
विवेक दिगंबर वैद्य <[email protected] >
कोकणातील सुप्रसिद्ध सिद्धसत्पुरुष ‘श्रीभालचंद्र महाराज’ यांच्या अवतारकार्याचा परिचय करून देणारा लेख.
किनारपट्टीचे निसर्गदत्त वरदान लाभलेला, नारळपोफळीच्या घनगर्दतेत दडलेला कोकण प्रांत म्हणजे जणू ‘ईश्वराचे देणे’. निसर्गाचा लोभसवाणा साज देहकायेवर वागविणाऱ्या कोकणपट्टीत अनेक संतरत्ने निर्माण झाली. पावस, रत्नागिरी, कुडाळ, दाणोली, कणकवली, वेंगुर्ला, राजापूर, पिंगुळी, बांदा, पालये आणि माणगावचा परिसर याच कारणाने आजमितीस ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून नावारूपास आला आहे.
कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रामुख्याने ओळखला जातो तो ‘मालवणी’ भाषा, गजाली, रुचकर जेवण तसेच ठेवणीतल्या शिव्या आदी वैशिष्टय़ांमुळे आणि ‘मालवण’प्रांताची आध्यात्मिक जाणीव टिकून आहे ती श्रीसाटम महाराज, श्रीभालचंद्र महाराज व श्रीराऊळ महाराज या संतश्रेष्ठांमुळे. यातील कणकवली परिसरास स्वतःची ‘ओळख’ मिळवून देणाऱ्या श्रीभालचंद्र महाराजांविषयी जाणून घेऊया.
दाणोलीच्या श्रीसाटम महाराजांचे कृपाप्राप्त सत्पुरुष श्रीभालचंद्र महाराज यांनी त्यांच्या अवतारकार्यात कधीही अवडंबराचे स्तोम माजू दिले नाही. अंगारे-धुपारे यांचे प्रस्थ वाढू दिले नाही तसेच स्वतःचा शिष्यपरिवारही निर्माण केला नाही तरीदेखील आध्यात्मिक जगतामध्ये आजमितीस श्रीभालचंद्र महाराज या विदेही सत्पुरुषास जी ओळख व मान्यता प्राप्त झाली आहे ती निव्वळ अलौकिक आहे.
‘नागडेबुवा’ किंवा ‘नागडे महाराज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीभालचंद्र महाराजांचा जन्म 8 जानेवारी 1904 रोजी झाला. ठाणे जिह्याच्या भिवंडी तालुक्यातील ‘पाया’ या लहानशा गावात राहणाऱ्या परशुराम ठाकूर या कुडाळदेशकर कुटुंबात जन्मलेल्या तेजस्वी बालकाचे ‘भालचंद्र’ असे यथार्थ नामकरण करण्यात आले. ही ठाकूर मंडळी मूळची वेंगुर्ल्याच्या ‘म्हापण’ गावची होती. परशुराम ठाकूर उदरनिर्वाहाच्या निमित्ताने भिवंडी येथे आले आणि व्यापारउदीम करीत स्वतःची वास्तू बांधून तेथेच कायमचे स्थायिक झाले. स्वभावाने साध्याभोळ्या आणि दिलदार वृत्तीच्या परशुरामभाऊंकडे पुढे गावचे ‘कुळकर्णी’पण येते झाले. पतीपत्नी दोघेही श्रीशंकराची निस्सीम उपासना करीत असत. घरी नित्य पूजाअर्चा होत असे. हेच संस्कार लहानग्या भालचंद्रावर आपसूकपणे झाले.
भालचंद्राला बालपणापासून परमेश्वराची ओढ होती. आजूबाजूच्या समवयस्क पोरासोरांना एकत्र करून तो सतत देवपूजा करीत असे. लहानमोठे दगड गोळा करून ते व्यवस्थित धुऊन पुसून त्यांना गंध लावणे, फुले वाहून पूजा करणे हे भालचंद्राचे लहानपणाचे खेळ होते. बालपण मजेत चालले होते तरीही, ‘सुखाच्या क्षणांमागे आमंत्रणाची वाट न पाहता दुःखाची मालिका यावी’ याचा प्रत्यय लहानगा भालचंद्र पुढे वारंवार घेता झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्यावर असलेले मातापित्याचे छत्र अवघ्या दोन वर्षांच्या फरकाने नाहीसे झाले. पहिल्या यत्तेत शिकणारा भालचंद्र पोरका झाला. त्या बिकट अवस्थेत भालचंद्राला त्याच्या चुलत चुलत्याने आपल्या गावी, म्हापण येथे आणले. भालचंद्राचे प्राथमिक शिक्षण म्हापण येथे व त्यापुढील शिक्षण ‘कोचरे’ येथे झाले. शिक्षणामध्ये बऱ्यापैकी प्रगती करणाऱ्या भालचंद्राला त्याची मावशी पुढे माध्यमिक शिक्षण देण्याच्या हेतूने मुंबईनजीकच्या वसई येथे घेऊन आली.
वसईच्या वाघ हायस्कूलमध्ये भालचंद्राचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. शिक्षणात लक्ष देणारा भालचंद्र व्यवहारात मात्र उदास राहात असे. आईवडिलांचा प्रेमळ सहवास न लाभल्याने त्याच्या आयुष्याला अपूर्णत्व आले होते म्हणून त्याने स्वतःला एकांतवासाची सवय लावून घेतली. तो फारसा कुणात मिसळत नसे. अन्य मुलांच्या थट्टामस्करीच्या विश्वात तो कधीच रमला नाही. भालचंद्राने स्वतःला परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये गुंतवून टाकले व मन प्रभुनामाच्या संगतीत तल्लीन होत गेले.
मॅट्रिकचे वर्ष भालचंद्राचे आयुष्य ढवळून काढणारे ठरले. अभ्यासात बऱ्यापैकी गती असतानाही मॅट्रिकच्या परीक्षेत दैवाने साथ दिली नाही आणि भालचंद्र नापास झाला. या धक्क्यातून सावरणे त्याला शक्य झाले नाही. वास्तविक पाहता मॅट्रिकचे अपयश जिव्हारी लागावे इतकी टोकाची परिस्थिती निर्माण झाली नव्हती तरीही आईवडिलांचा अकाली मृत्यू, उपकाराखाली राहणे, शिक्षणात अपयश येणे या सर्व गोष्टी एकत्र येऊन भालचंद्राचा मानसिक तोल बिघडवत्या झाल्या.
कालपरत्वे मनस्वी झालेला आणि अपयशाच्या गर्तेत खोलवर रुजलेला भालचंद्र वेडय़ासारखा वागू लागला. तहान-भूक विसरून उंच उंच झाडांच्या फांद्यावर तासन्तास गप्प बसू लागला. समाजात रूढार्थाने ‘समंजस’ म्हणून ओळखता येणारी ‘माणूस’पणाची खूण भालचंद्रामध्ये आढळेनाशी झाली त्यामुळे पंचक्रोशीत त्याची ओळख ‘वेडा भालचंद्र’ म्हणून होऊ लागली.
भालचंद्राचे मानसिक स्वास्थ्य परतावे याकरिता त्याच्या चुलत चुलत्यांनी त्याला घरी, म्हापण येथे आणल्, परंतु तेथेही भालचंद्र मूळ वृत्तीशी कायम राहिला आणि एकांतमग्न राहता झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मुखी सदैव नामजप मात्र चालू असे. भावनेच्या भरात तो वारंवार घरातून पळून जात असे आणि घरची मंडळी त्यास पकडून आणीत असत. मात्र कालांतराने भालचंद्राने घरातून कायमचे पलायन केले.
वर्षभर रानावनातून, काटय़ाकुटय़ांतून कोकणप्रांत पालथा घालणारा भालचंद्र अचानक कोल्हापूर येथे आला. गारगोटीनजीक आठेक मैलांवरील नितवडे गावी भालचंद्राचे काका सीताराम ठाकूर राहत असत. एकेदिवशी भालचंद्राची स्वारी काकांच्या घरासमोर उभी राहिली. भालचंद्राची अवस्था काकांना कर्णोपकर्णी ठाऊक असली तरी प्रत्यक्षात त्याला समोर पाहून काकांना भडभडून आले. फाटलेले कपडे, अवास्तव वाढलेल्या दाढी-मिशा, केसांच्या जटा या अवतारातील भालचंद्राला काकांनी सर्वप्रथम कडक पाण्याने धुऊन काढले आणि त्याची दाढी व केस भादरून त्यास पूर्वपदावर आणले. आश्चर्य म्हणजे पुढे काही महिने भालचंद्र व्यवस्थित वागू लागला. घरच्या मंडळींच्या मनातील मोठी चिंता नाहीशी झाली, मात्र हा भ्रम काही काळच टिकला कारण भालचंद्र पुन्हा एकदा तेथून नाहिसा झाला.
या अवधीत भालचंद्र कोकणात सर्वत्र फिरला. रोज कित्येक मैल पायपीट करणारा भालचंद्र भ्रमंतीत सुख मानू लागला. ऐन पंचविशीत स्वतःमध्ये, कुणालाही न ओळखता येण्याइतपत बदल घडविणारा भालचंद्र एकदा रात्री अचानक झोपेतून जागा झाला आणि मोठमोठय़ाने ‘श्रीराम जय राम जय जयराम’ या त्रयोदशोक्षरी मंत्राचा जप करू लागला.
(उर्वरित पुढील अंकात…)




























































