एका फोनमध्ये तीन सिम कार्ड वापरता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> स्पायडरमॅन

बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपल्या घरातील फोनचे रुपडेदेखील बदलत गेले. हॉल किंवा बेडरूमची शोभा वाढवणारा लँडलाइन फोन बघता बघता आपल्या खिशात येऊन विराजमान झाला. आज मोबाईल वापरत नसलेले माणूस ‘दुर्मिळ प्रजाती’ म्हणून ओळखला जायला लागला आहे. फोनबरोबरच त्याच्या सिम कार्डमध्येदेखील वेगाने तंत्रज्ञान बदलत गेले. सिम कार्ड, मग मायक्रो सिम कार्ड ते आता ई-सिम कार्ड असा थक्क करणारा प्रवास आपण अनुभवला आहे. ई-सिम (E-Sim) अर्थात एंबेडेड सब्सक्रायबर आयडेंटिटी मॉडूल (Embedded Subscriber Identity Module) हे एक सॉफ्टवेअरवर आधारलेले तंत्रज्ञान आहे. ई-सिम कार्ड हे एक प्रकारचे व्हर्च्युअल सिम कार्ड असते, ज्याच्या मदतीने आपण फिजिकल सिम कार्डचे सर्व फायदे जसे की फोन, मेसेजेस सगळे काही उपयोगात आणू शकतो. महत्त्वाचे म्हणजे हे ई-सिम कार्ड फोनमध्ये घालण्याची गरज नसते. सध्या गुगल, ऍपल आणि सॅमसंगचे असे काही फोन बाजारात उपलब्ध आहेत; ज्यामध्ये तुम्ही एक ई-सिम आणि एक फिजिकल सिम अशा दोन सिम कार्डचा वापर करू शकता, मात्र सध्या ताजी बातमी अशी आहे की, गुगल आपल्या ऍण्ड्रोईडच्या नव्या व्हर्जनमध्ये मल्टिपल अनेबल प्रोफाइल (MEP) वरती एका विशेष सेवेसाठी प्रयत्न करत आहे. गुगलच्या या नव्या व्हर्जनमध्ये एकाच ई-सिम कार्डवरती दोन वेगळ्या प्रोफाईल एकाच वेळी वापरता येणार आहेत. म्हणजेच एका ई-सिमच्या मदतीने आपण दोन वेगळ्या कंपन्यांची सेवा (अर्थात दोन वेगळे नंबर) मोबाईलमध्ये वापरू शकणार आहोत. जर हे शक्य झाले तर आपण ई-सिमच्या मदतीने दोन सेवा आणि एक फिजिकल सिम असे तीन नंबर एकाच वेळी एकाच मोबाईलमध्ये वापरू शकणार आहोत. MEP च्या मदतीने एकाच ई-सिमवर दोन वेगळ्या कंपन्यांच्या सर्व्हिस मिळणे शक्य होणार आहे की नाही, हे आपल्याला लवकरच समजू शकणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात गुगल आपल्या नव्या ‘Android-13’ चे बिटा व्हर्जन उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.