सिडनी कसोटीत हिंदुस्थानचे शौर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

रहाणेचा हिंदुस्थानी संघ वेगळा संघ आहे. त्या संघात फार मोठी नावे नाहीत. विक्रमादित्य नाहीत. पण पाच छोटी बोटं एक झाली की मूठ तयार होते. 36 ऑल डाऊननंतर ती तयार झाली. ती आता वज्रमूठ वाटते. रहाणेचा संघ हा राजपूत राणा सांगासारखा आहे. राणा सांगाने 80 जखमा अंगावर झेलल्या. तो निकराने लढला आणि शेवटी कोसळला.

हिंदुस्थानी संघाने राणा सांगाप्रमाणे जखमा झेलल्या. पण शेवटी आपल्या पायाने तो पॅव्हेलियनमध्ये परतला पुन्हा पुढच्या कसोटीत लढण्यासाठी. शौर्य तेच… निकाल वेगळा.

कित्येक वर्षांनी मी दोन फलंदाज कसोटी सामना वाचवण्यासाठी इंच इंच लढताना पाहिले. खरं तर खराखुरा कसोटी सामना पाहिला. जो दोन्ही संघांची ‘कसोटी’ घेऊन गेला आणि सरतेशेवटी त्याने रामशास्त्राr बाण्याने न्याय केला – अनिर्णित.

वनडे आणि टी-20च्या संस्कृतीत वाढलेल्या फलंदाजांना मॅच वाचवणारी फलंदाजी जमत नाही. ते तंत्र, ते टेम्परामेंट, ती वृत्ती त्यांच्याकडे नाही, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. ते खरंही आहे. हनुमा विहारी आणि आर. अश्विन या दोन फलंदाजांनी बेली, हटन, हनीफ मोहम्मद किंवा सुनील गावसकर यांना अभिमान वाटावा अशी ती वृत्ती दाखवली. बेली सोडला तर इतर नावं ही महान फलंदाजांची आहेत. पण लढण्यासाठी महान गुणवत्ता लागतेच असं नाही. जिद्द आणि छाती लागते. पूर्वी घडय़ाळावर लक्ष ठेवून फलंदाजी करावी लागे. या दोघांनी षटकांवर लक्ष ठेवून फलंदाजी केली.

विहारी 161 आणि अश्विन 128 इतक्या चेंडूंच्या आगीतून चालले. त्यांचे पाय भाजले. शरीरावर फोड आले. पण मन घट्ट होतं. डोपं बर्फालाही हेवा वाटावा असं शांत होतं. म्हणूनच एखाद्या योग्याप्रमाणे निखाऱयावरून चालत जाऊ शकले.

माझं मन वेगात 60 वर्षं मागे गेलं. 1960 साली ऑस्ट्रेलियात एक मालिका झाली होती. वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया. त्याला टाय टेस्ट मालिका असंही म्हटलं जातं. अॅडलेडवर मकाय आणि क्लाईन या ऑस्ट्रेलियन जोडीने शेवटच्या विकेटसाठी 101 मिनिटांची भागीदारी करून आणि 283 चेंडू खेळून तो कसोटी सामना वाचवला होता. पण त्या वेळेला वेस हॉलने बाऊंसर्स टाकले नव्हते. कारण तो अकरावा फलंदाज होता. इथे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी अश्विनला फोडून काढलं. अंगावर चेंडूचे काळे-निळे डाग घेऊनच तो फलंदाजी करत होता. पण अश्विन हा काही टेल एंडर नाही आणि आजच्या युगात टेल एंडरला तरी कुठे सोडतात? हिंदुस्थानी संघाच्या जखमा काही दुर्दैवी होत्या आणि काही स्वतःच्या चुकीने झालेल्या.

हिंदुस्थानी संघ टॉस हरला. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी केली. पण हिंदुस्थानी संघाला झालेली ही जखम स्वतःच्या चुकीमुळे झाली. यष्टिरक्षक पंतने महत्त्वाचे झेल सोडले. मग स्मिथचा एक झेल लेग गलीमध्ये सुटला. पहिल्या कसोटीत त्याला अश्विनने लेग ट्रपमध्ये बेडिंग घट्ट बांधावा तसा बांधला होता आणि त्याच्यावर प्रचंड दबाव टाकला होता. या कसोटीत त्याने टिपिकल महान ऑस्ट्रेलियन फलंदाजाप्रमाणे दबाव झुगारला. आक्रमण केले. त्याला आणि लाबुशेनला जीवदान देणं म्हणजे मोहम्मद घोरीला जीवदान देणं होतं. दोघांनी त्याचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला आकार आणला. तरीही नंतर जाडेजाच्या एका स्पेलने आणि त्याने स्मिथला धावचीत करण्यासाठी केलेल्या थ्रोने ऑस्ट्रेलियन फलंदाजीच्या गंडस्थळावर अंकुश ठेवला.
हिंदुस्थानी फलंदाजीची सुरवात पहिल्या डावात चांगली झाली. पण पुजाराने केलेली अतिसावध फलंदाजी नडली. इसापनीतीत कासव जिंकलं म्हणजे प्रत्यक्षात नेहमीच कासव जिंकतंच असं नाही. सर्व ससे झोपा काढत नाहीत. पुजाराच्या फलंदाजीमुळे इतर फलंदाजांवर दबाव आला. नको तो फटका खेळताना रहाणे बाद झाला आणि मग धावा धावायच्या प्रयत्नात तीन फलंदाज धावचीत झाले. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशी हिंदुस्थानी संघाची परिस्थिती झाली. कारण पंत आणि जाडेजा उसळत्या चेंडूवर जायबंदी झाले. हिंदुस्थानी ड्रेसिंग रूमचं रूपांतर हॉस्पिटल वॉर्डमध्ये होतंय असं वाटायला लागलं.

सिडनीची खेळपट्टी अतिशय मंद होती. म्हणजे ती ऑस्ट्रेलियन रक्ताची वाटतच नव्हती. किंबहुना जसजसे दिवस पुढे सरकले तशी ती आणखीन तरतरीत झाली. त्याचा फायदा दोन्ही संघांना दुसऱया डावात झाला. ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला जिंकण्यासाठी 407 धावांचं टार्गेट दिलं. ते देताना त्यांनी स्वतःला भारतीय संघाला बाद करण्यासाठी चार सेशन्स मिळतील हे पाहिलं. त्या वेळी सर्वांनाच हिंदुस्थानी संघाच्या अंगावरच्या जखमा दिसल्या. मन किती घट्ट आहे, डोपं किती शांत आहे हे इतरांना कळलं नाही. अलीकडे माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज पाँटिंगची जीभ त्याच्या बॅटपेक्षा जास्त आक्रमक झालीय. तो ऑस्ट्रेलियाला मॅच देऊनही मोकळा झाला होता.

पण हिंदुस्थानी संघाच्या डोक्यात वेगळेच विचार होते. साहिर लुधियानवीने म्हटलंय, ‘रात कितनी भी हो संगीन, सुबह उतनी ही रंगीन होगी.’ हिंदुस्थानी संघाला साहिर लुधियानवी माहीत आहे की नाही, मला माहीत नाही. पण साहिर हे जे आशावादी तत्त्वज्ञान सांगून गेला तेच हिंदुस्थानी संघाने आत्मसात केलेलं आहे, असं त्यांची फलंदाजी बघताना वाटलं.

हा रहाणेचा संघ दात घशात घालण्यात तज्ञ आहे. 36 ऑलडाऊननंतर त्याने टीकाकारांच्या घशात दात घातलेच आणि इथे पाचव्या दिवशी घातले. मुळात शर्मा, गिल यांनी चौथ्या दिवशी संध्याकाळी चांगली सुरवात करून दिली. पाचव्या दिवशी सकाळी रहाणे पटकन गेल्यावर कोसळायला हिंदुस्थानी संघाला केवढी मोठी संधी उपलब्ध होती. एका बाजूला पुजाराने तंबू ठोकला होता आणि पहिल्या डावापेक्षा अंमळ जास्त आक्रमक खेळत होता. नाथन लायनला पुढे जाऊन तो खेळला. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी त्याने एकेरी धावाही घेतल्या. पण दुसऱया बाजूने तर फलंदाजी कोसळायला समर्थ होतीच की! बरोबर त्याच वेळी टीम मॅनेजमेंट एक मास्टर स्ट्रोक खेळली. पाचव्या क्रमांकावर डावखुरा पंत फलंदाजीला आला. तो डावखुरा असणं हे महत्त्वाचं होतंच. पण त्यापेक्षाही महत्त्वाचा होता त्याचा अप्रोच. पहिल्या 5 धावा काढताना त्याने 34 चेंडू घेतले. तो सेटल झाला आणि मग ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर तुटून पडला. मुख्य म्हणजे त्याने लाथन लायनची पिसं काढली. कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला लाथन लायनकडून अपेक्षा जास्त होत्या. कारण चेंडू फिरावा, चेंडू उसळावा, चेंडू वळावा ही अपेक्षा होती. पण त्याने लाथन लायनवरच जबरदस्त दबाव टाकला आणि आक्रमक क्षेत्ररचना ढिली करून टाकली. तिथे कुठे तरी ऑस्ट्रेलियाच्या मनात मॅच हरण्याची भीतीसुद्धा निर्माण झाली असावी. पण दुर्दैवाने 97वर पंत त्याच्या नेहमीच्या पद्धतीने बाद झाला. शहाण्या फलंदाजाने तीन धावा संयमाने काढून शतक केलं असतं. पंत जेवढा शूर होता तेवढा नशीबवानसुद्धा होता. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जीवदानं दिली होती. कर्णधार टीम पेनने तीन झेल सोडून ती उधारी परतफेड करून टाकली. ऑस्ट्रेलियन संघाकडून इतक्या गोड वागणुकीची अपेक्षा कधीच नसते. पुजारा गेल्यावर जिंकण्याची आशा संपली. मॅच वाचवणंसुद्धा फारसं सोपं नाही, याची जाणीव त्या वेळेला सर्वांना झाली. कारण जाडेजा पॅड लावून बसला असला तरी तो जायबंदी होता हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. तो कितपत फलंदाजी करेल याची कल्पना नव्हती. आणि नंतर होते कोण? दुरी, तीरी आणि चौका… पण हनुमा विहारी आणि अश्विनने ऐतिहासिक भागीदारी केली. मॅच वाचवतानासुद्धा स्ट्राईक फिरता ठेवणं, हे बऱयाचदा बरं असतं. कारण गोलंदाजांना प्रत्येक वेळेला एक वेगवेगळा विचार करावा लागतो. यांनी बरोबर उलटे डावपेच केले. त्यांनी धावा नाकारल्या आणि एक बाजू प्रत्येकाने खेळून काढली. मकाय आणि क्लाईन भागीदारीतसुद्धा त्यांनी 15 षटपं तसं केलं होतं. अश्विन आणि विहारीने जवळजवळ 20पेक्षा जास्त षटपं ते डावपेच वापरले. विहारीने वेगवान गोलंदाजी स्वतःच्या अंगावर घेतली आणि अश्विन ऑफ स्पिन असा खेळला की लाथन अश्विनच्या बॅटच्या आज्ञेप्रमाणे चेंडू टाकतोय. विहारीला अर्थात धावा घेणंही नंतर नंतर कठीण होतं. कारण त्याचा पाय दुखावला होता. हळूहळू तांबडं फुटलं… मग अंगावर कोवळं किरण आलं आणि सूर्य माथ्यावर आला होता. ते विजयाचे किरण नव्हते. पण ते असे किरण होते की ड्रॉ मॅच जिंकल्याचा भास झाला. मकाय आणि क्लाईनच्या ऐतिहासिक भागीदारीने ऑस्ट्रेलियाला मॅच वाचवून दिली होती; पण त्या वेळेला क्लाईनचा गोलंदाज म्हणून चांगला परफॉर्मन्स झाला नव्हता. त्यामुळे पुढच्या आणि शेवटच्या कसोटीत मेलबर्नला त्याला टीममधून वगळून बारावा गडी ठेवलं होतं. विहारीबद्दल हिंदुस्थानी संघ काय डिसिजन घेतो हे पहायला मला आवडेल.