मंथन – वायुप्रदूषण आणि मानवी अस्तित्व

डॉ. मधुकर बाचूळकर

‘आयक्यू एअर’ या स्वित्झर्लंडमधील संस्थेने ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट‘ म्हणजेच जागतिक वायू गुणवत्ता अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये वायुप्रदुषणामुळे हिंदुस्थानचे 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जगातील सर्वात प्रदूषित देशांमध्ये हिंदुस्थान आठव्या स्थानावर असल्याचे हा अहवाल दर्शवतो. हवा प्रदूषणात घट न झाल्यास भविष्यकाळात पृथ्वीतलावर जगणेही अशक्य होईल आणि 2100 सालापर्यंत मानवाचे अस्तित्वच नष्ट होईल, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. यानिमित्ताने वायुप्रदूषणाचा विस्तृत आढावा घेणारा लेख.

पृथ्वीची निर्मिती 4.54 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यापासून झाली. सुरुवातीला पृथ्वी एक जळणारा तप्त गोळा होता. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या उष्ण वायूमुळे पृथ्वीभोवती वातावरण निर्मिती होऊ लागली. त्या वेळी पृथ्वीच्या वातावरणात फक्त कार्बन डायऑक्साईड, आर्द्रता (पाण्याची वाफ) आणि धूलिकण होते. पर्यावरणातील आर्द्रतेमुळे पृथ्वीचे बाहेरील कवच हळूहळू थंड झाले. त्यामुळे पाण्याची वाफ थंड होऊन पाणी तयार झाले आणि पृथ्वीवर सागर, महासागर तयार झाले. तप्त पृथ्वी थंड होऊन जमीन (माती) तयार झाली. बहुपेशीय सजीवांची निर्मिती सुमारे 580 ते 500 दशलक्ष वर्षांपासून सुरू झाली असे मानतात. बहुपेशीय वनस्पती प्रजाती 500 दशलक्ष वर्षांपासून पृथ्वीतलावर तयार होऊ लागल्या. पृथ्वीवर सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी मानवी वंशाचे पूर्वज प्राणी निर्माण झाले. आधुनिक मानवी वंशाचे पूर्वज तीन ते दोन लाख वर्षांपूर्वी निर्माण झाले. आधुनिक प्रगत मानव 30 हजार वर्षांपूर्वी निर्माण झाला. मानव निर्मितीनंतर सुमारे 1900 सालापर्यंत हवेचे प्रदूषण अगदीच नगण्य होते. त्यानंतर 1950पर्यंत हवेचे प्रदूषण चिंताजनक नव्हते; पण औद्योगिक क्रांतीच्या नवीन धोरणानंतर (1991) आणि जागतिकीकरणानंतर प्रदूषणाचा वेग वाढीस लागला आणि हरितगृह वायूंचे आणि मानवनिर्मित वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले. वातावरणातील वायूंचे विविध घटक आणि त्यांचे प्रमाण वातावरणात 78 टक्के नायट्रोजन, 21टक्के ऑक्सिजन असून कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन व इतर सर्व वायूंचे प्रमाण फक्त एक टक्का आहे. कार्बन डायऑक्साईड 0.038 टक्के असून हायड्रोजनचे प्रमाण 0.00005 टक्के इतके आहे. मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, अॅरगॉन, निऑन, हेलियम, क्रायप्टॉन, झिनॉन, कार्बन मोनॉक्साईड, हेलॉन, क्लोरोफ्लुरोकार्बन, हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन असे वायूही वातावरणात आहेत. सीओ2, सीएच 4 आणि एनटूओ या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. जागतिक तापमानवाढीसाठी हरितगृह वायू जबाबदार आहेत.

वायुप्रदूषण अनेक प्रकारे होते. औद्योगिक प्रकल्प, विविध प्रकारचे औद्योगिक कारखाने, विकास प्रकल्प, औष्णिक प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प, मोटार, वाहने, विमाने, रेल्वे, विविध यंत्रे, युद्ध, महायुद्ध, खाणकाम प्रकल्प, घरगुती इंधन ज्वलन, वीटभट्टी, गुऱहाळे, फटाके फोडल्याने, शेकोट्या पेटविल्याने, कचरा व पाचट जाळल्याने, औषधे-कीटकनाशके फवारण्या केल्याने, वणवे (जंगल वने, गवताळ कुरणे, शेतातील कचरा पेटविल्याने) इ. अनेक कारणांमुळे हवेचे प्रदूषण होते. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही वायुप्रदूषण होते. बांधकामे व घरे पाडताना, रस्ते प्रकल्प, खाणकाम प्रकल्प, वादळे यांमुळेही धूळनिर्मिती होऊन हवेचे प्रदूषण होते. कोणतीही वस्तू जाळल्याने कार्बन डायऑक्साईड तयार होतो. पेट्रोल, डिझेल, केरोसीन यांसारख्या खनिज तेलांच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर  डायऑक्साईड यांसारखे वायू वातावरणात मिसळतात आणि हवा प्रदूषित होते.

पूर्वीच्या काळात हवा प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत अल्प होते; पण नंतरच्या काळात लोकसंख्येत मोठी वाढ होऊ लागली. लोकांच्या गरजा, अपेक्षा यांमध्येही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप वाढला आणि निसर्गाची हानी वेगाने होऊ लागली. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात सर्व देशांत कारखाने, ऊर्जा प्रकल्प आणि विविध विकास प्रकल्पांची संख्या वेगाने वाढली, पण याबरोबरच जंगल विनाशाचा वेगही वाढला आणि जंगलव्याप्त क्षेत्र झपाट्याने कमी होऊ लागले आणि नैसर्गिक समतोल, संतुलन बिघडू लागले. या सर्व कारणांमुळे हवेचे प्रदूषणही वाढले.

वायुप्रदूषणामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे आणि त्यामुळे हवामानात बदल होत आहेत. जागतिक तापमानवाढीची

तीन मुख्य कारणे आहेत –  पृथ्वीच्या वातावरणातील ‘स्ट्रटोस्पिअर’ स्तरामध्ये निसर्गनिर्मित ओझोन वायूचा थर आहे. हा थर पृथ्वीचे प्रखर सूर्यकिरणांपासून रक्षण करतो. सुमारे 49 टक्के सौर ऊर्जा ओझोन थर अडवितो व उर्वरित 51 टक्के सौर ऊर्जा अंतराळात परावर्तित करतो. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात गेली अनेक वर्षे वाढ होऊ शकली नाही; पण गेल्या काही वर्षांपासून ओझोन थर विरळ झाला असून त्यास मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत आहेत.

कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे महत्त्वाचे हरितगृह वायू आहेत. हे हरितगृह वायू जागतिक तापमानवाढीस जबाबदार आहेत. या वायूंचा दाट थर पृथ्वीभोवती तयार झाला असून तो सूर्याची जास्तीत जास्त ऊर्जा शोषून घेऊन पृथ्वीवर पाठवितो आणि परावर्तित होणारी ऊर्जा अडवितो. त्यामुळेच पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून पृथ्वीची स्थिती हरितगृहाप्रमाणे बनली आहे. गेल्या 50-60 वर्षांत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 31 ते 34 टक्क्यांनी, मिथेनचे152 ते 154 टक्क्यांनी, तर नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण 31 ते 32 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या 40 वर्षांत कार्बन डायऑक्साईड व मिथेन या वायूंची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे.

जंगल-वनांचा वेगाने होणारा ऱहास आणि वृक्ष आच्छादन क्षेत्रात झालेली घट पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे तसेच वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात समतोल राखण्याचे महत्त्वाचे कार्य प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून जंगले-वने आणि वृक्ष करतात; पण अलीकडील काळात विकास प्रकल्प, उद्योग-कारखाने उभारणी, शेती, रस्तेबांधणी इ. अनेक कारणांसाठी जंगल-वनांचा, वृक्षांचा ऱहास फार मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने हे संतुलन प्रमाण बिघडले आहे आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशांवरील बर्फ, हिमनग, हिमखंड गेल्या काही वर्षांपासून वेगाने वितळत आहेत.

जागतिक तापमानवाढ आणि बदलत्या हवामानामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक उपाययोजना अमलात आणाव्या लागतील. हवेचे प्रदूषण कमी करावे लागेल. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे अत्यावश्यक असेल. आपल्या गरजा व अपेक्षा कमी कराव्या लागतील. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करावा लागेल. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, प्रदूषण, आरोग्यदायी पर्यावरण याबाबत जनजागृती करावी लागेल. पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. हवा प्रदूषणात घट न झाल्यास पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ होईल. मानवनिर्मित कृतीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींचे प्रमाण इतके वाढेल की, आपणास भविष्यकाळात पृथ्वीतलावर जगणेही अशक्य होईल. त्यामुळे 2100 सालापर्यंत मानवाचे अस्तित्वच नष्ट होईल, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा.

(लेखक ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आहेत)