
मुंबई, संदेश सावंत
अंधेरी पूर्व मतदारसंघावर मागील एक दशकापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होऊन त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पुन्हा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे मुरजी पटेल हे शिंदे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. यामुळे भाजप आणि शिंदे गटात सुरू झालेले गटातटाचे राजकारण अंधेरी पूर्व विधानसभेत महायुतीला भोवण्याची शक्यता आहे. अडचणीच्या काळातही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या ऋतुजा लटके यांना या निवडणुकीतही महविकास आघाडीच्या समर्थक मतदारांकडून निष्ठेचे फळ नक्की मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रमेश लटके यांनी माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचा पराभव करत काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत येथे भगवा फडकवला. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली. रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मशाल चिन्हावर भरघोस मताधिक्याने विजयी होत अंधेरी पूर्वचा गड राखला.
भाजपमध्ये अस्वस्थता
शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाचे नेते माजी पोलीस अधिकारी एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांनीही पी.एस. फाऊंडेशनच्या माध्यमातून येथून विधानसभेची तयारी चालवली होती. भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय साठमारीत हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाच्या वाट्याला गेला. यामुळे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, तर पटेल यांना उमेदवारी दिल्याने शिंदे गटात नाराजीचे फटाके फुटायला सुरुवात झाली असून प्रदीप शर्मा यांनी बंडाचे निशाण फडकवत पत्नी स्वीकृती शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे भाजपमधून आयात केलेल्या शिंदे गटाच्या उमेदवाराची चांगलीच कोंडी झाली आहे.
मशाल पुन्हा धगधगणार
निवडणुकीच्या तोंडावर मिळालेले मशाल चिन्ह शिवसैनिकांनी अल्पावधीत घराघरात पोहचवून अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विजयाची मशाल पेटली. दिवंगत आमदार रमेश लटके यांचे समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे निघालेल्या ऋतुजा लटके यांनी गेल्या दोन वर्षांत केलेली जनसेवा पाहता अंधेरीत पुन्हा मशाल धगधगणार हे मात्र निश्चित.
भाजप-मिंधे गटात वादाची ठिणगी
लोकसभेला केलेल्या मदतीच्या बदल्यात जोगेश्वरी किंवा अंधेरी पूर्व मतदारसंघ मिळावा असा प्रयत्न भाजपकडून केला जात होता, मात्र शिंदे गटाने 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर जिंकलेल्या जागा भाजपला सोडण्यास नकार दिला. त्यानंतर भाजपने अंधेरी पूर्व मतदारसंघात घुसखोरी केली. यावरून भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांत वाद सुरू झाले आहेत. याचा परिणाम मतदानावर होउ शकतो.






























































