तेरी आवाज ही पहेचान है!

3167

>> शिरीष कणेकर

अनेक संगीतकार आले आणि गेले… अनेक गायिका आल्या आणि गेल्या… लता होती तिथेच आहे.. ध्रुवपदासारखी अढळ, दीपगृहासारखी मार्गदर्शक… गंगाजलासारखी पवित्र! असा भाव नाही, जो तिने गाऊन व्यक्त केला नाही… असा देव नाही, जो तिच्या कंठातून गात नाही… असा माणूस नाही, ज्याचे कर या नादब्रह्माच्या साक्षात्कारापुढे जुळले नाहीत…

या पलीकडे जाऊन मी आता तिच्याविषयी नव्यानं काय लिहिणार आहे? ‘आवाज कुणाचा? – लता मंगेशकरचा’ अशी आरोळी आम्ही वर्षानुवर्षे मारत आलो आहोत.
‘म्हातारा झालो हो, दीदी.’ मी अलीकडेच तिला फोनवर म्हणालो.
‘तुम्ही?…मग माझं काय?’ ती उद्गारली.
‘अहो, तुमच्या आवाजाने तुम्हाला ‘आवाजी’ बहुमताने तरुण ठेवलं. तुमची गाणी ऐकण्याइतपत कान शेवटपर्यंत शाबूत राहावेत एवढीच या क्षणाला मागणी आहे. लई नाई मागणं.’
‘काय होतंय हो तुम्हाला?’ तिनं आस्थेनं विचारलं. तिच्या स्वरातील कळवळय़ानं मला गलबलून आलं. मी स्वतःला फार एकटा समजतो. माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात नाना पाटेकरनंही माझ्या एकटेपणाचा ओलाव्यानं उल्लेख केला होता. लताची सोन्यासारखी गाणी माझ्याभोवती फेर धरून बागडत असताना मी माझ्या संपन्न गोतावळय़ात असतो; मग आडमुठय़ा अट्टहासानं मी स्वतःला एकटा का म्हणवून घ्यावं? हा तिच्या गाण्यांचा व तिचा अवमान नाही का? अनेकदा मला वाटत आलंय की कुणी विचारलं की तुम्ही काय करता, तर अभिमानानं छाती ठोकून सांगावं – ‘मी लताची गाणी ऐकतो.’
चाळीस वर्षांपूर्वी नव्हाळीतल्या उमाळय़ानं मी ‘यादों की बारात’ या माझ्या सदरात ‘तेरी आवाज के सिवा इस दुनिया में रख्खा क्या है’ या शीर्षकाखाली लिहिलेला मजकूर आजही न कोमेजता मला खुणावतोय. तुमच्या परवानगीनं तो सादर करतो.

28 सप्टेंबर 1929 रोजी एका गंधर्वलोकीच्या दैवी स्वरानं पृथ्वीवर अवतार घेतला. गवयाची पोर. तिनं जन्मल्यावर टाहो फोडला नसेल, एखादी नाजूक लकेर छेडली असेल. ‘कोहं?’ असा सवाल पुसणारा आक्रोश न करता ‘मी आल्येय हं!’ अशी करोडो कानसेनांना दिलासा देणारी लाजवट सुरावट पेश केली असेल. आईबापांची काय पुण्याई असते, ज्यामुळे प्रत्यक्ष देव आवाजरूपानं त्यांच्या अंगणात बागडतो?

बाप म्हणाला, ‘पोरी, तुझ्या गळय़ात गंधार आहे.’ बापाच्या पश्चात पोरगी हेलावून गायली, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला.’ सज्जाद हुसेन म्हणाला, ‘लता गाती है, बाकी सब रोते है.’ लता त्याच्याकडे गायली, ‘वो तो चले गये ऐ दिल, यादसे उनकी प्यार कर.’ अनिल विश्वास म्हणाला, ‘लता या क्षेत्रात आली आणि आम्हाला देवदूत आल्यासारखं वाटलं. लता त्याच्याकडे देवदूतासारखीच गायली, ‘बदली तेरी नजर तो नजारे बदल गये.’ मदन मोहन म्हणाला, ‘लहानपणी ज्योतिषानं माझं सर्व भविष्य अचूक सांगितलं होतं. पण लता मंगेशकर नावाचा दैवी आवाज तुझ्याकडे गाईल हे नाही सांगितलं.’ लता मदनकडे गायली, ‘अब गमको बना लेंगे जीने का सहारा.’ लताच्या थट्टामस्करीनं कातावून गुलाम महंमद एकदा म्हणाला, ‘लताजी हंसीये मत. ठीक तरहसे गाईये.’ मग लता गायली, ‘दिल देके सनम तुम्हे पछताए हम.’ एस. डी. गेंगाण्या आवाजात व बंगाली ढंगात लताला पुकारायचा आणि लता गायची, ‘रोते रोते गुजर गयी रात रे.’ सी. रामचंद्र धुंद चाली बांधायचा आणि लता ऊर फुटून गायची, ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये.’ पंजाबी आणि बंगाली संगीतकारांच्या गोतावळय़ात के. दत्ता हा मराठमोळा माणूस लताला वडिलकीच्या अधिकारात बोलावून घ्यायचा आणि मग लता म्हणायची, ‘बेदर्द जमाने से शिकवा न शिकायत है.’

मोगरा तिच्या गळ्यात फुललाय. त्या कोणा लवंगिकेचं लटपट लटपट चालणं तिच्या अवखळ जिभेनं नेमकं टिपलंय. ‘मालवून टाक दीप’ असं आर्जव करणाऱ्या मीलनोत्सुक रमणीची अधीरता तिच्या आवाजातून जाणवलीय. ‘साजन की गलियाँ छोड चले’ हा निषाद तिच्या स्वरातून पाझरलाय. ‘सावरी सुरत मन भायी रे पिया’ हा लाजरा आनंद तिच्या सुरातून ठिबकलाय. ‘तारे वही है, चाँद वही है, हाय मगर वो बात नही है’ ही व्यथा तिच्या तोंडून साकार झालीय. ‘बेचैन करनेवाले तू भी न चैन पाये’ हा भंगलेल्या हृदयाचा तळतळाट व ‘कोई किसीका दीवाना न बने’ ही पोळलेल्या अंतःकरणाची उपरती तिच्या अजोड कंठातून वेदनेसारखी ठणकत आलीय. ‘दिले बेकरार सो जा, अब तो नही किसीको तेरा इंतजार सो जा’ हा रडवा, अश्रूपूर्ण ‘गिला’ तिनं केलाय. ‘बनायी है इतनी बडी जिसने दुनिया, उसे टूटे दिल का बनाना न आया’ ही बोचरी विसंगती दुखऱ्या आवाजात तिनं दाखवून दिल्येय.

केवळ हिंदी चित्रपटांपुरतं बोलायचं तर 1947 साली वसंत जोगळेकरांच्या ‘आपकी सेवा में’मध्ये दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताचा स्वर प्रथम उमटला. त्यानंतर गुलाम हैदरनं ‘मजबूर’मध्ये या दोन शेपटेवाल्या, कृश पोरीचा आवाज घेतला. जोहराबाई अंबालावाला, अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम या मातब्बर गायिकांना डावलून गुलाम हैदरनं या घाटी पोरीला गायला लावलं याचं फिल्मी दुनियेला उपहासात्मक आश्चर्य वाटलं. पण अशा एखाद्या अद्भुत आवाजाची देणगी मिळावी व नसीम बानूसारख्या बेसूर नायिकेला गायला लावताना कर्तृत्वाला जखडून टाकणाऱया शृंखला तटातट तुटाव्यात म्हणून परमेश्वराची करुणा भाकणारे खेमचंद प्रकाश, ज्ञानदत्त, हंसराज बहेल, के. दत्ता, श्यामसुंदर, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, बुलो सी. रानी आणि नौशाद यांच्यासारखे अभिजात संगीतकार खडबडून जागे झाले. ‘आयेगा आनेवाला’नं जाणकार थरारले. ‘चुप चुप खडे हो’नं लताचा आवाज झोपडी झोपडीतून पोहोचवला. तो आजतागायत तिथून बाहेर पडलेलाच नाही. अनेक संगीतकार आले आणि गेले. अनेक गायिका आल्या आणि गेल्या. लता होती तिथंच आहे. ध्रुवपदासारखी अढळ, दीपगृहासारखी मार्गदर्शक, गंगाजलासारखी व पवित्र! ‘गाये लता, गाये लता’ हे गाणं एकावन्न साली ती के. दत्तांसाठी गायली. त्यातला आशय तिनं सहीसही आचरणात आणलाय…

असा भाव नाही, जो तिनं गाऊन व्यक्त केला नाही. असा देव नाही, जो तिच्या कंठातून गात नाही. असा माणूस नाही, ज्याचे कर या नादब्रह्माच्या साक्षात्कारापुढे जुळले नाहीत. आज मी ठाम ठरवून लिहायला बसलोय की लताच्या अवीट गोडीच्या अविस्मरणीय गाण्यांची जंत्री द्यायची नाही. (यादी द्यायला ती काय वाण्याची यादी आहे?) होतं काय की एक गाणं दिलं की पाठोपाठ दुसरं गाणं आपसूक येतं. मग तिसरं. मग चौथं. हा सिलसिला चालूच राहतो. अमर संगीताचा माहोल निर्माण होतो. रसिक वाचक मोहोरून येतात. धुंदफुंद होतात. त्यांची संगीतसमाधी लागते ते लतामय होतात. माहीत नसलेली गाणी ऐकण्याची मनाशी खुणगाठ बांधतात. मग त्यांना असे भास होतात की, आपल्याला लेख बेहद्द आवडलाय. माय फुट, आवडलाय. त्यांना लताची गाणी आवडलेली असतात. मला फुकटचं श्रेय मिळतं. असो.

मी समग्र लता ऐकलीय असं मला वाटत असताना एखादं लताचं अफलातून गाणं माझ्या कानी पडतं व माझं गर्वाचं घर खाली होतं. उदाहरणार्थ, बाबूजी सुधीर फडके यांचं ‘रत्नघर’मधलं ‘ऐसे है सुख-सपन हमारे’ लतानं ते चौसष्ट वर्षांपूर्वी गायलं होतं. ‘हैद्राबाद की नाजनीन (1952) मधील हे वसंत देसाईंचं लताचं लाजवाब गाणं तसं मी अलीकडेच ऐकलं आणि वेडावून गेलो. काय गायलंय बाईनं! काय त्या हरकती, मुरक्या, आलाप, पुन्हा एकदा मला माझ्या लेखणीचा थिटेपणा जाणवतोय. आस्वाद घेण्यात व त्याला शब्दरूप देण्यात आपण फारच कमी पडतोय या विचारानं मनाला क्लेश होतात. बघा, गाणंच सांगायचं राहिलं. मन कुठं थाऱयावर आहे? – ‘जाओ, चमका सुबह का सितारा, फिर जुदाईने आ के पुकारा’… मी सावरतो स्वतःला. नाहीतर पुन्हा लताच्या अजरामर गाण्यांची जंत्री सुरू व्हायची. काय शिंचा त्रास आहे? लतामय होण्यापूर्वी मी चांगला शहाणासुरता होतो.
संगीतकाराची करामत व त्याच्या गाण्यात लतानं ओतलेली जान यांचं विश्लेषण करायला मी असमर्थ आहे. ती माझी कुवत नाही. ‘कागा रे’मध्ये विनोद व लतानं काय गंमत केल्येय याची मीमांसा न करता येताही जर मला ते बेहद्द आवडत असेल तर तेवढं मला पुरेसं आहे. मला मिळणारा कुंडलिनी जागृत करणारा संगीतानंद समधर्मींबरोबर वाटून घेणं मला आवडत आलंय. लतानं आम्हाला एका रज्जूनं बांधून ठेवलंय. लताविषयी हा भक्तिभाव काही लोकांना खटकतो. का खटकतो? देवळात जाणाऱयाकडून भक्तिभाव सोडून कोणता भाव अपेक्षित असतो? लताचा आवाज तुम्हा एकटं व एकाकी राहू देत नाही एवढी एक गोष्ट मनात तिच्याविषयी श्रद्धा निर्माण करायला पुरेशी नाही का? ‘लता व दिलीपकुमार यांना शिरीष कणेकरांनी मोठं केलं’ असा अप्रतिम आरोप एका वाचकानं केला होता. चंद्र व सूर्य मी निर्माण केले, हे म्हणायचं तो विसरला.
एकदा मी कुठल्याशा गाण्याचा संगीतकार तिला विचारला. तिला पटकन आठवेना. गाणंच आठवेना. (हे सहसा होत नाही.) ‘तुम्ही चाल म्हणून दाखवा. म्हणजे लगेच आठवेल मला.’
‘भ्रम आहे हा तुमचा.’ मी म्हणालो, ‘मी कोणाची नक्कल करीत नसतो. कुठलंही गाणं मी माझ्या चालीत गातो.’
मी लतासमोर गाण्याची संधी सोडायला नको होती, असं माझ्या मुलीचं मत पडलं. पण त्यानंतर मला धक्के मारून घरातून बाहेर काढण्यात आलं असतं हे तिला कुठे माहीत होतं? बरं, बाहेर पडून शेजारच्या घरात आसरा शोधावा तर तिथं साक्षात आशा भोसले राहते. ‘जाये तो जाये कहाँ?’
‘दीदी, तुम्ही करण दिवाणबरोबरही द्वंद्वगीत गायलात. मग माझ्या बरोबर का गात नाही?’ मी विचारले.
‘गाऊया की’ लता म्हणाली, ‘लोकांना सुरात कसं गातात हे तरी कळेल.’
आचरटासारखं बोलल्यावर शालजोडीतले खावे लागतील एवढं तरी मला कळायला हवं होतं. पण शहाणपणाबद्दल मी कधीच प्रसिद्ध नव्हतो. लतानं कुठला गुण माझ्यात पाहिला देव जाणे. ती एकदा मला म्हणाली, – ‘मी तिघांनाच फोन करून गप्पा मारते. राजसिंगजींची वहिनी, गुलझार व तुम्ही.’
माझी अक्षरशः वाचा बसली. या बहुमानाचं मी काय करू हेच मला कळेना. वाटलं रफीला बोलावून गायला सांगावं – ‘बहोत शुक्रीया, बडी मेहेरबानी.’
‘हॅलो.. मी लता बोलत्येय…’ हा टेलिफोनवरच्या लतावर मी लेख लिहिला. तो प्रसिद्ध झाल्यावर आमचं टेलिफोनवर बोलणं झालं.
‘लेखात काही खटकलं का तुम्हाला?’ मी सावधपणे विचारले. ‘काय?’
‘काय असं नाही.’ मी जास्त सावधपणे म्हणालो, खटकण्यासारखं काय असू शकतं हे ती माझ्याकडूनच काढून घेऊ इच्छित होती. मी गळाला लागलो नाही.
मग तीच दिलखुलासपणे म्हणाली, ‘तुम्हाला काय हो, लिहा दडपून. कोण विचारायला बसलंय?’
‘हा काय काँप्लिमेंट म्हणायचा?’ माझा प्रश्न तिच्या खळखळून हसण्यात विरून गेला. ‘लोटा इज लोटा!’ असं आमचा बंगाली फोटोग्राफर म्हणाला होता ते मला नेहमीच आठवत असतं.
लताला जवळची माणसं लांब जाऊ नयेत हे जपण्याची विलक्षण हातोटी आहे. कार्यक्रमात वगैरे सगळय़ांशी बोलणं सर्वथा अशक्य असतं. पण एखादा कटाक्ष, एखादं मंद स्मित, एखादं वाक्य समोरच्याची जिंदगी बनवून टाकते. ‘दीनानाथ’ नाटय़गृहात ती कशाला तरी आली होती. तिच्याभोवती गर्दी होती. मी लांब भिंतीला टेकून गंमत बघत उभा होतो. एकाएकी तिनं खुणेनं मला बोलावलं. मी गेलो.
‘तो स्वतःला अमिताभ बच्चन समजतोय तो कोण आहे हो?’ तिनं कुजबुजत्या आवाजात विचारलं. मी हसलो. तिचा हेतू साध्य झाला. मी तिच्या गोतावळय़ातला होतो या भावनेनं माझ्या काळजाला ठंडक पोहोचली होती. कोणाची टिंगल करायला तिला मी योग्य वाटलो होतो हेही खरंच. आता पुन्हा माझ्याकडे लक्ष देण्याची तिला गरज नव्हती.
ताडदेवला शशांक लालचंदच्या स्टुडिओत मी तिच्या रिहर्सलला गेलो होतो. तिथं सुरेश वाडकर, शब्बीर कुमार, अनिल मोहिले सगळे होते.
‘कुठलं गाणं म्हणावं मला कळत नाही.’ शब्बीरकुमार लताला म्हणाला.
‘का बरं?’ लता बोलली, ‘रफीसाहेबांचं एखादं गा. वर्षानुवर्षे तुम्ही तेच करत आलायत.’
शब्बीरचा पडलेला चेहरा बघावा लागू नये म्हणून मी त्याच्याकडे बघण्याचं टाळलं.
‘तिथं बसू नका हं.’ लतानं मोर्चा माझ्याकडे वळवला, ‘तिथं कोरसवाले बसतील. तिथं बसलात तर तुम्हाला गायला लागेल.’
‘गाईन की. भितो की काय!’ मी हुशारी दाखवत म्हणालो.
‘तुम्ही कशाला भ्याल हो; मी भिते.’ लतानं ‘नॉक् आऊट’ पंच टाकला. या वेळेला शब्बीरकुमारनं माझ्याकडे बघणं टाळलं असावं.

अफलातून विनोदबुद्धी
लताच्या गाण्याखालोखाल जर तिच्याकडे काही असेल तर ती तिची अफलातून विनोदबुद्धी.
‘वेस्टर्न आऊटडोअर’ला ‘लेकिन’मधल्या ‘मै एक सदीसे बैठी हूँ’ या लताच्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. एक कडवं पुन्हा रेकॉर्ड करायचं ठरलं. त्यात कडव्याचा शेवट होता – ‘सबको कुछ दे जाता है.’ गाता गाता लता त्या ओळीपाशी आली आणि म्हणाली, ‘लेकिन फर्नांडिस खाना खाता है…’ रेकॉर्डिंगला सन्नाटा पसरला. कोणाला काही कळेना. लताच्या मागे कोपऱयात डबा उघडून जेवत बसलेला कोणी फर्नांडिस दचकला. घाईघाईनं त्यानं डबा बंद केला.
‘आराम से – आराम से’ लता त्याला म्हणाली, ‘जेवणाची कधी घाई करायची नाही. सावकाश जेवा. मी थांबते. पाच-दहा मिनिटांनी काही फरक पडत नाही.’
झाला प्रकार कळल्यावर हास्यस्फोट झाला. सर्वांचं लक्ष वेधल्यामुळे फर्नांडिस नरमला, ओशाळला. त्याला तिथून निघताही येईना व लता समोर उभी असताना जेवताही येईना. मात्र लतानं त्याचं जेवण झाल्यावरच रेकॉर्डिंग सुरू केलं.
‘मध्यंतरी xxxx बाईंची तब्येत बिघडली होती.’ लतानं मला ‘गॉसिप’ पुरवलं. शेवटी ती माणूसच होती. बारा महिने, चोवीस तास लता मंगेशकर बनून जगणं कसं शक्य आहे? जिभेला कधीतरी चाकोरी सोडून वळवळावंसं वाटणारच. ऐकणाऱ्यावर मात्र मणामणाचं ओझं येतं. लताच्या विश्वासाला जागण्याचं कठीण काम त्याला करायचं असतं. ‘लता काय म्हणत होती, माहित्येय?’ असं वचा वचा बोलून आपण आतल्या गोटातील असल्याचं धादांत खोटं सत्य म्हणून मिरवत कॉलर ताठ करून फिरणारे जे कोणी असतील ते असतील. हम तो ऐसे नही है, भैया!
‘काय झालं बाईंना?’ मी विचारलं.
‘ब्लडप्रेशर, दुसरं काय होणार?’
‘का?’
‘अवघड – अवघड गाणी म्हणायला लागतात ना, म्हणून.’ आता मला बऱ्यापैकी कळायला लागलेला ‘लता-पंच’ अखेर आलाच.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या खलीद महंमदनं तिची न्यूयॉर्कमध्ये मुलाखत घेतली. त्यात त्यानं विचारलं, ‘करीअरच्या या स्टेजलाही तुम्हाला मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात का?’
‘हो तर. लागतात ना!’ लता म्हणाली.
‘उदाहरणार्थ?’
‘उदाहरणार्थ, तुम्हाला ही मुलाखत देणे.’ लतानं एक ठेवून दिली. हा भाग छापलेल्या मुलाखतीत मात्र नव्हता.
माझ्या मुलीच्या लग्नाला येऊन लतानं (आणि आशानंही) लग्नाला चार चाँद लावले. मी आभाराचे कृत्रिम शब्द पुटपुटत असताना ती म्हणाली- ‘अहो, असं काय करता? ती लहान असल्यापासून मला तिची ‘फ्रेंड’ म्हणत आलीय. मग फ्रेंडच्या लग्नाला जायला नको?’
माझी मुलगी आनंदानं रडली. लतानं तिला भेटवस्तू दिली. ‘नो प्रेझेंटस् आहे.’ माझी मुलगी म्हणाली. ‘मला चालतं,’ लता म्हणाली, आशानं तिच्या गाण्याचा आल्बम दिला. लता बोलली तेच शब्द आशाही बोलली – ‘मला चालतं.’
बरोबरच होतं. हे दुनियेचे नियम त्या दोघींना कसे लागू पडतील?
त्यांच्यापासून आमचं जग सुरू होत होतं. माझ्या मुलीला लतानं दिलेला फ्रॉक तिने जपून ठेवला व आता ती तो तिच्या मुलीला घालते. ‘हा लतानं दिलाय’ असं ती अमेरिकेतल्या हिंदुस्थानी लोकांना सांगते तेव्हा त्यांना वाटते की ही (बापाप्रमाणे?) फेकते आहे.

आवडती नावडती गीते
तुमच्या आमच्यासारखीच लताला स्वतःच्या गाण्यापैकी काही आवडती, काही नावडती असू शकतात, असं का कुणास ठाऊक मला कधी वाटलंच नव्हतं. परकरी मुलीनं सागरगोटय़ांवरून भांडावं त्या आविर्भावात ती बोलते तेव्हा धमाल येते. उदाहरणार्थ, तिला ‘असली नकली’मधलं आपल्याला आवडणारं ‘तेरा मेरा प्यार अमर’ आवडत नाही. का? ‘शीः मला ते दळण दळण्यासारखं वाटतं.’ ती नाक मुरडून म्हणते. अगं मावशे, पण तू काय भन्नाट गायल्येस ते, हे कोणी सांगायचं? ‘संगीता’मधील सी. रामचंद्रचं ‘नाउमीद होके भी दुनिया में’ तिच्या आवडत्या गाण्यात मोडत नाही हे कळल्यावर मला धक्का बसला होता. तिनं इतकं सुंदर म्हटलेलं सुंदर चालीचं गाणं तिला आवडत नाही? मग तिनं तिच्या नापसंतीचा रहस्यभेद केला, ‘ती चाल ओरिजिनल नाही. अण्णांनी वहाब या अरेबियन संगीतकाराची रेकॉर्ड माझ्या हातात ठेवली व सांगितलं की आपल्याला हे गाणं करायचंय. तेच ‘नाउमीद होके भी’ त्या गाण्याविषयी माझं मन थोडं कलुषित होणं स्वाभाविक नाही का?’ एकदा तिनं मला सामान्य वाटलेलं लक्ष्मीकांत-प्यारेलालचं ‘तकदीर’मधलं ‘सात समुंदर पार’ तिला आवडतं असं म्हणाली तेव्हा मी उडालो होतो.
‘हे आवडतं?’ मी उद्धटपणाच्या प्रांगणात पाऊल टाकत आगाऊपणानं बोलून गेलो.
‘मला स्वतःची आवडनावड असू शकत नाही का?’ तिनं चिडीला येत विचारलं. मी जीभ चावली. मी एखाद्या शाळूसोबतीबरोबर वाद घालत नव्हतो याचं भान मी विसरलो होतो. गाढवा, ती लता आहे लता, मी स्वतःला बजावलं.
तरीही एकदा मी तिला फोनवरून म्हणालोच, ‘कोणा कोणा संगीतकारांशी भांडलात हो तुम्ही? सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, एस. डी. बर्मन… आणखी कोण कोण?’
‘अहो, मी काय तुम्हाला भांडकुदळ वाटले का?’ तिनं उसळून विचारलं. वाघीण क्षमाशील मूडमध्ये आहे, ती एक पंजा मारून फडशा पाडणार नाही याची खात्री असल्यामुळे हा उंदीर बिनधास्त तिच्या आसपास बागडत होता. पण आपण उंदीर आहोत हे मी स्वतःला विसरून देत नव्हतो.

लताच्या हस्ताक्षरातील गाणी
माझ्या ‘गाये चला जा’च्या सुधारित तिसऱ्या आवृत्तीच्या (प्रकाशन 30 मार्च 1992) मुखपृष्ठावर व मलपृष्ठावर तिच्या हस्ताक्षरातील तिच्या सांकेतिक खुणा असलेली ‘अनाडी’तील दोन गाणी टाकली आहेत. त्यातील ‘वो चाँद खिला’वर कोपऱ्यात 3 डिसेंबर 1957 अशी तारीख आहे व 30 नोव्हेंबर 1957 अशी तारीख ‘बन के पंछी गाये’ या गाण्यावर आहे. 3 डिसेंबरच्या गाण्यावर ‘अनाडी’ असे चित्रपटाचे नाव लिहिलंय तर 30 नोव्हेंबरच्या गाण्यावर ‘मिसेस डीसा’ असं आहे. याचाच अर्थ तीन दिवसांत चित्रपटाचं नाव बदललं होतं. फोकस ललिता पवारवरून राज कपूरवर आला होता. गंमत आहे की नाही? कुठलंही गाणं गाण्यापूर्वी लता ते स्वतःच्या अक्षरात लिहून घ्यायची. म्हणूनच मला ही दोन गाणी मिळू शकली. आपण लताला पलंगाखालची ट्रंक काढायला लावली याची बराच काळ मला बोचणी लागून राहिली होती. आजही ते जीर्ण झालेले व फाटायला आलेले दोन कागद मी प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये जपून ठेवलेत. कुणाला पाहायचे असतील तर त्यानं बाहेरून व लांबून पाहावेत. तो अमूल्य ठेवा प्लॅस्टिकमधून बाहेर काढायचा नाही. कमसे कम जब तक मैं जिंदा हूँ…

(अर्थात ओ. पी. सोडून) झाडून सर्व संगीतकारांकडे ती गायल्येय. नुसतीच गायली नाही तर भरपूर गायल्येय. पण शंकर-जयकिशन तिचे खरे यारदोस्त होते. सवंगडी होते. तिने त्यांच्याकडे तब्बल 311 ‘सोलो’ गाणी गायली. गाणं, भांडणं, अबोला, समेट व त्यानंतर चौपाटीची भेल खाणं या चक्रातून त्यांचं नातं फिरत राहिलं. ‘फिल्मफेअर’ पारितोषिकात पार्श्वगायनाला मान्यता नाही या कारणास्तव लतानं पारितोषिक समारंभावर बहिष्कार टाकला.
‘तुला आमच्या आनंदात आनंद नाही का?’ जयकिशननं चिडून विचारलं.
‘आहे ना.’ लता म्हणाली, ‘प्रश्न तो नाही. संगीतकाराला जसं पारितोषिक असतं तसं पार्श्वगायकाला किंवा पार्श्वगायिकेला असायला नको का? मलाच द्या असं मी कुठं म्हणत्येय? कोणालाही द्या, पण द्याल की नाही? तुम्ही वास्तविक आमच्या हक्कांसाठी भांडायला पाहिजे. पण तुमच्या आनंदात आनंद मानून आम्ही आमचा अपमान विसरून स्टेजवरून तुमच्यासाठी गावं अशी तुमची अपेक्षा आहे. आमच्याशी तुम्हाला काही देणंघेणं नाही.’
शब्दानं शब्द वाढत गेला. तिरीमिरीत लता जयकिशनला म्हणाली, ‘तुम झाडू हो!’

मग अबोला, समेट फॉलोड बाय चौपाटीची भेळ!
एका होळीला ‘शास्कीन’चा पांढराशुभ्र सूट घालून शंकर व जयकिशन सकाळी सकाळी लताच्या घरी आले. दारातच तिनं त्यांच्या अंगावर रंगाचं पाणी बादलीतून ओतलं. त्यांच्या सुटाचा सत्यानाश झाला. त्यांचा त्या वेळचा चेहरा आठवून लताला आजही हसू लोटतं.
मुलाखती देण्यातलं तिचं इंटरेस्ट मागेच संपलंय. काही वर्षांपूर्वी ‘मसंद की पसंत’ या टीव्हीवरच्या कार्यक्रमात मसंदनं तिला विचारलं, ‘तुमची बहुतेक सगळी चांगली गाणी साठ सालानंतरचीच आहेत ना?’
लतानं कळेल न कळेल इतपत मान डोलावली. वाचा बसल्यावर ती तरी दुसरं काय करणार? पन्नास ते साठ या संगीताच्या सुवर्णकाळातील लताची अजरामर गाणी या तथाकथित समीक्षकाला माहीतच नव्हती. आपल्याला माहीत नाही हेही त्याला माहीत नव्हतं. मला वाटलं की तो तिथंच एकावन्न सालच्या ‘तराना’मधलं अनिल विश्वासचं गाणं गायला लागेल- ‘वो दिन कहाँ गये बता…’
‘अलीकडे मला मुलाखत देण्यातही स्वारस्य राहिलेलं नाही.’ ती माझ्याजवळ म्हणाली, ‘यांना ना संगीतात इंटरेस्ट ना जुन्या आठवणीत. येऊन जाऊन विचारणार काय, तर पांढरी साडी का नेसता, लग्न का नाही केलं, दारू पिता का, आशाशी संबंध कसे आहेत…’
आशाचं नाव निघालंय तो धागा पकडून मी विचारलं, ‘तुम्हाला आशाचं सर्वाधिक आवडणारं गाणं कोणतं?’
‘रोशनचं ‘दिल ही तो है’मधलं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ क्षणाचाही विलंब न लावता लता म्हणाली अन् लगेच ‘निगाहे मिलाने को’ गायला लागली.
मी श्वास रोखून धरला. लता माझ्या घरात कोचावर पाय दुमडून बसून मजेत आशाचं गाणं गात होती. लताच्या आवाजात प्रत्यक्ष समोर बसून आशाचं गाणं कोणी ऐकलंय? मी आणि फक्त मी. मला माझ्या डोळय़ांचा आणि कानांचा हेवा वाटला. हे नक्की खरंच घडत होतं ना? माझ्या नशिबात वाढून ठेवलेल्या दुःखांबद्दल देवाला दूषणे देताना या सुखाच्या व आनंदाच्या दैवी वर्षावासाठी मी त्या जगन्नाथाचं ऋणी राहायला नको का? अरे, दुःखं तर कोणालाच चुकलेली नाहीत, पण सुखाचा एवढा ठेवा कोणाच्या पदरात पडतो?
रुपारेल कॉलेजमध्ये आशा भोसलेच्या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमात एक अकलेच्या कांद्यानं तिला विचारले- ‘रात्री नीट झोप लागते का?’
हा प्रश्न मी लताला सांगितला तेव्हा ती म्हणाली, ‘मग आशानं उत्तर दिलं की नाही, की नाही येत झोप, तुम्ही रोज अंगाई गीत म्हणायला येत जा म्हणून? अकारण आशाला डिवचलं तर ती सुपडा साफ करील.’
लताविषयी कंड्या पिकवणाऱ्या वृत्तपत्रांनी भूतकाळात लताला भरपूर मनस्ताप दिला. (गेली अनेक वर्षे ती या सगळय़ाच्या पलीकडे गेल्येय.) का करतात ही माणसं असा उपद्व्याप? दुसऱ्याला किती त्रास होतो, मनस्ताप होतो, बदनामी होते याची त्यांना काहीच पडलेली नसते. दडपून लिहायचं व तमाशा बघत बसायचं…’
लतासकट सगळय़ा भावंडांना त्यांची आई माई मंगेशकरांचं विलक्षण कौतुक आणि अभिमान होता. लताच्या दिवाणखान्यात भिंतीवर माईंचं भलंमोठं ‘पोर्ट्रेट’ आहे. त्याच्याकडे बघत मी लताला म्हणालो, ‘तुमच्या माई तरुणपणी काय सुरेख दिसायच्या हो!’
‘मग?’ लताचा चेहरा अभिमानानं डवरला होता.
पण हीच माई कशावरून तरी रागावली की या भावंडांची पळापळ व्हायची. ‘कुःसंतान असण्यापेक्षा निःसंतान असणं चांगलं’ ती गरजायची. लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ म्हणजे ‘कुःसंतान’ बरं का!
‘अहो, ती डोक्यात राख घालून घर सोडून निघायची.’ आशा मला हसत हसत सांगत होती, ‘वर म्हणायची, तुम्हाला काय वाटतं, मी माझं पोट भरू शकणार नाही? तिची समजूत काढता काढता आमच्या नाकीनऊ यायचे. दीदीदेखील तिला थांबवण्यासाठी तिच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालायची तेव्हा कुठे माई आम्हाला क्षमा करायची. हा नाटय़प्रयोग अधून मधून व्हायचाच.’
‘लहानपणी माई आम्हाला जेवण्याच्या वेळेला कोणाकडे जाऊ द्यायची नाही.’ लता म्हणाली, ‘यांची परिस्थिती वाईट आहे. म्हणून आले जेवणाची वेळ साधून, असं कोणी म्हणू नये म्हणून!’ लताच्या डोळय़ांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.
लता आताशा सहसा घराबाहेर पडत नाही. (भगिनी मीना खडीकरनं तिच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनालाही ती गेली नव्हती.) तिला गरज काय बाहेर पडण्याची? प्रत्येक संगीतप्रेमींच्या मनात तिनं घर केलंय. या न्यायानं हिंदुस्थानात आणि बाहेर जगभरही तिचे किती फ्लॅटस् – आय मीन, घरं हो- झाली सांगा. सिकंदर तलवारीच्या बळावर व खूनखराबा करून जगज्जेता झाला होता. लता गळय़ाच्या बळावर व रसिकांच्या हृदयाला हात घालून जगज्जेती झाली. कोण मोठं? तिचा आवाज व तिची गाणी ही आमच्यासारख्या असंख्य पामरांच्या ‘जीने का बहाना’ आहे. तिनं रडवलंय व डोळेही पुसलेयत.
लता दीनानाथ मंगेशकर आज रोजी नव्वद पूर्ण झाली. तरीही आपण तिचा उल्लेख अरे-तुरेनंच करतो. आवाजाला काय माणसासारखं वय असतं? परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवणारा स्वर असा दिवसांच्या, महिन्याच्या आणि वर्षांच्या हिशेबात मोजायचा असतो? उद्या आईची माया किलोत मोजाल. पतिव्रतेची किंमत तिच्या गळय़ातील काळय़ा पोतीच्या दामावरून कराल. काळजातलं दुःख सेंटीमीटरमध्ये मोजाल. अश्रूंचं मोल लिटरच्या भावात कराल..?

मला नेहमी असं वाटत आलंय की, तिचा स्वर कानी पडत असताना माझा शेवटचा दिस गोड व्हावा. त्या वेळेला तीन-जास्त नाही, फक्त तीन-गाणी माझ्या कानावर पडावीत- विनोदचं ‘वफा’मधलं ‘कागा रे’, सज्जादचं ‘खेल’मधलं ‘जाते हो तो जाओ’ आणि श्यामसुंदरचं ‘आलिफ लैला’मधलं ‘बहार आयी खिली कलिया’! त्यानंतरही माझ्याकडे मिनिट-दोन मिनिट शिल्लक असेल तर तेवढं सी. रामचंद्रचं ‘शिनशिनाकी बुबलाबू’मधलं ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये’ लावा प्लीज…

लता आणि आशाचे मनोहर किस्से
लता आणि आशाचे काही मनोहर किस्से आहेत. त्यात दोन महान गायिका बोलत नसून दोन जिवाभावाच्या बहिणी बोलताहेत हे ध्यानात असू द्या. आशाची ‘माधुरी’ या हिंदी सिने-पाक्षिकात मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात तिनं म्हटलं होतं की आमची दीदी कधी कोणाला काही प्रेझेंट दिलं तर ते कदापि विसरत नाही. नेव्हर. त्यानंतर आशा एकदा लतानं दिलेली साडी नेसली होती. लतानं चष्मा खाली करून तिच्याकडे पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही.
‘दीदी, तूच दिलेली साडी आहे.’ आशा म्हणाली.
‘मला वाटलंच होतं. पण मी बोलले नाही, कारण तू मुलाखतीत सांगतेस.’ लता म्हणाली.
एकदा दोघी बहिणी एक द्वंद्वगीत गात होत्या. लता आशाच्या कानाशी लागून म्हणाली, ‘आशा, अर्धा सूर कमी लागलाय.’
‘मरू दे गं’ आशा म्हणाली, ‘त्या संगीतकाराचीही काही हरकत नाही. तू कशाला खुसपट काढतेस?’
‘तसं नाही,’ लता म्हणाली, ‘चकाकतं ते सगळं सोनं नसतं.’
एकदा लतानं आशाला अकस्मात विचारलं, ‘तू काय स्टेजवरून गाताना नाचतेस?’
‘‘नाही गं.’’ आशा चिवचिवली, ‘मी कसली नाचत्येय? उगीच जरा पाय थिरकवते.’
‘त्यालाच नाचणं म्हणतात.’ लता थंडपणे म्हणाली.
आशा लतासंदर्भात म्हणाली होती, ‘आम्ही दोघी दोन डोळय़ांसारख्या आहोत. जर एका डोळय़ात काही गेलं तर दुसऱयात पाणी येतं.’
एच. एम. व्ही.नं लताची साठी साजरी केली. आशानं मुळात भाषणासाठी नाव दिलं नव्हतं. पण ती आर. डी.सह आली व तिनं उत्स्फूर्त भाषण केलं. ती म्हणाली, ‘आजही माझ्या डोळय़ांपुढून ते चित्र हलत नाही. तिच्यापेक्षा मोठा असलेला तंबोरा घेऊन तिच्याच लांबसडक केसांवर बसून दीदी रियाज करत्येय. देवळाच्या गाभाऱ्यातील घंटानादासारखा तिचा स्वर माझ्या कानात घुमतोय…’ मी लताला भारावलेलं पाहिलं.
आशाला लताची नक्कल करायला सांगा. आधी ती पदर अंगभर लपेटून घेईल आणि मग सुरू. तिला दाद देण्यावाचून गत्यंतर नसतं. लताही नकलाकार आहे. एका संगीतकाराची (नावात काय आहे?) तिनं केलेली अफलातून नक्कल मी पाहिली आहे. कधी कधी मनात येतं की दोघींनी ‘लता-आशा मिमिक्री नाईट’ करायला हरकत नाही.

काही क्षणचित्रे
‘अनपढ’मधली ‘आपकी नजरों ने समजा’ ही गझल रेकॉर्ड केल्यावर मदन मोहन लताला मिठी मारून ढसढसा रडला होता. त्याचं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर पडत होतं.
लताबरोबरचं भांडण मिटल्यानंतर रफी उत्साहानं म्हणाला होता, ‘अब गाने में मजा आयेगा.’
‘नूरजहाँन हिंदुस्थानात राहिली असती तर लताला काही फरक पडला नसता. पण नूरजहाँनचं मात्र कठीण झालं असतं,’ असं तलत महेमूद पाकिस्तानात म्हणाला होता.
अमूक एक गाणं संध्या मुखर्जीकडून गाऊन घेतलं होतं का, असं विचारल्यावर विक्षिप्त संगीतकार सज्जाद हुसेन म्हणाला होता- ‘हम किसी संध्या या सुबह को नहीं जानते. हम सिर्फ लतासे गवा लेते है.’ तो लताचा उल्लेख प्रेमानं ‘मेरी काली कोयल’ असा करायचा.
‘रफी, किशोर, मन्ना डे वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर राज्य करतील. लता कोणाच्या लक्षात राहणार आहे?’ इति. शारदा ‘स्टारडस्ट’ मासिकात.

‘लता ही एकच गायिका अशी आहे की जिचा अर्धा सूरही कमीजास्त होत नाही’
– पुण्यातील सत्कारात ओ. पी. नय्यर

‘लता मंगेशकरला एवढी मोठी गायिका का मानतात माहित्येय? माझ्यासारख्या बेसुऱया गायकाबरोबरही ती सुरात गाते’
– मुकेश

‘कंबख्त कभी बेसुरीही नही होती.’
– बडे गुलाम अली खाँ

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या