आगामी- ओकेबोके ‘पुनर्वसन’ 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

‘रोहन प्रकाशना’कडून प्रकाशित होत असलेल्या लेखक अतुल देऊळगावकर यांच्या ‘आपत्तीपा… बोध किल्लारी भूकंपाचा’ या पुस्तकातील काही अंश.

म्हंनाया गेलं तर नगाला नग बराबर हाय. कवा बी वाटलं नव्हतं, येवडं घरात हाय. गाव बी मोटंलट झालंय. पर कशात बी जीव लागंना. अजूक बी ह्ये घर आपलं वाटंना. आपलं सोताचं घर असून त्ये काही जीव लावंना. भाइर गेलं तर गाव बी येगळंच वाटतंया. आपलं वाटंना. कायतर हरपलंय. कसं सांगावं? गावात बी करमना. येकूनमेकांशी भेटनं – बोलनं हुईना. आदी भांडनं ऱहायचे. श्या द्याचे. पर श्यानपन सांगनारे बी व्हते, आयकनारे बी व्हते. इसरनारे व्हते. समद्या परकारचे मानसं व्हते. पर त्ये गावपन व्हतं. गनगोत समदं आपलं हाय, जीव लावत्येत. पारावर बसा, देवळात बसा, कुटं बी बसा, मानसं दिसत व्हती. जाताळा येताळा धा-वीस मानसावांशी बोलल्याबगर म्होरं जात येत नव्हतं. कुनाचं कसं चाललंय, काय नड हाय समजित व्हतं. उदार-उसनं घ्येवं. पुना जमल तसं द्येवं असलं चालत व्हतं. पर आता नीट शेरावाणी जालंय. कुनाला बी टैम न्हायी. बोलाया येळ न्हायी. जवानकवा त्ये मोबायल! अडीअडचण बोलाया यीना. कुनि गेलं तर बी समजंना. गावात लैट हाय. टीवी हाय. रसता हाय. पर समदं काय असून आपलं नसल्यावानी वाटत होतंय. काय बी मना, गाव गावंच वाटंतना गेलंय.’

भूकंपग्रस्त गावातील मध्यमवयीन व वृद्धांच्या मनातील भावना अशीच आहे. त्यांना आपलं घरच आपलं वाटत नाही. आपलं गाव परक्यासारखं व अनोळखी वाटतंय. तीस वर्षांपूर्वी आलेल्या भूकंपानंतर केलेल्या ‘पुनर्वसना’तून तयार केलेल्या वस्तींनी सुमारे बावीस हजार घरांना तुटलेपणा दिला आहे.

किल्लारीतील संगीता भोसले यांचे पती संजय व धाकटी मुलगी शोभा भूकंपात दगावले. त्या स्वत: दहा फूट मातीच्या ढिगाऱयाखाली दबल्या गेल्या होत्या. चार महिने सोलापुरातील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यावर त्यांना काठी घेऊन चालणं शक्य झालं. त्यानंतर त्यांच्या हक्काची जमिनीतील वाटणी मिळू नये यासाठी सासरकडून तऱहेतऱहेचे अडथळे चालू झाले. भाऊबंदकीतील दमदाटी व धमक्यांनी बेजार पंचवीस वर्षांच्या संगीताबाईंनी माहेर गाठलं. लातूरच्या ‘नारी प्रबोधन मंच’ संस्थेने त्यांना शिवणयंत्र घेऊन दिलं. त्यामुळे त्यांनी शिवणकाम करत दीड वर्षाच्या संजयला वाढवलं. तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने खेटे घालून तीन वर्षांनंतर घराचा, तर वीस वर्षे उलटल्यावर तीन एकर जमिनीचा ताबा मिळवला. त्यांचं घर हा भिकार बांधकामाचा नमुना आहे. ‘वन बेडरूम – किचन’ धाटणीच्या खोल्यांच्या छताचं कीँट निघून गेल्यानं सळया उघडय़ा पडल्या आणि गंजून गेल्या आहेत. पावसाळ्यात छताखाली प्लास्टिक धरायचं आणि त्याखाली टोपल्या व बादल्यात पाणी गोळा करायचं, असा खटाटोप करत जगावं लागतंय. (किल्लारीतील बांधकामाचा ‘दर्जा’ ‘असाच’ होता हे बांधकाम करतानाच गावकरी वेळोवेळी लक्षात आणून देत होते. ‘गुणवत्ता नियंत्रण’  (क्वालिटी कंट्रोल) करणारे प्रशासन व कंत्राटदार यांच्यातील नातं ‘मधुर’ होतं. किल्लारीच नव्हे, तर अनेक गावांत अशी अवस्था आहे).

नवीन गावाबद्दल त्या म्हणतात, ‘आदी गावात समदे एकुनमेकांला भेटत व्हते. आता शेजारी येगळेच. गाव लइच मोटं जालं. मानसं भेटनं कटीन. शहरावानी समदे सदानकदा दारं लावून बसतेत. कुनी उसनं मागंना. देनंघेनं नाय न् काय बी नाय. तेच्यानं मनं फाकत गेलेत. कोनी बी कुनाला इचारना, पुसंना. समदे आपल्याच नादात. बोलायचं जालं तर मोबाइल.’

वीस वर्षांपासून द्राक्षबागेत छाटणी, खुरपणी, वेचणी अशी कामे करणाऱया सुनीता बाभळसुरे म्हणाल्या, ‘शेत गाठायचं म्हनलं तर जायला ईस रुपये आन् यायला बी तेवडेच. मालकाला हा खर्च उचलावा लागतो.’

शेतमजूर सरूबाई हुरमुंजे सांगतात, ‘अदुगर समदं गाव पायी चलता येत व्हतं. दवाखाना, शाळा कुटं बी जाता येत व्हतं. आता फटफटी नसता रिक्शा असल्याबिगर भागत नाही. गावात राहून बी गाटीभेटी न्हाइत.’ चाळीस वर्षांपासून द्राक्षाची बाग सांभाळणाऱया कर्तबगार शेतकरी कांताबाई सावंत म्हणाल्या, ‘भूकंपाआधी प्रत्येक घरातील बाई स्वयंपाक आटोपून बारा-एक वाजता शेताला जायची. नव्या गावापासून शेतं दहा-बारा कि.मी अंतरावर गेल्यामुळे आता कोणीही शेतात जाऊ शकत नाही.’

जगभरातील अनेक स्थलांतरितांना नवीन ठिकाणी येऊन पडल्यावर जुन्या खुणा न दिसल्यामुळे यातना होतात. किल्लारी परिसरातील भूकंप पुनर्वसितदेखील तशाच वेदना सहन करत आहेत. जुन्या घरातील व गावातील स्पेस ही वर्षानुवर्षे त्यांच्या सवयीची होती. त्या स्पेसमध्ये सुरक्षित ऊब होती. त्या घराशी व गावाशी जडलेलं जैविक व भावनिक नातं हा त्यांच्या जगण्याचा आधार होता. तो एकाएकी निखळून पडला. त्यांना नवीन घरातील स्पेस आपलीशी वाटत नाही आणि घराबाहेर पडल्यावर एका नजरेत दिसणारं गाव गायब होऊन तिथे दिसणारी ‘कॉलनी’ खुपत राहते. घरोब्याची व जवळिकीची नाती राहिली नाहीत हे मनात सलत राहतंय. त्यांची अशा नव्या जगाशी नाळ जुळतच नाही. सामाजिक जीवन अनेकांना अस्वस्थ करतंय हे पाहणाऱयाला सतत जाणवत राहतं. हे सारं त्यांना व्यक्त करता येत नाही. मात्र त्यांची जैविक लय (बायो रिदम) बिघडल्याची बेचैनी दिसते.

सास्तुरची अवस्था अशीच आहे. तिथले सामाजिक कार्यकर्ते दिवंगत असिफ मुल्ला ‘मन:स्थिती’ या कवितेत म्हणतात,

ना चैतन्य मनाला, ना राहिली श्रमशक्ती, 

उरली फक्त उद्ध्वस्त मन:स्थिती