारचे आभार मानायला हवेत. राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल यांच्या बाजूने जे वातावरण देशभरात निर्माण झाले होते, त्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘साबरमती ते प्रयागराज’ ही अतिकची ‘लाईव्ह यात्रा’ दाखविण्यात आली. अतिकचा प्रवास विमानाने दोन तासांतही उरकता आला असता. मात्र त्याला ‘25 तासांचे कव्हरेज’ मिळवून दिले गेले. गमतीचा भाग म्हणजे हेच अतिक महाशय तुरुंगवास झाल्यानंतर प्रयागराजवरून साबरमतीला जाताना मात्र विमानानेच उडून गेले होते.
रिजिजू यांची ‘पोपटपंची’
किरेन रिजिजू हे देशाचे कायदामंत्री आहेत हे माहीत असण्याचे कारण म्हणजे न्यायव्यवस्था व संसद यांच्यात संघर्ष कसा उभा राहील याकडे ते जातीने ‘लक्ष’ देऊन आहेत. देशातील बहुतांश निवृत्त न्यायाधीश हे देशविरोधी विचारांचे आहेत, विशिष्ट विचारसरणीचे आहेत, असे विधान करून रिजिजू यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. रिजिजू यांच्या या विधानाविरोधात आता देशातील नामांकित अशा तब्बल सवातीनशे वकिलांनी एक पत्र लिहिले असून रिजिजू यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी त्यात केली आहे. निवृत्त न्यायाधीशांबद्दल विधाने करून रिजिजू सरकारविरोधात कोणीही बोलू नये, अशी धमकीच न्यायपालिकेसह देशाला देत आहेत, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. कपिल सिब्बल, अभिषेक सिंघवी, दुष्यंत दवे, इंदिरा जयसिंह, अरविंद दातार या नामांकित वकिलांचा या पत्राचारामध्ये समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपात अचानकपणे आलेल्या व केंद्रीय मंत्री झालेल्या रिजिजू यांना 2014 पासून ‘राष्ट्रवादा’चे भलतेच धुमारे फुटलेले आहेत. वरच्या आदेशानुसार ते न्यायव्यवस्थेचे मनोधैर्य खच्ची होईल, अशी विधाने बेफामपणे करत सुटले आहेत. आता देशातील नामांकित वकिलांनीच त्यांच्याविरोधात दंड थोपटल्याने पुढे काय होते हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.



























































